सावे साहेब मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदललाय, मी देवेंद्रंना दहा वेळा सांगतोय सावेंना सांगा
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर इथं हे अधिवेशन पार पडत आहे. त्यामुळे सर्वच मंत्री, आमदार नागपुरात दाखल झाले आहेत. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधिमंडळ पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केले.
सभागृह सुरू होण्यापूर्वी विधान भवन परिसरात मंत्री अतुल सावे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार एकमेकांना भेटले. यावेळी अजित दादांनी मंत्री सावे यांना मिश्किल टोला लगावत त्यांचा खरपूस समाचार घेतला. अजित पवार म्हणाले की, सावे साहेब मंत्री झाल्यापासून तुम्ही इतके बदललाय, मी देवेंद्रंना दहा वेळा सांगतोय सावेंना सांगा, इतकं तुटक तुटक नसतं राहायचं. सत्ता येत असते, सत्ता जात असते माणसं जोडायची असतात असं अजित पवारांनी म्हटलं. त्यानंतर माझा स्वभाव दादा तुम्हाला माहित्येय असं उत्तर मंत्र्यांनी दिले. सभागृहाबाहेर महापुरुषांची पुस्तके मंत्र्यांना भेट म्हणून दिली जात होती. अजित पवारांनी ही पुस्तकं अतुल सावे यांना दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor