गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. रशिया - युक्रेन संघर्ष
Written By
Last Modified: गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (13:26 IST)

रशिया युक्रेन : दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांत नेमके कसे आहेत, रशियाला ते का पाहिजेत?

युक्रेनच्या पूर्वेकडील 2 प्रांत सध्या रशियासोबतच्या वादाचं केंद्र आहेत. फुटीरतावाद्यांच्या ताब्यातल्या या भागात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सैन्य कारवाई सुरू केली आहे. या प्रांतांना रशिया स्वतंत्र भाग म्हणून मानणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काय आहेत हे दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांत?
 
2014 मध्ये या दोन्ही भागांचा ताबा फुटीरतावाद्यांनी घेतला आणि तेव्हापासून त्यांनी दोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक (Donetsk People's Republic - DNR) आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक (Luhansk People's Republic - LNR) च्या स्थापनेची घोषणा केली आहे. या दोन्ही भागांच्या सीमा रशियाला लागून आहेत.
 
या दोन्ही प्रांतांनी स्वतंत्र अस्तित्त्वं जाहीर केलं असलं तरी आर्थिक आणि लष्करी पाठबळासाठी ते पूर्णपणे रशियावर अवलंबून आहेत.
 
हे भाग 'ताप्तुरता ताबा असलेले प्रदेश' म्हणजेच "temporarily occupied territories" असल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे. क्रायमियाबाबतही युक्रेनचं हेच म्हणणं आहे. 2014मध्ये रशियाने इथे घुसत या भागाचा ताबा घेतला.
 
दोनेत्स्क पीपल्स रिपब्लिक आणि लुहान्स्क पीपल्स रिपब्लिकमध्ये 2018 मध्ये निवडणुका झाल्या. या निवडणुकांना आंतरराष्ट्रीय मान्यता देण्यात आली नाही. यामध्ये अनुक्रमे डेनिस पुशिलिन आणि लिओनिड पेसाश्निक यांचा विजय झाला आणि या दोघांनीही आपल्या प्रांतांनी रशियाचा भाग व्हावं असं आवाहन केलं आहे.
 
लुहान्स्क आणि दोनेत्स्क नकाशावर कुठे आहेत?
फुटलेले हे दोन्ही भाग दोनबास नदीच्या खोऱ्यात येतात. दोनबास नदी खोऱ्यातला भाग हा रशियाचा भूभाग असल्याचं Russian Donbas Doctrine म्हणतं.
 
हे दोन्ही प्रांत ज्या जमिनीवर आहेत ती युक्रेनची असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय. पण रशियाचं सैन्य आता या बंडखोरांच्या ताब्यातल्या भागातच थांबणार की दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतातून पुढे सरकणार हे अजून स्पष्ट नाही.
 
कोळशाच्या खाणी
19व्या शतकाच्या उत्तरार्धात दोनेत्स्क हे कोळसा खाणींचं केंद्र होतं.
 
या भागाचं मूळ नाव होतं युझोव्का किंवा युझिव्का. या भागामध्ये स्टीलचा कारखाना आणि काही कोळसा खाणी सुरू करणारे वेल्श उद्योगपती जॉन ह्यूजेस यांच्यावरून हे नाव आलं होतं.
 
सोव्हिएत काळात इथला स्टील उद्योग वाढला आणि इथल्या फॅक्टरी आणि कोळसा खाणींमध्ये काम करण्यासाठी अनेक रशियन भाषक कामागारांना या प्रांतात पाठवण्यात आलं.
 
1924मध्ये या शहराचं नाव स्टॅलिन करण्यात आलं, 1929मध्ये स्टॅलिनो आणि शेवटी 1961 मध्ये दोनेत्स्क करण्यात आलं.
 
लुहान्स्क आणि दोनेत्स्कमध्ये काय घडतंय?
1990च्या दशकात सोव्हिएत संघ फुटल्यानंतर हे दोन्ही प्रांत स्वतंत्र युक्रेनचा भाग झाले. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे युक्रेन हा सोव्हिएतचाच भाग असल्याचं मानतात आणि आपल्यामते रशियन आणि युक्रेनियन लोक 'एकच' असल्याचं त्यांनी लिहीलंही होतं.
 
रशियाचा पाठिंबा असलेले बंडखोर आणि युक्रेनियन राष्ट्रवादी नागरिकांमध्ये 2014मध्ये हिंसक झटापटी झाल्या आणि या भागात अशांतता निर्माण झाली.
 
