बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 मार्च 2021 (21:42 IST)

आरोग्य विभागातली ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जाणार

राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागातली ‘क’ आणि ‘ड’  संवर्गातली पदं येत्या दोन महिन्यात भरली जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आरोग्य विभागातील ‘ड’ संवर्गाची पदे महिनाभरात भरली जातील. ‘क’ संवर्गातील ५० टक्के पदे भरण्याची प्रक्रिया सुरू आहे व उर्वरित ५० टक्के पदांबाबत आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ही पदे भरली जातील. अ व ब संवर्गाच्या बाबतीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या भरती नियमात बदल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर येत्या महिन्याभरात मुख्य सचिवांकडे आरोग्य, सामान्य प्रशासन, विधी व न्याय अशा सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत दिली. आरोग्य मंत्री टोपे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कोविड काळात २६ हजार ४८६ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात आली आहेत. विभागात ५४ केडर आहेत. त्यापैकी २-३ केडरच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झाले त्याबाबत चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. विशेषज्ञ डॉक्टरांची पदे भरणेबाबत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल.