शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (10:36 IST)

डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राबविणार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत तब्बल ५१ हजार करोनाबाधितांचा शोध घेण्यात यश आले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा ही मोहीम राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
 
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत आढावा घेण्यात आला. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर अशा दोन टप्यांत राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाने नियुक्त केलेले स्वयंसेवक राज्यातील दोन कोटी ७६ लाख ३३ हजार ९८२ घरांपैकी दोन कोटी ७४ लाख ६३ हजार (९९ टक्के) घरांपर्यंत म्हणजेच ११.९२ कोटी लोकसंख्येपर्यंत पोहोचले. घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू याची तपासणी करण्यात आली. तसेच लोकांना आरोग्य शिक्षण आणि आरोग्यविषयक महत्त्वाचे संदेश देणे, संशयित करोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंड विकार, लठ्ठपणा यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेण्यात आला. या मोहिमेमुळे ५१ हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांत रुग्णसंख्या कमी होत असून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत तब्बल ६३ टक्के घट झाली आहे.
 
मोहिमेमुळे ३ लाख ५७ हजार ‘आयएलआय’ व सारीचे रुग्णदेखील आढळले. त्यापैकी तीन लाख २२ हजार ४४६ लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ५१ हजार ६४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्याचप्रमाणे एक लाख १५ हजार करोना रुग्ण घरी उपचार घेत असल्याचे आढळून आले. मधुमेहाचे आठ लाख ६९ हजार, उच्च रक्तदाबाचे १३ लाख आठ हजार, हृदयरोगाचे ७३ हजार, कर्करोगाचे १८ हजार, अशा २३ लाख ७५ हजार रुग्णांचा शोध घेण्यात आला.