1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (09:03 IST)

‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’ च्या पदक विजेत्यांना राज्य सरकारकडून बक्षीस

केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित द्वितीय ‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’ मध्ये तब्बल २२७ पदके प्राप्त करून महाराष्ट्र राज्य देशात अव्वल ठरले आहे. खेळाडूंच्या गुणवत्ता उंचावण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्यावतीने सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख रूपये, रौप्य पदक विजेत्यांना ७५ हजार तर कास्य पदक विजेत्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे पारितोषिक जाहीर केले आहे, अशी घोषणा आज क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केली.
 
‘खेलो इंडिया युथ गेम्स २०१९’ नुकतीच पुणे येथे यशस्विरित्या पार पडली. राष्ट्रस्तरीय या गेम्समध्ये महाराष्ट्राला ८५ सुवर्ण, ६१ रौप्य आणि ८१ कांस्य अशी पदके मिळविण्याचा मान मिळाला आहे. या खेळाडूंचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. राज्यातील उत्तोमोत्तम खेळाडूंना तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य शासन नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगत तावडे म्हणाले की, या विजयानंतर खेळाडूंची जबाबदारी आणखीनच वाढली असून, सर्वांच्या अपेक्षाही खेळाडूंकडून वाढल्या आहेत. आगामी आशियाई आणि २०२८ मधील ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचा तिरंगा फडकवण्याचे ध्येय खेळाडूंनी आता ठेवावे, असे आवाहन विनोद तावडे यांनी यावेळी केले.