मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मार्च 2021 (09:27 IST)

धुळ्यात भाजपा नगरसेविकेच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक झपाट्याने वाढत असल्याने गर्दीचे समारंभ टाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शासनाच्या नियमानुसार लग्नासारख्या समारंभात सोशल डिस्टन्सिंग पाळून केवळ 50 लोकांना एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे. असे असताना धुळे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता चंद्रकांत उगले आणि भाजपाच्या नगरसेविका सुरेखा चंद्रकांत उगले यांची कन्या वैष्णवी हिचा विवाहसोहळा रविवारी सायंकाळी शहरातील केरुजी नगर येथील मोकळ्या मैदानात थाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात सोशल डिस्टंसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले. या सोहळ्यात तब्बल साडे चारशेहून अधिक नागरिकांची उपस्थिती असल्याचे समजते आहे.
 
उगले यांच्या कन्येच्या विवाहस्थळी भव्य मंडप उभारण्यात आला होता. या मंडपामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून या भागातील रस्ते बंद करण्यात आले होते. यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागला. तसेच एकीकडे पालक मंत्री अब्दुल सत्तार यांनी डीजे वाजविण्यावर बंदी घालण्याचे आदेश दिले असताना देखील उगले यांच्या कन्येच्या विवाह प्रसंगी सर्रासपणे डीजेचा देखील वापर करण्यात आला.  याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.