संजय राऊतांवर कारवाई का झाली? काय आहे १ हजार कोटींचा घोटाळा?
सध्या महाराष्ट्रात एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस येत असून डीईच्या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यातच सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी होत आहेत. ईडीने पुन्हा एकदा शिवसेना नेत्यावर कारवाई केली असून ईडीने खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबाची आणि कंपनीची कोट्यवधींची संपत्ती जप्त केली आहे.या कारवाईनंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. हा घोटाळा एक हजार कोटींहून अधिक असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. दुसरीकडे संजय राऊत यांनी आपण घाबरण्यासारखे काही केले नाही, असे म्हटले आहे. राऊत म्हणाले की, मी नीरव मोदी किंवा अंबानी, अदानी नाही. मी एका छोट्या घरात राहतो. माझी कष्टाने कमावलेली मालमत्ता असून ईडी याला घोटाळा म्हणत आहे.दरम्यान, खंडणीच्या आरोपाखाली महाराष्ट्र सरकारने ईडीच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध विशेष तपास पथक स्थापन केले आहे. त्याच वेळी संजय राऊत यांच्यावर आरोप करण्यात आलेला १ हजार कोटींचा घोटाळा काय आहे आणि त्यात त्यांच्या पत्नी आणि मित्राचे नाव का आले आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ईडीने संजय राऊत यांची पत्नी आणि मित्र प्रवीण राऊत यांची ११ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ घोटाळा प्रकरणाची ईडी चौकशी करत होती. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असून ते गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पात त्यांचा सहभाग होता. येथे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे ४७ एकर जागा होती. येथे ६७२ भाडेकरूंना घरे देण्यात आली.प्रवीण राऊत यांना पत्रा चाळ प्रकल्प विकसित करण्याचे काम देण्यात आले जेणेकरून ६७२ भाडेकरूंचा बंदोबस्त करता येईल. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडने म्हाडा आणि भाडेकरू यांच्यात त्रिपक्षीय कराराद्वारे प्रकल्प विकसित करण्याचे काम हाती घेतले होते. इथूनच या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली.
आर्थिक तपास संस्थेच्या म्हणण्यानुसार, प्रवीण राऊत यांच्यासह एचडीआयएल राकेश कुमार वाधवन, सारंग वाधवन आणि गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे आणखी एक संचालक यांनी फ्लोर स्पेस इंडेक्सची बेकायदेशीरपणे विक्री केली. फ्लोअर स्पेस इंडेक्स हे असे क्षेत्र आहे, ज्यामध्ये बिल्डरला फ्लॅट बांधण्याची परवानगी आहे. मात्र ही जागा वेगवेगळ्या बिल्डरांना १०३४ कोटींना विकली गेली.ईडीचे म्हणणे आहे की, जमीन विकताना जमिनीच्या किमतीव्यतिरिक्त रोख रक्कमही देण्यात आली होती. प्रवीण राऊत यांची ही मालमत्ता व इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते. प्रवीण राऊतला ईडीने दि. २ फेब्रुवारीला अटक केली होती. तो आता जामिनावर बाहेर आहे. आज त्यांची ९ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्यात काही भूखंड आणि जमिनीचा समावेश आहे. तसेच ही जमीन महाराष्ट्रातील पालघर, सफाळे आणि पडघा येथे आहे.