हातपाय धुणे जीवावर बेतले, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू
भंडारा- जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेल्यानंतर कालव्यात उतरुन हातपाय धुणे काका-पुतण्याच्या जीवावर बेतले आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील आसलपानी येथे कारली लघुकालव्यात बुडून या दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना घडल्याने आसलपानी गावावर शोककळा पसरली आहे.
साहिल राजेश कोकोडे (वय 12 वर्ष) आणि हौसीलाल हिरदेराम कोकोडे (वय 24 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. साहिल हा येरली येथील आश्रमशाळेत इयत्ता सातवीत शिकत होता.
काका- पुतण्या जंगलात मोहफूल वेचण्यासाठी गेले होते. घराकडे परताना घामाघूम झाल्यामुळे दोघेही हातपाय धुण्यासाठी कारली लघुकालव्यात उतरले. यावेळी तोल जाऊन दोघेही पाण्यात पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला.