शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 डिसेंबर 2023 (10:07 IST)

सुरत-गुवाहाटी, व्हीप आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर ठाकरे गटाच्या प्रश्नांना काय उत्तरं मिळाली?

eknath shinde uddhav thackeray
दीपाली जगताप
शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाची सुनावणी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान सुरू आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांच्या साक्षीची उलट तपासणी पूर्ण झाल्यानंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी सुरू आहे.
 
आमदार दिलीप लांडे आणि आमदार योगेश कदम यांची उलट तपासणी शुक्रवारी (8 डिसेंबर) पार पडली. आज (9 डिसेंबर) खासदार राहुल शेवाळे यांची फेरतपासणी होणार आहे.
 
ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या आमदारांना अनेक अवघड प्रश्न विचारले.
 
सुरत ते गुवाहाटी दरम्यानचा प्रवास, त्याचा खर्च आणि अध्यक्ष पदाच्या मतदानाबाबत अनेक प्रश्नांची सरबत्ती दिलीप लांडे आणि योगेश कदम यांच्यावर करण्यात आली.
 
नेमकं काय घडलं आणि उलट तपासणी दरम्यान आमदारांची खरी अडचण कुठे झाली? जाणून घेऊया,
 
व्हीप मिळाल्याची पोचपावती
21 जून 2022 हा दिवस शिवसेनेच्या सुनावणीत दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरताना दिसत आहे. कारण 20 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासह आमदार सुरतला रवाना झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे सरकारी निवासस्थान ‘वर्षा’ या बंगल्यावर शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती.
 
या बैठकीला हजर राहण्याचे आदेश पक्षाकडून होते आणि त्यासाठी प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांना व्हीप बजावल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
 
हा व्हीप मिळाला नसल्याचं उत्तर सुनावणीदरम्यान आमदार योगेश कदम यांनी दिलं. परंतु यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी थेट कदमांना व्हीप मिळाल्याची मूळ पोचपावतीच अध्यक्षांसमोर सादर केली.
 
यासंदर्भात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना ठाकरे गटाचे आमदार देवदत्त कामत यांनी प्रश्न विचारले.
 
देवदत्त कामत - तुम्ही 20 जून 2022 आणि 21 जून 2022 रोजी कुठे होता?
 
योगेश कदम - मुंबईत.
 
देवदत्त कामत – 21 जून 2022 रोजी वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत तुम्ही होता का?
 
योगेश कदम - अशी कुठलीही बैठक झालेली नाही.
 
देवदत्त कामत - 21 जून 2022 रोजीच्या वर्षा बंगल्यावरील बैठकीसाठी तुम्हाला व्हिप मिळाला होता का?
 
योगेश कदम - नाही.
 
देवदत्त कामत - तुम्ही 21 जून 2022 रोजीच्या व्हिपच्या पोचपावतीवरती स्वाक्षरी केली होती का?
 
योगेश कदम - मी सही केलेली नाही.
 
यानंतर देवदत्त कामत यांनी योगेश कदम यांनी स्वाक्षरी केलेल्या पोचपावतीची मूळ प्रत अध्यक्षांसमोर सादर केली. तसंच साक्षीदार योगेश कदम यांनाही हे डॉक्युमेंट दाखवण्यात आले. यानंतर देवदत्त कामत यांनी पेपरवरील स्वाक्षरी तुमची आहे का? असा प्रश्न कदम यांना केला.
 
यावर योगेश कदम यांनी उत्तर दिलं - माझ्या स्वाक्षरी सारखी दिसत आहे परंतु मी यावर सही केल्याचे माझ्या लक्षात नाही.
 
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान का केलं नाही?
 
3 जुलै 2022 रोजी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठीची निवडणूक पार पडली. अध्यक्ष राहुल नार्वेकर ज्यांच्यासमोर सध्या शिवसेनेच्या आमदारांची ही सुनावणी सुरू आहे त्यांच्या निवडणुकीबाबतचेही प्रश्न ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी योगेश कदम यांना विचारले.
 
