पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारच्या माहिती विभागाने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे सरकारवर टीका केली होती. “आज देशात निर्माण झालेल्या परिस्थितीला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे. हे केंद्रीय आरोग्य सचिवांनी २० ऑक्टोबर २०२० रोजी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीतून स्पष्ट होतं. मेडिकल ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात चांगली स्थिती असल्याचं म्हटलं होतं. त्याचबरोबर केंद्र १ लाख टन ऑक्सिजनची आयात करत आहे, असं त्यांनी म्हटल्याचं चव्हाण यांनी सांगितलं.
चव्हाण यांनी केलेल्या सविस्तर निवेदन प्रसिद्ध करत केंद्र सरकारवर टीका केली. या टीकेला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उत्तर दिलं आहे. “चव्हाणसाहेब, आपण महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रीय आणि तक्रारखोर नेतृत्वाची किंमत मोजत आहोत, त्याबद्दल आधी बोला. करोनाची दुसरी लाट त्सुनामीसारखी येईल असं स्वतःच नोव्हेंबर महिन्यात सांगून पाच महिने काहीही तयारी न करणाऱ्या तुमच्या मुख्यमंत्र्यांबद्दल आधी बोला,” असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.