शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 मार्च 2023 (23:02 IST)

जेव्हा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेंना अजित पवारांना सहशिवसेना प्रमुख करण्याचा सल्ला देतात

devendra fadnavis eaknath shinde
शुक्रवारी अधिवेशनाचा पहीला आठवडा संपणार होता. सुरवातीला झालेलं शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं आंदोलन , संजय राऊत विरूद्ध मुख्यमंत्र्यांवरचा हक्कभंग, कसबा आणि चिंचवडचे निकाल याची चर्चा आता ओसरत होती.
आदल्या रात्री महाविकास आघाडीने सर्व नेत्यांनी सोबत जेवण केलं होतं. चिंचवडची जागाही कशी निवडून आली असती, कसब्यात आमच्यामुळे कसे जिंकलो? ही रस्सीखेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये करून झाली होती.
 
सकाळपासूनच अनेक आमदारांची होळीसाठी घरी जाण्याची जाण्याची गडबड सुरू होती. काहींची गाडी पुढे निघालीही होती. त्यामुळे सुक्रवारी पायऱ्यांवरही शुकशुकाट होता.
आज कोणत्या मुद्यांवर आंदोलन होणार? यांची चर्चा करत माध्यमांनी कॅमेऱ्याचे ‘लाईव्ह आऊटपुट ‘ देऊन ठेवलं होतं. पण आंदोलन काही झालं नाही. दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू झालं होतं.
 
राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अनेक आमदारांनी तुफान राजकीय टोलेबाजी करत भाषणं केली होती. त्यावर मुख्यमंत्री उत्तर देणार होते. दीड वाजल्याच्या सुमारास विधानभवनच्या गेटवर गर्दी झाली. सुरक्षारक्षक धावत लोकांना बाजूला करू लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विधानभवनात आले.
 
शिंदेना त्यांच्या लोकांनी साथ दिली पण मला माझ्या लोकांनी…
मुख्यमंत्री दोनच्या सुमारास विधानसभेत बोलायला उभे राहीले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची सुरूवात राज्यातल्या काही महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत माहिती देऊन झाली.
 
जेष्ठांसाठी एसटी मोफत सुरू केली. त्याचा लाभ 5 कोटी 65 लाख लोकांनी घेतला. 160 बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू केले. या योजनांबाबत मुख्यमंत्री बोलत होते.
 
बाजूला देवेंद्र फडणवीस बसले होते. सत्ताधारी आमदारांची संख्या बरीच होती. विरोधी पक्षाच्या बाकांवर अजित पवारांसह महत्त्वाच्या नेत्यांपैकी कोणीही नव्हतं.
 
पाच मिनिटांनंतर जयंत पाटील आत आले. थोड्यावेळाने विरोधी पक्षनेते अजित पवार आत आले. मग मुख्यमंत्र्यांचं भाषणाची गाडी हळूहळू राजकीय मुद्यांकडे वळू लागली.
 
मुख्यमंत्री मेट्रो, कोस्टल रोड, पुणे रिंग रोड , लोणावळ्याचा सर्वांत मोठा बोगदा कसा आपण करतोय हे सांगत होते.
 
मुख्यमंत्री म्हणाले, “अचानक सत्तेवरून पायउतार झाल्यामुळे अजितदादांच्या डोळ्याला जी काही अंधारी आली आहे त्यामुळे तुम्हाला आमचं काम दिसेनास झालं आहे.”
 
हे बोलताना अजितदादा डोळे चोळू लागले. बाजूला बसलेले जयंत पाटील हसत होते. मग अजितदादांनी डोळ्यांना चष्मा लावला आणि म्हणाले अंधारी येते म्हणून चष्मा लावतोय.
 
"हिंदूहदयसम्राट समृध्दी महामार्ग सुरू केला. त्याच्या रस्त्याचं कामही सुरू झालं आहे. मागच्या सरकारच्या काळात हे काम थांबलेलं होतं. कसं थांबलेलं हे तुम्हाला माहिती आहे."
 
तितक्यात छगन भुजबळ म्हणाले, "आम्हाला कसं माहिती? तुम्हालाच माहिती …"
 
त्यावर सीएम म्हणाले, "भुजबळ साहेब तुम्ही बाजूला बसत होतात ना..! तुम्हाला चांगलं माहिती आहे. दादांना तर अधिक माहिती आहे."
 
तेव्हा बाजूला बसलेले देवेंद्र फडणवीस भुजबळांकडे बघून म्हणाले, "तुमच्यात बोलायची हिंमत नव्हती. त्यांनी हिंमत दाखवली."
 
त्यावर अजितदादा म्हणाले, “त्यांच्या लोकांनी त्यांना साथ दिली. माझ्या लोकांनी मला नाही दिली.” त्यावर सगळेच आमदार हसू लागले.
 
मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "जयंतरावांना विश्वासात घेतलं असतं तर जमलं असतं. सगळे साखर झोपेत असताना तुम्ही शपथ घेतली. तेव्हा मला फोन आला मी म्हटलं हे जुनं आहे, नंतर म्हटलं नाही हे तर आताच आहे."
 
त्यावर अजितदादा पुन्हा म्हणाले, "साखर झोपेत असताना नाही हो.. आठ वाजले होते."
 