देवदत्त कामत - हे खरं आहे का तुम्ही 3 जुलै 2022 रोजी विधानसभेच्या अध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत राहुल नार्वेकर यांच्याबाजूने मतदान केले?
 
योगेश कदम - मी माझ्या conscious नुसार मतदान केले.
 
देवदत्त कामत - 3 जुलै 2022 रोजी अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी तुम्ही कोणत्याच व्हिपचं पालन न करता तुमच्या conscious ने मतदान केले?
 
योगेश कदम - मला अधिकार आहे कोणाला मतदान करायचे आणि त्यादिवशी मी तो अधिकार वापरला.
 
देवदत्त कामत - मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा आदेश मानण्यासाठी तुम्ही बांधील आहात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मतदान करू शकत नाही. हे खरे आहे का?
 
योगेश कदम - माझ्या अधिकारानुसार मी मतदान केले याचा अर्थ असा होत नाही की मी शिवसेनेच्या आदेशाविरोधात मतदान केले.
 
देवदत्त कामत - शिवसेनेचे राजन साळवी हे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पक्षाचे उमेदवार होते. हे खरे आहे का?
 
योगेश कदम - मला याची कल्पना नाही.
 
देवदत्त कामत – अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी किती उमेदवार होते?
 
योगेश कदम - माझ्या लक्षात नाही.
 
देवदत्त कामत - राजन साळवी हे शिवसेना पक्षाकडून अध्यक्षपदाचे उमेदवार होते याची तुम्हाला कल्पना होती का?
 
योगेश कदम - मला खात्री नाही.
 
देवदत्त कामत - राजन साळवी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार आहेत का?
 
योगेश कदम - होय.
 
कामत - 3 जुलै रोजीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राजन साळवी शिवसेनेचे उमेदवार आहेत याची कल्पना तुम्हाला असती तर त्यांच्यासाठी मतदान केले असते का?
 
हा प्रश्न स्पेक्युलेटीव्ह असल्याचं सांगत शिंदे गटाच्या वकिलांनी प्रश्नावर आक्षेप घेतला.
 
यानंतर उत्तर देताना योगेश कदम म्हणाले - मी यावर भाष्य करू शकत नाही.
 
'सुरत ते गुवाहाटी प्रवासाचा खर्च भाजपने केला का?
उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांना सुरत ते गुवाहाटी हा प्रवास कसा केला आणि त्यासाठीचा खर्च कोणी केला? यावरून प्रश्न विचारले.
 
सुरुवातीला दिलीप लांडे यांची उलट तपासणी पार पडली.
 
देवदत्त कामत - तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या 21 जून 2022 आणि 22 जून 2022 रोजी संपर्कात होता का?
 
दिलीप लांडे - मी एकनाथ शिंदे यांच्या 25 वर्षांपासून संपर्कात आहे.
 
देवदत्त कामत - मग तुम्ही 20 आणि 21 जून 2022 रोजीही त्यांच्या संपर्कात होता का?
 
देवदत्त कामत - मी त्यांना 20 जून 2022 रोजी भेटलो होतो. 20 तारखेला मतदान होते त्यादिवशी मी त्यांना भेटलो होतो. मी त्यांना 21 जूनला भेटलो नव्हतो.
 
देवदत्त कामत - मग हे खरं आहे का की 20 जून 2022 ते 24 जून 2022 पर्यंत तुमचा एकनाथ शिंदे यांच्याशी कोणताही संपर्क नव्हता असे म्हणणे योग्य राहील का?
 
दिलीप लांडे - होय.
 
देवदत्त कामत - 22 जून 2022 ते 30 जून 2022 दरम्यान आपण महाराष्ट्राबाहेर प्रवास केला का?*
 
दिलीप लांडे - होय.
 
देवदत्त कामत - तुम्ही कुठे गेला होता हे सांगू शकता का?
 
दिलीप लांडे - ही माझी खासगी माहिती आहे. मला ती द्यायची नाही.
 
देवदत्त कामत - तुम्ही 22 जून ते 30 जून 2022 दरम्यान सुरत किंवा गुवाहाटीला प्रवास केला का?
 
