सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 18 मार्च 2024 (09:05 IST)

राष्ट्रवादी काँगेस आणि शिवसेनेत फूट का पडली? यावर फडणवीसांचे मोठे वक्तव्य

devendra fadnavis
“राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट का पडली? पक्ष फुटण्याचे कारण काय? तर अजित पवार यांना राजकीय वारसदार म्हणून आधी पुढं आणलं आणि नंतर वरिष्ठांना वाटलं की पुतण्याऐवजी मुलीकडे पक्ष जायला हवा. हेच शिवसेनेतही झालं. उद्धव ठाकरेंना वाटलं, पक्ष किंवा राजकारणात आदित्य ठाकरेंना पुढं आणलं पाहीजे.
 
यासाठी त्यांनी आपली मूळ विचारधारा सोडून दुसऱ्या विचारधारेला स्वीकारलं. त्यामुळं त्यांच्या पक्षात फूट पडली”, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. “काँग्रेस न होती तो क्या होता”, या पुस्तकाचे प्रकाशन आज फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर भाष्य केलं.
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष तयार झाले. या पक्षांनी काँग्रेसच्या राजकारणाची शैली स्वीकारली. काँग्रेसने घराणेशाही आणि पैशांच्या जोरावर राजकारण करण्याचा पायंडा पाडला. मात्र भाजपा हा एकमेव पक्ष होता, ज्याने काँग्रेसच्या विचारधारेला, त्यांच्या राजकारणाच्या शैलीला नाकारले आणि स्वतंत्र शैली विकसित केली.
 
“घराणेशाहीच्या राजकारणाचे कंबरडे मोडण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं. केवळ पुढाऱ्याचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून यापुढे कुणीही राजकारणात दिसणार नाही. ज्याच्यात क्षमता आहे, तो स्वतःच्या हिंमतीवर पुढे जाईल, अशाप्रकारच्या राजकारणाच्या दिशेने आम्ही चाललो आहोत”, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
 
“भाजपाने घराणेशाहीच्या राजकारणाला विरोध केला असला तरी कुणालाही राजकारणात येण्यापासून रोखलेले नाही. जर राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीला राजकारणात यायचं असेल तर त्यांनी जरूर यावं. पण स्वतःच्या ताकदीवर यावं. राजकारणाला स्वतःचा हक्क समजून येऊ नये. जे लोक योग्य आहेत, त्यांना डावलून जेव्हा फक्त आपल्या कुटुंबातील लोकांवरच लक्ष केंद्रीत केलं जातं, त्याला घराणेशाहीचं राजकारण म्हणतात.
 
काँग्रेसमध्ये नेहरूंच्या घराण्यातील व्यक्तीकडेच नेता म्हणून पाहिलं जातं. आज मल्लिकार्जुन खरगे भलेही काँग्रेसचे अध्यक्ष असतील पण त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. हे सर्वांना माहीत आहे”, असंही ते म्हणाले.
Edited By - Ratnadeep Ranshoor