गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (14:47 IST)

विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीन ऐवजी दिली कोविशील्ड लस

covishield-vaccine
नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांचे कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा येथे एक धक्कादायक प्रकार घडला, असून या ठिकाणी विद्यार्थ्याला कोव्हॅक्सीनऐवजी चक्क कोविशील्ड लस देण्यात आली. त्यामुळे पालक संतप्त झाले असल्याचे पाहायला मिळाले.
 
गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जिल्ह्यात कोरोनाने डोके वर काढले आहे. त्यातच ओमायक्रोन नावाचा नवा व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकार आता दक्ष झाले आहेत. कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये म्हणून आजपासून सर्वत्र १५ ते १८ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरू झाले. शासनाने या मुलांना कोव्हॅक्सिन ही लस देण्याचे सांगितले आहे. मात्र, येवला तालुक्यातील पाटोदा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये १६ वर्षे वयाच्या अथर्व पवार यास कोव्हॅक्सिनऐवजी कोविशील्ड लस दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
 
येवला तालुक्यातील आरोग्य विभागाच्या या भोंगळ कारभाराने पालक धास्तावले आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशी करण्याची मागणी अथर्वचे वडील वसंत पवार यांनी केली आहे. दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये असलेल्या आरोग्य सेविकेने चुकून हा प्रकार केल्याची कबुली तालुका आरोग्य अधिकारी हर्षल नेहते यांनी दिली आहे. मात्र, संबंधितांवर काय कारवाई करणार का? याबाबत त्यांनी मौन बाळगले.
 
नाशिकमध्ये ६ ठिकाणी आणि जिल्ह्यात एकूण ३९ लसीकरण केंद्रांवर किशोरवयीन मुलांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरणासाठी शहरी भागात ११ केंद्रे ठेवण्यात आली आहेत. त्यात नाशिक महापालिका हद्दीत ६ आणि मालेगाव महापालिका हद्दीत 5 केंद्रे असणार आहेत. तर २९ केंद्र हे ग्रामीण भागात असणार आहेत. गरज पडल्यास प्रत्येक महाविद्यालयातही लसीकरण करण्यात येणार आहे. नाशिकमध्ये इंदिरा गांधी रुग्णालय, सातपूर ईएसआय हॉस्पिटल, सिडको समाज कल्याण कार्यालय, नवीन बिटको हॉस्पिटल आणि झाकीर हुसैन हॉस्पिटल या केंद्रावर लस उपलब्ध आहे.