दिलीप लांडे - ही माझी खासगी माहिती आहे. मी कुठे फिरायचं हा माझा अधिकार आहे.
 
देवदत्त कामत - 21 आणि 22 जून 2022 रोजी तुम्ही वृत्तपत्र आणि न्यूज चॅनेल्स यांना मुलाखत देताना तुम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असणार आहे आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा नाही असं म्हटलं आहे का?
 
दिलीप लांडे - आठवत नाही.
 
देवदत्त कामत - तुमच्या सुरत किंवा गुवाहाटी येथील हाॅटेलचा राहण्याचा खर्च भारतीय जनता पक्षाने केला होता. हे बरोबर की चूक?
 
दिलीप लांडे - मी स्वतः गेलो होतो. मी कुठे राहिलो किंवा कुठे गेलो होतो याची माहिती मी कुणाला देऊ इच्छित नाही.
 
देवदत्त कामत - तुमचा महाराष्ट्राबाहेरील 22 जून ते 30 जून 2022 दरम्यानचा प्रवास चार्टर्ड फ्लाईटने झाला होता का?
 
दिलीप लांडे - ही माझी खासगी जीवनाची माहिती आहे. मी बैलगाडीतून गेलो काय रिक्षा चालवत गेलो होतो हे मी सांगू शकत नाही.
 
योगेश कदम यांनाही सुरत आणि गुवाहाटीच्या दौऱ्याबाबत प्रश्न विचारण्यात आले.
 
देवदत्त कामत - 22 जून 2022 रोजी तुम्ही कुठे होता?
 
योगेश कदम - मुंबईबाहेर.
 
देवदत्त कामत - कुठे होता?
 
योगेश कदम - मी सकाळी सुरतमध्ये होतो आणि त्याच दिवशी रात्री मी गुवाहाटीत होतो.
 
देवदत्त कामत - तुम्ही सुरत आणि गुवाहटीमध्ये श्री. एकनाथ शिंदे यांच्यासोबत होता का?
 
योगेश कदम - होय.
 
देवदत्त कामत - तुम्ही किती दिवस गुवाहाटीला होता? मुंबईत परत कधी आला?
 
योगेश कदम - लक्षात नाही.
 
देवदत्त कामत - हे खरे आहे का की तुम्ही सुरत आणि गुवाहटी येथे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आणि त्यांच्या समर्थक आमदारांसोबत होता.
 
योगेश कदम - नाही. मी 22 जून 2022 रोजी रात्री एकनाथ शिंदे यांना गुवाहाटी येथे भेटलो.
 
देवदत्त कामत - एकनाथ शिंदे यांच्यासोबत तुम्ही असताना मुंबईत येईपर्यंत त्यांच्यासोबत इतर आमदार होते का?
 
योगेश कदम - होय.
 
देवदत्त कामत - किती आमदार होते?
 
योगेश कदम - 39 आमदार माझ्यासह.
 
देवदत्त कामत - तुम्ही स्वतः तुमच्यासाठी फ्लाईट बुकींग केलं का आणि त्याचे पैसे दिले का?
 
योगेश कदम - ही माझी वैयक्तिक माहिती आहे मी सांगू इच्छित नाही.
 
देवदत्त कामत - गुवाहाटीला हॉटेलचे बुकींग तुम्ही केले की एकनाथ शिंदे किंवा भाजपने केले?
 
योगेश कदम - ही माझी वैयक्तिक माहिती आहे. मला यावर काही बोलायचे नाही.
 
देवदत्त कामत - गुवाहाटीमध्ये तिथल्या भाजप सरकारने शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना सुरक्षा पुरवली होती हे खरे आहे का?
 
योगेश कदम - मला वाटत नाही.
 
'राष्ट्रवादीशी युती करणं शिवसेनेच्या विचारधारेच्यादृष्टीने योग्य आहे का?'
आमदार दिलीप लांडे यांनी फेर तपासणीदरम्यान शिवसेना पक्षाची मूळ विचारधारा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण याचा उल्लेख वारंवार आपल्या उत्तरात केला. यानंतर देवदत्त कामत यांनी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससोबत सद्यस्थितीत सत्तेत असण्याबाबत प्रश्न विचारले.
 
देवदत्त कामत – सद्यस्थितीत शिवसेना राजकीय पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत सत्तेत सामील होणं योग्य किंवा बरोबर आहे का?
 
दिलीप लांडे - हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेना भाजपची युती केली होती. गेले अनेक वर्ष या महाराष्ट्रात हिंदुत्ववादी सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीवर सरकार होते. ज्या हिंदुस्थानात हिंदुत्वाचे विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार राजकीय पक्षाला मान्य होते अशा हिंदुत्ववादी लोकांबरोबर देशाची सेवा करणं योग्य आहे.
 
देवदत्त कामत - मी पुन्हा प्रश्न विचारतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षाची विचारधारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करण्याची अनुमती देते का?
 
दिलीप लांडे - या प्रश्नाचे उत्तर मी सविस्तर दिलेले आहे.
 
देवदत्त कामत - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेना पक्षाच्या विचारधारेच्या विरोधात आहे असं म्हटलं तर योग्य ठरेल का?
 
देवदत्त कामत - परिच्छेद क्रमांक सहा, सातमध्ये आपले शेवटचे वाक्य असे आहे की, "शिवसेनेच्या तत्कालीन नेतृत्त्वाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा शिवसेनेच्या विचारधारेच्या संपूर्ण विरोधात असलेल्या पक्षांशी युती करून शिवसेनेच्या विचारांशी तडजोड केली. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा ही शिवसेनेच्या विचारधारेच्या विपरित आहे?
 
दिलीप लांडे - आता वस्तुस्थिती अशी आहे की शिवसेना भाजप युतीच्या विचारांशी सहमत होऊन राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील झालेला आहे.
 
देवदत्त कामत - आपल्याला असं सांगू इच्छितो की तुम्ही देत असलेली साक्ष खोटी आहे. आपण बाळासाहेबांची विचारधारा मानत नाही, तुमची विचारधारा सोयीची आहे. यावर तुमचे मत काय?
 
दिलीप लांडे - मी साक्ष देत आहे ती खरी आहे. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन वाटचाल करत आहे.
 
देवदत्त कामत - मी सांगू इच्छितो की, आमदारांचा एखादा गट विरोधी पक्ष असलेल्या राजकीय पक्षाशी युती करू शकत नाही. यावर काय म्हणणं आहे.
 
दिलीप लांडे - ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक लढवली अशा हिंदुत्ववादी पक्षासोबत युती करू शकतो.
 
23 आमदारांच्या स्वाक्षरीत शिंदे गटाच्या मंत्र्यांची नावे
21 जून 2022 रोजी उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला येथे बोलवलेल्या बैठकीचे हजेरी पत्रक ठाकरे गटाच्या वकिलांनी दिलीप लांडे यांच्या सुनावणीदरम्यान सादर केले. या बैठकीतच एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या गटनेते पदावरून हटवण्याबाबत प्रस्ताव झाला आणि त्यावर आमदारांच्या सह्या घेण्यात आल्याचे हे पत्रक असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.
 
विशेष म्हणजे या हजेरी पत्रकावरती गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर यांच्या स्वाक्षऱ्या असल्याचं दिसत आहे.
 
दरम्यान, आमदार दिलीप लांडे यांनी यावरील स्वाक्षरी आपलीच असल्याचं स्पष्ट केलं आहे परंतु पत्रकावर लिहिण्यात आलेली बाब किंवा पक्षादेश हा स्वाक्षरी केल्यानंतर लिहिलेला आहे असंही त्यांनी म्हटलं.
 
आता यापुढे खासदार राहुल शेवाळे यांची फेरतपासणी होणार आहे. यानंतर आमदार भरत गोगावले, मंत्री उदय सामंत आणि मंत्री दीपक केसरकर यांनाही उलट तपासणीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता आहे.