1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated : सोमवार, 6 जून 2022 (12:27 IST)

छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा

shivaji maharaj aarti
रायगडावर 6 जून इ.स. 1674 रोजी छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा गागाभट्ट यांनी राज्याभिषेक झाला. सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. शिवराज्यभिषेकासाठी देशातील कानाकोपऱ्यांतून ब्राह्मणांना आमंत्रण देण्यात आले होते. सुमारे 11000 ब्राह्मण आणि इतर लोक मिळून जवळपास लाखभर लोक रायगडावर जमा झाले होते.
 
तब्बल चार महिने पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्था, चविष्ट पक्वाने अशी जय्यत तयारी केली गेली. या सोहळ्यात ब्राह्मण, श्रीमंत गणमान्य व्यक्ती. दुसऱ्या राज्यांचे प्रतिनिधी, विदेशी व्यापारी आणि सामान्य जनता असे सर्वच उपस्थित झाले होते. या सोहळ्यासाठी साडेचार हजार राजांना निमंत्रणे गेली होती.
 
राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी विविध मंदिरांत जाऊन देवर्शन केले. सव्वा मण सोन्याची छत्री भवानी मातेस अर्पण केली. नंतर 21 मे पासून ते रागयगडावर धार्मिक विधीत ते गुंतून गेले. महाराजांनी 28 मे ला प्रायश्चित्त केले जानवे परिधान केले. दुसऱ्या दिवशी दोन राण्यांबरोबर पुन्हा विवाह सोहळा साजरा केला.
 
दुसऱ्या दिवशी महाराजांची सोने, चांदी, तांबे, जस्त, कथील, शिसे, लोखंड अशा सात धातूंनी वेगवेगळी तुला भरण्यात आली. याशिवाय वस्त्र, कापूर, मीठ,खिळे,मसाले,लोणी,साखर,फळे इत्यादींच्या तुला झाल्या. लाखभर होन ब्राह्मणांना देण्यात आले.
 
राज्याभिषेकच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेकचा सोहळा सुरू झाला. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला गेला. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली. आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला.
दालन 32 शकुन चिन्हांनी सजवलेले होते. शिवाजी महाराज 32 मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत 'शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला.या निमित्ताने खूप दान धर्म देखील केला गेला.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार सर्वत्र होऊ लागला.
 
महाराsssssज गडपती,गजअश्वपती,भूपती,प्रजापती,सुवर्णरत्न श्रीपती,अष्टवधानजागृत अष्टप्रधानवेष्टित, न्यायालंकारमंडित, शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत, राजनितिधुरंधर प्रौढप्रतापपुरंदर, क्षत्रियकुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो.