धुळ्यातील 500 फुटांच्या घरांची मालमत्ता रद्द करण्याबाबत 'या' पक्षाची मोठी मागणी
धुळे शहरातील ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करावी अशा मागणीचे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे महापालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात आले आहे.
नुकतेच मुंबई महानगरपालिकेने ५०० फुटांच्या घरांची मालमत्ता कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर धुळे महानगर पालिकेने निर्णय घ्यावा, असे रा. कॉ. पक्षातील प्रमुखांचे म्हणणे आहे. मुंबई म.न.पा प्रमाणे लवकरच राज्यातील औरंगाबाद, नाशिक, पुणे, जळगाव महानगरपालिकेत हा निर्णय घेतला जाणार आहे. त्याच धर्तीवर महापालिका प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. धुळे शहरामध्ये मोठ्या प्रमाणाते मजुर, कारागीर, शेतकरी पुत्र, छोटे व्यावसायिक, छोटे व्यापारी, खाजगी कर्मचारी वास्तव्यास आहेत. त्यांच्याकरिता नवीन वर्षासाठी हि एक मोठी भेट असेल. तसेच ५०० फुटांपर्यंत घरांची मालमत्ता कर रद्द केल्यास गोरगरिबांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रणजित भोसले यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत निवेदन देते वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष रंजीत भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शिरसाठ, तसेच कमलेश देवरे, राजेंद्र चौधरी, राज कोळी, उमेश महाले, हाजी हासीम कुरेशी, जगन ताकडे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते.