शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जून 2024 (08:04 IST)

कीर्तिकर-वायकर निकालाबाबत पुन्हा सुरू झाली चर्चा, काय आहे मोबाईल आणि OTP चे प्रकरण ?

लोकसभा निवडणुकीनंतर नव्या सरकारचा शपथविधी झाला आहे. सरकार कामालाही लागलं आहे. पण मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातल्या निकालाचा वाद अद्याप शमलेला नाही. उलट दिवसेंदिवस हा वाद वाढत चालला आहे.
 
रविवारी पुन्हा या प्रकरणी चर्चा सुरू झाली आहे. रविवारी राहुल गांधींनी इंग्रजी दैनिकाचे एक कात्रण ट्विट केलं.या वृत्तपत्राच्या बातमीत वायकर यांच्या नातेवाईकाकडं ईव्हीएम अनलॉक करणारा फोन असल्याचा दावा पोलिसांच्या हवाल्यानं करण्यात आला होता.
 
या मतदारसंघात अगदी एका मताच्या फरकापर्यंत लढत पोहोचली होती. नंतर अखेर दोन वेळा पुनर्मतमोजणी केल्यानंतर शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय जाहीर करण्यता आला.
 
पण यामध्ये गैरप्रकार घडल्याची शक्यता असल्याचं सांगत प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेर ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी वनराई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तसंच ठाकरे गटानं या प्रकरणी कोर्टात धाव घेणार असल्याचंही म्हटलं आहे.
 
दरम्यान, वृत्तपत्रातील बातम्यांमुळं सुरू झालेल्या चर्चेनंतर पोलिसांनीही निवेदन जारी करत ही बातमी चुकीची असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
 
वनराई पोलिसांनी वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनी काहीही माहिती दिलेली नाही. त्यांनी चुकीची माहिती प्रकाशित केली आणि पोलिसांनी माहिती दिल्याचा, चुकीचा समज निर्माण करण्यात आला असं स्पष्टीकरण पोलिसांनी दिलं.
 
या प्रकरणी कारवाई करण्याची तजवीज ठेवली असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
त्यानंतर सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी असा दोन्ही बाजुंकडून आरोप प्रत्यारोप समोर येत आहेत.
 
दरम्यान, मुंबईच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत सगळे आरोप फेटाळून लावले. ईव्हीएमशी कोणत्याही प्रकारे छेडछाड शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलं.
 
काय आहे प्रकरण?
वनराई पोलिसांत ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणी 14 जूनला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी काही वृत्तपत्रांशी बोलताना याबाबत माहिती दिली होती.
 
"वायकर यांचे नातेवाईक मंगेश पंडिलकर हे इव्हीएमला कनेक्ट असलेला मोबाईल फोन वापरत होते. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी आवश्यक असलेला ओटीपी जनरेट करण्यासाठी हा फोन वापरला गेला," असा दावा या वृत्तपत्रानं पोलिसांच्या हवाल्याने केला.
 
हा फोन अधिक पोलिसांनी तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला असून, त्यातील डेटा आणि फिंगरप्रिंटचा शोध घेतला जाणार आहे, असंही पोलिसांनी म्हटलं.
 
दरम्यान या प्रकरणानंतर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं पाहायला मिळालं.
निवडणूक अधिकारी काय म्हणाल्या?
या प्रकरणावर प्रचंड चर्चा सुरू असतानाच रविवारी मुंबईच्या निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत स्पष्टीकरण दिलं.
 
"EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी गरज लागत नाही. तसंच मोबाईलवरील ओटीपीची आवश्यकता नसते. ही चुकीची बातमी असून त्याला काहीही आधार नाही," असं सूर्यवंशी म्हणाल्या.
EVM ला कोणतंही कम्युनिकेशनची यंत्रणा नाही. ही एक फूलप्रूफ सिस्टम आहे, असंही त्या म्हणाल्या.
 
या प्रकरणी खोट्या बातमी प्रकरणी संबंधित वृत्तपत्राला कलम 499 आणि 505 ची नोटीस बजावली असल्याची माहितीदेखिल सूर्यवंशी यांनी दिली.
 
..तर भाजप 40 वर आलं असतं-आदित्य
उत्तर पश्चिम मतदारसंघबद्दल आम्ही सुरुवातीपासून विषय लावून धरलेला आहे. या सगळ्यासंदर्भात आम्ही सुद्धा कोर्टात जाणार आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
 
EVM निवडणुकीचा फ्रॉड झालेला आहे. या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोग समोर आलेला आहे.आम्ही ही लढाई लढणार आणि जिंकणार, असंही ते म्हणाले.
 
"इलोन मस्क यांनी स्वतः सांगितलं की, EVM हॅक होऊ शकतात.निवडणूक आयोग इलोन मस्क यांच्यावर सुद्धा कारवाई करेल. देशात आले तर अटक सुद्धा करू शकतं. निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतं,"असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
 
हुकूमशहाला आम्ही 240 वर आणलं आहे. ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 पण मिळाले नसते, असंही त्यांनी म्हटलं.
 
सुषमा अंधारेंनीही या प्रकरणी टीका केली. रोज नव्या गोष्टी बाहेर येत आहेत. त्यात आज आणखी एक बाब समोर आली. ज्या मोबाईलनं ईव्हीएम अनलॉक झालं तोच मोबाईल रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाकडं सापडला. यानंतरही वायकर यांना जिंकलो असं वाटत असेल का? असा प्रश्न अंधारेनी उपस्थित केला.
 
भाजपकडून नीतिमत्तेची अपेक्षाच नाही, पण जे वायकर साहेब काही वर्षं मातोश्रीच्या आणि बाळासाहेबांच्या सानिध्यात राहिले त्यांच्यासाठी तरी नितिमत्ता महत्त्वाची असेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
 
तुमच्या अंतरमनाला तरी असं वाटत आहे का? तुम्ही जिथे हा विजय घेऊन जाल तिथं लोक तुमच्याकडं पराभूत आहात अशाच नजरेनं पाहत राहतील, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
 
पायाखालची वाळू सरकल्याने आरोप-शिंदे
हा प्रकार दिशाभूल करण्याचा आहे, त्याचं पोलीस स्पष्टीकरण देतील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
 
तुमचे एवढे खासदार जिंकले तेव्हा ईव्हीएमवर संशय घेतला नाही. फक्त वायकर यांच्या ईव्हीएमवर संशय घेत आहात, म्हणजे खोटं परसवण्याचं काम सुरू असल्याचं शिंदे म्हणाले.
 
आम्हाला उद्धव ठाकरेंपेक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातही दोन-दोन लाख जास्त मते मिळाली आहेत. आमचा स्ट्राईक रेट त्यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळं पायाखालची वाळू सरकल्यानं त्यांनी हा प्रकार सुरू केला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
तर, रविंद्र वायकर यांनी हा फक्त रडीचा डाव सुरू असून यात दुसरं काही नाही, अशी प्रतिक्रिया या प्रकरणी दिली आहे.
 
ते म्हणाले की, "मी सहा वाजता मतमोजणी केंद्रावर गेलो त्यापूर्वीच विजयी जाहीर केलं होतं.एक लाख मतांची मोजणी शिल्लक असतानाच विजयी जाहीर करण्यात आल्यानं मी तिकडे गेलो नसता गेलोही नसतो. तिथे हजारो पोलीस 20 उमेदवार त्यांचे प्रतिनिधी होते. मग मी तिकडे जाऊन काहीतरी वेगळं करू शकतो का?"
 
तिकडे किती जणांकडे इव्हीएम मशीन होते? असे इव्हीएम हॅक करता येते का? असा प्रश्न करत निवडणूक आयोगाने योग्य पद्धतीने निवडणूक घेतली आहे. रडीचा डाव कोणी खेळू नये, अशी प्रतिक्रिया वायकर यांनी दिली.
 
निवडणूक आयोगाने बैठक बोलवावी-पृथ्वीराज चव्हाण
दरम्यान, मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात जो प्रकार झाला त्यात अनधिकृतपणे फोन आत आणू दिले गेले, ते रविंद्र वायकर यांच्या नातेवाईकाकडे होते आणि त्याचा वापर केला जात होता, अशी चर्चा आहे.
 
ही घटना मतमोजणीच्या दिवशी म्हणजे 4 जून रोजी घडली. 14 जूनला पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण एफआयआर गुप्त ठेवण्यात आला आहे. तक्रारकर्त्याला कॉपीही दिली नाही, असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
कोणत्याही मोबाईल फोनवर ईव्हीएम उघडण्यासाठी ओटीपी जनरेटर होतो, हेच मी पहिल्यांदा ऐकत आहे, असंही चव्हाण म्हणाले.
तसंच इलेक्ट्रॉनिकली ट्र्न्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टम फॉर सर्व्हीस वोटर ही प्रणाली आहे, याबद्दलही मी पहिल्यांदाच ऐकत आहे. ही प्रणाली हॅक केलं गेलं का? त्यात मतांची आदलाबदली झाली का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.
 
कीर्तिकरांचा पराभव 48 मतांनी झाला. पण आधीच्या राऊंडमध्ये ते आघाडीवर होते. त्यामुळं निवडणूक आयोगानं यावर बैठक बोलावून याबाबत निवेदन जाहीर करायला हवं असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.
 
या विषयावर वैश्विक चर्चा सुरू झाली आहे. इलॉन मस्क यांनीही ट्वीट करून, सांगितलंय की कोणतंही इलेक्ट्रॉनिक मशीन हॅक होऊ शकतं असं त्यांनी सांगितल्याचं चव्हाण म्हणाले.
 
त्यामुळं निवडणूक आयोगानं या गंभीर प्रकरणी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांची बैठक बोलावून या प्रक्रियेवर विश्वास प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करावा, असं चव्हाण म्हणाले.
 
मस्क आणि चंद्रशेखर यांच्यातही वाकयुद्ध
दरम्यान, यापूर्वी टेस्ला आणि स्पेसएक्सचे मालक इलॉन मस्क यांनी शनिवारी एक ट्विट केलं होतं. त्यामुळं भारतातही इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन म्हणजे ईव्हीएमवरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
 
शनिवारी केलेल्या ट्विटमध्ये मस्क यांनी ईव्हीएमचा वापर बंद करावा असं म्हटलं. पण, एनडीए सरकारचे आयटी मंत्री राहिलेले राजीव चंद्रशेखर यांनी मस्क यांचा दावा चुकीचा असल्याचं म्हटलं.
 
मस्क तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतात. तर राजीव चंद्रशेखर यांनीही चिप डिझायनिंग क्षेत्रात काम केलं आहे. त्या दोघांमध्ये ट्विटरवर बोलाबोली झाल्याचं पाहायला मिळालं.
मस्क यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणाऱ्या रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांचं एक ट्वीट रीट्वीट केलं. "आपण इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा वापर बंद करावा. मानवी किंवा AI द्वारे ते हॅक होण्याची शक्यता कमी असली तर हा धोका मोठा आहे," असं मस्क यांनी या ट्विटमध्ये म्हटलं होतं.
 
गेल्या सरकारमधील माजी आयटी मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मस्कच्या ट्विटला उत्तर दिलं.
 
"मस्क जे बोलत आहेत ते अमेरिका किंवा इतर ठिकाणी असू शकतं. तिथं कॉम्प्युटर प्लॅटफॉर्मचा वापर करून, इंटरनेट कनेक्टेड व्होटिंग मशीन तयार केल्या जातात. पण भारतीय ईव्हीएम वेगळे आहेत. ते खास तयार केलेले असतात. ते सुरक्षित असतात आणि नेटवर्क किंवा मीडियाशी कनेक्टेड नसतात," असं चंद्रशेखर यांनी म्हटलं.
 
"ईव्हीएम भारतासारखे डिझाईन आणि तयार करायला हवे. त्यासाठी तुम्हाला ट्युटोरियल पाठवायला आम्हाला आनंद होईल,"असंही चंद्रशेखर म्हणाले.
 
चंद्रशेखर यांनी सविस्तर दिलेल्या या माहितीवर मस्क यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं. ते म्हणजे,"काहीही हॅक केले जाऊ शकते."
 
निकालाच्या दिवशी नेमकं काय घडलं?
मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाचा निकाल रात्री 9.30 वाजेपर्यंत स्पष्ट झाला नव्हता.सुरुवातीच्या मतमोजणी फेरीत रविंद्र वायकर आघाडीवर होते. परंतु त्यानंतर अमोल कीर्तिकर यांनी आघाडी घेत त्यांना 2 हजार मतांनी विजयी घोषित करण्यात आलं.
 
पोस्टल मतांमध्ये कीर्तिकर 2100 मतांनी आघाडीवर होते. यामुळे रविंद वायकर यांनी पोस्टल मतांच्या फेरमतमोजणीची मागणी केली. या फेर मतमोजणीत मात्र रविंद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला.
 
ईव्हीएमच्या मतमोजणीतही कीर्तिकर आणि वायकर यांच्यात एक मताचा फरक होता. कीर्तिकर यांना 4 लाख 995 मतं होती तर रविंद्र वायकर यांना 4 लाख 994 मतं होती.
 
परंतु पोस्टल मतांच्या मोजणीनंतर वायकर विजयी असल्याचं घोषित करण्यात आलं. एकूण 3 हजार 49 पोस्टल मतं होती. यापैकी कीर्तिकर यांना 1500 तर वायकर यांना 1549 मतं मिळाली.
 
अमोल किर्तीकर यांचा केवळ 48 मतांनी पराभव झाल्याने मतमोजणी दरम्यान काहीतरी गोंधळ झाल्याची शंका शिवसेना ठाकरे गटाला आहे.
 
Published By- Priya Dixit