मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

त्याच्या कॉटखाली स्फोटक जिलेटीन ठेवून स्फोट घडवून तरुणाचा खून

कोण कोणाचा कसा काटा काढेल हे सांगता येत नाही. अशीच घटना जळगाव येथे घडली आहे. यामध्ये जिलेटीनचा स्फोट घडवून २२ वर्षीय तरूणाचा खून केल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे आज घडली. 
 
जिलेटीनचा स्फोट घडवून तरुणाचा खून केल्यामुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. या प्रकारामुळे गावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आकाश कोळी (वय-२२) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आकाश नेहमीप्रमाणे घराच्या अंगणामध्ये कॉटवर झोपला होता. कॉटच्या खाली ठेवण्यात आलेल्या जिलेटीनचा अचानक स्फोट झाला. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. 
 
जिलेटीनच्या स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी स्फोट झाल्याचे दिसून आले.नागरिकांनी या घटनेची माहिती मुक्ताईनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. यावेळी आकाश ज्या कॉटवर झोपला होता. त्या कॉटखाली जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. त्यामुळे जिलेटीनचा स्फोट करुन आकाशला उडविण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली. या प्रकारामुळे पोलीस देखील चक्रावून गेले. आकाशचा खून कोणी आणि कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
 
घटनेनंतर गावामध्ये पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच घटनास्थळी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.