बंडखोरांच्या ताब्यातले हे भाग युक्रेनपासून अधिकाधिक तोडण्यात आले असून रशियासोबतची राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक जवळीक अधिक वाढल्याचं वॉशिंग्टनमधील सेंटर फॉर युरोपियन पॉलिसी अॅनालिसीस (CEPA) च्या संशोधक नतालिया सवेलयेवा सांगतात.
 
हे दोन्ही प्रांत अधिकृतरित्या रशियाचा हिस्सा नसले तरी दोनबास भागातल्या सुमारे साडेसात लाख नागरिकांकडे आता रशियन पासपोर्ट आहेत आणि ते रशियाच्या निवडणुकीत मतदान करू शकतात.
 
यामुळेच त्यांना रशियन सोशल सिक्युरिटी आणि पेन्शन योजनांचाही लाभ मिळतो आणि रशियामध्ये नोकरी करणं त्यांच्यासाठी सोपं होतं.
 
या भागांतल्या अनेक लोकांना रशियासोबत जवळीक वाटत असली तरी युक्रेनमध्येच राहण्याची इच्छा असलेलेही काही आहेत.
 
"त्यांनी आमची जमीन बेकादेशीरपणे घेतली. क्रायमियाबाबतही तेच झालं. मला कळत नाही ते (पुतिन) असं धोरण का राबवतात," दोनेत्स्कमधल्या स्लोवेन्स्क भागात राहणाऱ्या 61 वर्षांच्या लुडमिला सांगतात.
 
पण आता बदलाची वेळ आली असल्याचं दुसरे एक रहिवासी नाव न सांगण्याच्या अटीवर बोलून दाखवतात. "कोणीतरी निर्णय घेण्याची वेळ आलीच होती. ही बाजू किंवा ती बाजू. कदाचित यामुळे काही बदल होतील. आमच्या भागासाठी हे चांगलं ठरेल अशी मला आशा आहे."
 
युक्रेन निवडणूक
वैद्यकीय मदतीसाठी किंवा सरकारच्या योजनांच्या पैसे घेण्यासाठी युक्रेनच्या मुख्य भूमीत जाणं दोनबास भागातल्य रहिवाशांसाठी दिवसेंदिवस कठीण होतंय.
 
2014 -2015 च्या तणावानंतर या दोन भागांतून युक्रेनच्या इतर भागांमध्ये ये जा करणाऱ्यांची संख्या घटली. त्यानंतर जागतिक साथीच्या काळामध्ये सीमा बंद झाल्याने पुन्हा ही संख्या घटली. गेल्या काही काळा हे प्रमाण थोडं वाढलं असलं तरी एकूण संख्या अजून कमीच आहे.
 
डॉ. नतालिया सवेलयेवा सांगतात, "युक्रेनसोबतचे सगळे सांस्कृतिक संबंध तोडण्याचा एकीकडे प्रयत्न होतोय तर दुसरीकडे रशियासोबतच राजकीय जवळीक साधली जातेय."
 
युक्रेनियन आणि रशियन भाषा
दोनेत्स्क आणि लुहान्स्क या दोन्ही प्रांतांनी 2020मध्ये युक्रेनियन भाषेचा राजभाषेचा दर्जा काढून टाकला आणि फक्त रशियन ही अधिकृत भाषा करण्यात आली. इथल्या स्थानिक शाळांनी युक्रेनियन भाषा आणि इतिहास दोन्ही शिकवणं थांबवलंय.
 
"परिणामी या वादाच्या पूर्वी जन्म झालेल्या मुलांना युक्रेनियन इतिहास (कुटुंबांनी खासगीत सांगितल्याखेरीज) समजतंच नाही," डॉ. सवेलयेवा सांगतात.
 
या दोन्ही प्रांतांना पुतिन यांनी 22 फेब्रुवारी रोजी स्वतंत्र म्हणून मान्यता दिली.
 
रशिया युक्रेनमध्ये घुसखोरी करतोय का?
फुटलेल्या या दोन्ही प्रांतांना मान्यता दिल्यानंतर पुतिन यांनी त्यांच्या सैन्याला 'शांतता राखण्याच्या मोहीमेसाठी' दोनेत्स्क आणि लुहान्स्क प्रांतात पाठवलं आहे. याचाच अर्थ रशियाचं सैन्य युक्रेन प्रजासत्ताकाच्या भूभागात आहे.
 
दोनेत्स्क आणि लुहान्स्कच्या नकाशांची पुनर्आखणी?
या भागांतल्या बंडखोर नेत्यांनी त्यांच्या ताब्यातील भूभाग वाढवण्याचा प्रयत्न केला तर दोनेत्स्क आणि लुहान्स्कमधला तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.
 
आतापर्यंत पश्चिमेतल्या देशांनी मॉस्कोवर निर्बंध जाहीर करत पावलं उचललेली आहेत.