बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (21:40 IST)

नाशिक-मुंबई दरम्यानचा प्रवास कालावधी कमी होणार

मुंबई-आग्रा या महामार्गाचाच एक भाग असलेल्या गोंदे ते वडपे हा टप्पा शंभर किलोमीटरचा आहे. मात्र, हा महामार्ग चौपदरी असल्याने प्रवाशांसाठी वेळखाऊ ठरत आहे. सदर महामार्गाचे सहापदरीकरण झाल्यास नाशिक-मुंबई या दरम्यानच्या प्रवासास कमी कालावधी लागणार आहे. हे काम तातडीने हाती घ्यावे असे निर्देश केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. यासंदर्भात दिल्लीत बैठक झाली. खासदार हेमंत गोडसे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
 
गोंदे ते वडपे या दरम्यानचा महामार्ग नाशिक- मुंबई महामार्गाचा एक भाग आहे. नाशिक ते गोंदे आणि वडपे ते मुंबई सहापदरी महामार्ग आहे . मात्र गोंदे ते वडपे या दरम्यानचा शंभर किलोमिटरचा महामार्ग चौपदरीच आहे . परिणामी चालकांना आपल्या वाहनांचा वेग कमी करावा लागत असल्याने नाशिक- मुंबई दरम्यानच्या प्रवासास विलंब होत असतो. नाशिक -मुंबई दरम्यानचा प्रवास कमीतकमी वेळेत होण्यासाठी प्रयत्न करण्याचे साकडे नाशिक येथील विविध संस्थाच्या पदाधिका – यांनी खासदार गोडसे यांना घातले होते . शहरवासीयांच्या मागणीची दखल घेऊन गोंदे ते वडपे या दरम्यानच्या महामार्गाचे सहापदरीकरण करण्यासाठी खा.गोडसे यांनी सततच्या पाठपुरावा सुरू केलेला आहे . गोडसे यांनी अनेकदा ना . गडकरी यांची भेट घेत सदर रस्त्याचे सहापदरीकरण करावे अशी आग्रही मागणी केली होती . खा.गोडसे यांच्या मागणीची दखल घेत काल नामदार गडकरी यांनी दिल्लीत राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाची विशेष बैठक घेतली . या बैठकीला ना गडकरी यांनी खा गोडसे यांना विशेष आमंत्रित केले होते.
 
नाशिक – मुंबई प्रवास कमीत कमी वेळेत होणे गरजेचे आहे. महामार्गावरील गोंदे फाट्यापासून प्रस्तावित समृद्धी महामार्ग अगदी हाकेच्या अंतरावर असून प्रवासी गोंदे फाट्यापासून समृध्दी महामार्गानेही मुंबई साठीचा प्रवास करू शकतात . असे असले तरी गोंदे ते वडपे या महामार्गाचे सहापदरीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे . यामुळे नाशिक – मुंबई या दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी निश्चीतच कमी होणार आहे . सदर महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने करावयाचे आहे की महामार्गावरील टोल प्रशासनाने करावयाचे आहे याचा तिढा तातडीने सोडवावा असे सूचना यावेळी नामदार गडकरी यांनी करत गोंदे ते वडपे यादरम्यानच्या महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले आहेत . गोंदे ते वडपे या रस्त्यांचे सहापदरीकरण झालेले नसल्याने प्रवाशांच्या होणा – या कुचंबने विषयीच्या अनेक व्यथा यावेळी खा गोडसे यांनी बैठकीत स्पष्ट केल्या . नामदार गडकरी यांनी प्रशासनाला आदेश दिल्याने आता लवकरच या विषयीचा योग्य तो निर्णय होऊन गोंदे वडपे या रस्त्याच्या सहापदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार असल्याची माहिती खा. गोडसे यांनी दिली आहे .