अशी आहे आयडीया कॉलेजने उभारली संमेलनाची ‘कुसुमाग्रज नगरी’
नवग्रह, गोदाघाट, पैठणी, शब्द रचना, स्वर रचनेतून केली वातावरण निर्मिती
नाशिकमध्ये संपन्न होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कुसुमाग्रज नगरीत नवग्रह, गोदाघाट, पैठणी, शब्द रचना, स्वर रचना अशा वेगवेगळ्या रचना करून परिसर अधिक बोलका करत वातावरण निर्मिती आयडीया कॉलेजने केली आहे. या रचना आकर्षणाचा विषय ठरत असून संमेलन आराखडा उभारणीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
विद्यावर्धन ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन इनव्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया कॉलेज नेहमीच शहरातील आर्कीटेक्चरशी संबंधित विषयांवर काम करत असते. यातूनच शहरात संपन्न होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या कुसुमाग्रज नगरी उभारण्याची संधी कॉलेजला मिळाली. ही नगरी उभारतांना शहराची ओळख, वारसा आणि इतिहास या गोष्टींचा अभ्यास करूनच नगरीची उभारणी करण्यात आलेली आहे. सोबतच संबंधित विषय, मान्यवर व्यक्ती यांचाही विचार करण्यात आलेला आहे. संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर आहेत. म्हणून नवग्रह ही थिम बनवण्यात आली आहे. तर नाशिकचा गोदाघाट , तिथे असलेल्या प्रसिद्ध वास्तू यांची रचना करण्यात आलेली आहे. मुख्य द्वारातून आता आल्यावर रांगोळी म्हणून पैठणीचे काठ रेखाटले आहेत. खांबावर आणि इतरही ठिकाणी पैठणीचा खुबीने वापर केला आहे. तर कवी संमेलन आणि गझल कट्ट्यासाठी शब्द रचना बनवली आहे. बालकवी मेळाव्यासाठी बच्चेकंपनीला आवडतील अशा चित्रांचा समावेश करण्यात आलेल्या आहे. याशिवाय कागद, बांबू यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी ग्राफिटी अर्थात रचना तयार करण्यात आल्या आहेत. आसन व्यवस्थेसाठी वापरलेल्या चाकांना देखणे रूप देऊन त्यांचा वापर केला आहे.
या नगरीच्या उभारणीबाबत कॉलेजचे संचालक प्रा. आर्किटेक्ट विजय सोहनी सांगतात की, आयडीया नेहमीच पर्यावरणपूरक गोष्टीच्या माध्यमातून उभारणी करत असते. कुसुमाग्रज नगरी उभारतांनाही याच गोष्टीचा विचार करण्यात आलेला आहे. सर्व पर्यावरणपूरक गोष्टीच वापरूनच नगरी उभारण्यात आली आहे. कॉलेजमध्ये आम्ही नेहमीच प्रत्यक्ष कामावर भर देतो. संमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना थेट काम करण्याची संधी मिळाली. शहरातल्या वेगवेगळ्या विषयांवर आम्ही नेहमीच काम करत असतो. या ठिकाणी नाशिक शहर आणि साहित्य यांची कलात्मक सांगड घालण्याचा आमचा प्रयत्न आहे.
कुसुमाग्रज नगरीच्या उभारणीत सक्रीय सहभाग आलेले कॉलेजचे प्रा.आर्किटेक्ट दिनेश जातेगावकर सांगतात की, सुमारे एक वर्षाहून अधिक काळापासून आम्ही संमेलनावर काम करत आहोत. संमेलनाचे ठिकाण बदलल्यानंतर आधी संपूर्ण क्षेत्राची मोजणी केली. त्यानंतर आराखडा बनवला. सदरचा आराखडा वेळोवेळी सर्व मान्यवराना दाखवल्यानंतर परवानगी घेतली. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. काम करतांना वास्तूच्या मूळ इमारतीला कुठेच नुकसान होणार नाही, थक्का लागणार नाही याची काळजी घेतली आहे. आसन व्यवस्था, पार्किंग, जेवण व्यवस्था यासह कोविड नियमांसह सगळ्या गोष्टींचा यात स्वतंत्रपणे विचार करण्यात आलेला आहे.