गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (08:29 IST)

नव्या वर्षात विरोधकांचे अनेक घोटाळे समोर आणणार नवाब मलिक

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपने १९ पैकी ११ जागा जिंकत बँकेवरील आपले वर्चस्व सिद्ध केले. भाजपचा हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. या विजयानंतर भाजपने महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. विशेषत: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचा समाचार घेतला. आता भाजपच्या या टीकेला राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
गल्लीत क्रिकेट जिंकणाऱे वर्ल्ड कप जिंकू असे म्हणत आहेत, असं म्हणत मलिक यांनी नारायण राणे तसेच भाजपवर हल्लाबोल केला. नव्या वर्षात विरोधकांचे अनेक घोटाळे समोर आणणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
 
यावेळी मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावरही निशाणा साधला. फर्जीवाड्याचा माझा लढा सुरु राहील. हा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे. १८ कोटींची डील ५० लाखांची वसुली याचा काय अहवाल आला आहे ? जनतेच्या पैशांवर अधिकारी लोक पैसे वाया घालवतात हे कधीपर्यंत चालणार आहे ? असा तिखट सवाल उपस्थित करत आम्ही कोर्टाची लढाई लढू. लवकरच सत्य समोर येईल. तसेच माझ्यावर कोणी कितीही अब्रुनुकसानीचा दावा करुद्या, मी थांबणार नाही, असेही ते म्हणाले .
 
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले . मात्र भाजपचे नेतेच या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. कोरोनाचे नाव पुढे करून निवडणुक पुढे ढकलण्याचा डाव करु नका. नियम पाळत निवडणुका होऊ शकतात, असे मलिक म्हणाले आहेत.