26 तोळ्यांचा सोन्याचा राणीहार तुळजाभवानी देवीस अर्पण
कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीस सोलापूरच्या भक्तांनी 26 तोळे सोन्याचा राणीहार गुरूवारी प्रक्षाळपूजेपूर्वी अर्पण केला. आई राजा उदेऽऽ उदेऽऽच्या नामस्मरणात हार प्रशासनातील अधिकारी तहसीलदार राहुल पाटील यांच्याकडे हा हार दिला. रितसर मंदिराच्या अभिलेखामध्ये नोंद घेण्यात आली. त्यानंतर पाळीचे पुजारी वीरेंद्र कदम यांनी देवीस अर्पण केला. सदर दान देणारे पाच व्यक्ती सोलापूरचे व्यापारी असून त्यांनी देवीला दान केल्यामुळे आमची नावे प्रसिध्द केली जाऊ नयेत, अशी सूचना केली. याप्रसंगी तहसीलदार पाटील, व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी, महंत तुकोजी महाराज, पुजारी गब्बर संजय सोंजी, तु.भ. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पुजारी अतुल मलबा, सचिन परमेश्र्वर, शशिकांत कदम विकास मलबा यांची उपस्थित होती. आपल्या व्यवसायात सतत भरभराट होत असून देवीच्या आशीर्वादाने आम्हाला सदैव यश मिळत राहिले आहे. त्यामुळे आमचे नाव न देता आम्ही ही भेट देवीचरणी अर्पण करीत आहोत, अशा शब्दात हार दान करणार्या देणगीदारांनी भावना व्यक्त केल्या. प्रशासनाच्यावतीने देवीची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.