गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मोनाको , बुधवार, 20 फेब्रुवारी 2019 (09:04 IST)

नोव्हाक जोकोविच ठरला “सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’

सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने कयलीन एम्बाप्पे, इलियुद किपचोगे आणि लेब्रोन जेम्स यांना पिछाडीवर टाकत प्रतिष्ठित लॉरेस पुरस्कारावर नाव कोरले. त्याने वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूला दिला जाणारा “सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू’चा पुरस्कार पटकाविला. तर जिम्नास्ट सिमोन बाइल्स, दिग्गज गोल्फर टाइगर वुड्‌स आणि फुटबॉल विश्‍वचषक विजेता फ्रान्सच्या संघाने 2019 लॉरेस जागतिक खेळ पुरस्कार जिंकले.
 
कोपराच्या दुखापतीतून सावरत नोव्हाकने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनसह सलग तीन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकण्याची किमया साधली आहे. या कामगिरीसह त्याने चौथ्यांदा पुरस्कार जिंकत उसेन बोल्टच्या चार लॉरेस पुरस्कारांशी बरोबरी साधली तर रॉजर फेडररने हा पुरस्कार सर्वाधिक पाच वेळा जिंकण्याचा विक्रम केला आहे.
 
महिलांमध्ये अमेरिकेची जिम्नॅस्ट सिमोन बाइल्सला वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तिने जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत विक्रम प्रस्थापित करत चार सुवर्णपदके, एक रौप्यपदक तर एक कांस्यपदक पटकाविले होते. 2017 मध्ये देखील तिने हा पुरस्कार पटकाविला होता.
 
2018 मध्ये रशिया येथे झालेला फुटबॉल विश्‍वचषक फ्रान्स संघाने जिंकला. त्यामुळे फ्रान्स राष्ट्रीय फुटबॉल संघाला वर्षातील सर्वोत्कृष्ट संघासाठीच्या लॉरेस पुरस्काराने गौरवण्यात आले. मागील वर्षी देखील त्यांनीच हा पुरस्कार पटकाविला होता. त्यामुळे सलग दोन वेळा या प्रकारात पुरस्कार पटकविण्याचा विक्रम फ्रान्सच्या नावे नोंदवला गेला आहे. अमेरिकन ओपन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत सेरेना विलियम्सला पराभूत करून जपानची नाओमी ओसाकाने ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती जपानची पहिलीच खेळाडू ठरली होती. त्यामुळे तिला “ब्रेकथ्रू ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
गोल्फपटू टायगर वुड्‌स यांना पुनरागमन करणारा सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून निवडण्यात आले. ते हा पुरस्कार घेण्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. याअगोदर त्यांना 2000 आणि 2001 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. याच विभागात भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला नामांकन लाभले होते; परंतु ती पुरस्कार पटकावू शकली नाही. झारखंडमधील ग्रामीण क्षेत्रात कार्य करणारी संस्था “युवा’ला “लॉरेस स्पोर्ट फॉर गुड’साठी निवडण्यात आले. ही संस्था फ़ुटबॉलच्या माध्यमातून वंचित मुलींच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करते. तर फुटबॉल व्यवस्थापक आर्सेन वेंगर यांना 22 वर्षे आर्सेनल संघाच्या व्यवस्थापकपदी कार्यरत राहिल्याबाबत “लॉरेस जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.