समोरच्या बाकावर बसलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हसू लागले.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "मला कळलं जयंतराव पण त्या शपथविधीला आहेत. पण नंतर कळलं ते नव्हते. दादा एकटेच गेले. देवेंद्र फडणवीसांनी मला अर्धे सांगितलं आहे. काय झालं ते.. ! अर्धच सांगितलं आहे बरं का? त्यावर अजितदादा म्हणाले, ते घडलं ते पूर्ण देवेंद्रजी कधीच सांगू शकत नाहीत."
 
'जयंतराव बसा माझ्या खुर्चीवर …'
हे सर्व सुरू असताना ठाकरे गटाच्या आमदारांचे बाक रिकामे होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून वर्षा बंगल्यात चहापानावर झालेलं कोट्यवधी रूपयांच्या बिलावर अजित पवार यांनी टीका केली होती.
 
त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, “अहो दादा कोरोनामध्ये दोन वर्षं वर्षा बंगला बंद होता. मग कसं चहापान्याचं इतकं बील आलं? तिथे कोण जात होतं? मग चहा पाणी? तिथे जायचं म्हटलं तरी कोव्हीड टेस्ट लागायची. त्याचं सर्टीफिकेट दाखवल्याशिवाय आत सोडलं जायचं नाही. मग कोण जातय तिथे? अजितदादांना माहिती आहे. कारण तेच जायचे. आम्ही नव्हतो जात.”
 
त्यावर अजितदादा म्हणाले, "तुम्ही असतानाच मला बोलवायचे. एकनाथराव आले आहेत तुम्हीही या म्हणायचे."
 
मुख्यमंत्रीही हसत बोलत होते, “माझ्याकडे सोन्यासारखी माणसं येतात त्यांना चहा नको पाजू? तुम्ही म्हणता घटनाबाह्य मुख्यमंत्री, घटनाबाह्य सरकार … मग तुम्ही काय या घटनाबाह्य सरकारचे घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? एकतर जयंतरावांची इच्छा होती. त्या खुर्चीवर तुम्ही बसलात."
 
मग अजितदादा म्हणाले, "जयंतराव बसा माझ्या खुर्चीवर ..."
जयंत पाटीलांसह इतर आमदारही हसू लागले. हे रेकॉर्डवर घ्यायचं का? अध्यक्षही असं म्हणून हसू लागले.
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, “अजितदादा शिवसेनेची इतकी बाजू मांडायला लागले आहेत की, त्यांना पदच द्यायचं बाकी आहे”
 
त्यावर बाजूला बसलेले उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘सहशिवसेनाप्रमुख’ … मग मुख्यमंत्री म्हणाले, “पण आता ते ही शक्य नाही. कारण आता शिवसेनाही आपल्याकडे आहे. तीही संधी हुकली तुमची दादा...”
 
जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्र्यांमध्ये खडाजंगी?
पुढे खोटे गुन्हे दाखल करण्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी भाषणात घेतला. कंगना राणावत, अर्णब गोस्मामी, प्रकरणात कसे खोटे गुन्हे दाखल केले याबाबत बोलू लागले.
 
जे दोषी असतील त्यांना अनुशासन करू, असं मुख्यमंत्री म्हणाले आणि तितक्यात जितेंद्र आव्हाड सभागृहात आले. त्यांच्यावर कसे खोटे गुन्हे दाखल केले याबाबत अध्यक्षांकडे बोलण्याची परवानगी मागू लागले.
 
अध्यक्ष त्यांना खाली बसा असं सांगत होते. पण आव्हाड ऐकत नव्हते. त्यांच्यावर कसे खोटे गुन्हे दाखल केले याबाबत बोलत होते.
 
जयंत पाटीलही आव्हाड यांना खाली बसण्यास सांगू लागले.
 
तितक्यात देवेंद्र फडणवीस म्हणाले, "तुम्ही नव्हता तेव्हापर्यंत सभागृह नीट चालू होतं."
 
मुख्यमंत्री म्हणाले, “तुम्ही ते मॉलमध्ये जाऊन काहीही करणार मग काय ….?"
 
जितेंद्र आव्हाड बोलण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना खाली बसवलं. मुख्यमंत्री म्हणाले, “जितेंद्र आव्हाड मित्र आहेत माझे ...” त्यावर आव्हाड खाली बसून म्हणाले, "असे मित्र नको रे बाबा ..!"
 
मुख्यमंत्री पुढे बोलू लागले, “मी लोकसेवा आयोगाला निवडणूक आयोग म्हटलं. तुम्ही चार वेळा निवडणूक आयोग... निवडणूक आयोग असं म्हणालात. निवडणूक आयोग असो किंवा लोकसेवा आयोग .रिझल्टला महत्त्व आहे. मी बोललो तर बोललो. त्यासंदर्भात यशवंतराव चव्हाणांच्या पुतळ्याजवळ आत्मक्लेश करायला नाही गेलो."
 
अजित पवार त्यावर खाली बसून म्हणाले, "हो मी म्हणालो होतो. पण त्याला आता 10 वर्षं झाली. जे काही आहे ताजं बोला."
 
तितक्यात फडणवीस म्हणाले, "त्यानंतर बोलायचं सोडलं." त्यावर फडणवीस आणि अजित पवार हे एकमेकांकडे बघून हसायला लागले.
 
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून अनेक राजकीय अर्थ निघाले होते. पण जे काही होतं ते अर्धवट… कशाचा सरळ अर्थ काढता येईल त्याला राजकारण कसं म्हणता येईल?
 
 
Published By- Priya Dixit