रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (15:02 IST)

राज्यात अशी आहे पूरस्थिती, चार दिवस समुद्राला मोठी भरती

राज्यात  काही ठिकाणी पूरस्थिती कायम आहे. आजपासून चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. त्यामुळे समुद्रात कोणीही जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान चंद्रपुरात 11 हजार हेक्टरवरील पिकं पाण्यात तर नाशिकमध्ये भातशेती, भाजीपाला पिकांचं नुकसान झाले आहे. राज्यात गेल्या महिन्याभरात पावसामुळे 99 जणांचा बळी गेला आहे. तर गेल्या 24 तासांत 4 जणांनी जीव गमावला आहे.
 
कोल्हापुरातील पंचगंगा नदी दुथडी वाहत असून पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच महिन्याभरात 181 जनावरांचा मृत्यू झाला आहे. जीवितहानी टाळण्यासाठी पुराच्या ठिकाणी एनडीआरएफ, एसडीआरएफ तैनात करण्यात आल्या आहेत. मराठवाड्यात आठ दिवसात 35 लोकांचा पावसामुळे बळी गेला आहे. तर साडेतीनशेहून अधिक जनावरं वाहून गेलीत. मृत व्यक्तींमध्ये 24 जणांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तर 9 जणांचा मृत्यू पुरात वाहून गेल्यामुळे झाला. 8 दिवसाच्या या मुसळधार पावसामुळे 60 हजार हेक्टर वरच्या पिकांना फटका बसला आहे.
 
चार दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यावेळी समुद्रात तब्बल 4.51 ते 4.87 मीटर उंचीच्या लाटा उसळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. या भरतीदरम्यान 50 मिली मिटरपेक्षा जास्त पाऊस झाल्यास मुंबईत पाणी साठण्याची शक्यता आहे. 
 
पावसामुळे नऊ जण वाहून गेलेत
नाशिक जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नऊ जण आतापर्यंत वाहून गेले आहेत.  पावसामुळे चांदवड, सुरगाणा आणि पेठ तालुक्यात 10 जनावरं दगावलीत. घरांच्या नुकसानीबाबात पंचनामे सुरू असल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे.
 
पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. धामणी आणि कवडास या दोन्ही धरणतून पाण्याचा विसर्ग सुरू असून  नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. गडचिरोली जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे एकूण 10 हजार नागरिकांचं स्थलांतर झाले आहे. जिल्ह्यातील दक्षिण भागात पूर परिस्थिती जैसे थे आहे. दक्षिण गडचिरोलीला चंद्रपूर जिल्ह्याशी जोडणारा आष्टी पूलही पुराच्या पाण्याखाली आहे.