शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: रविवार, 25 सप्टेंबर 2022 (11:22 IST)

विश्वविजेता मॅग्नस कार्लसनने पहिल्या चालीनंतरच डाव सोडला, बुद्धिबळ जगतात खळबळ

Magnus Carlsen
विश्वविजेता बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. त्याच्या एका कृत्याने जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्युलियस बेअर जनरेशन स्पर्धेत मॅग्नस कार्लसनने प्रतिस्पर्धी हान्स निमन्स याच्याविरुद्धच्या सामन्यात पहिल्या चालीनंतरच डाव सोडून दिला. कार्लसनने डाव सोडल्याने या सामन्यात निमनला विजयी घोषित करण्यात आलं.
 
प्रतिस्पर्धी उमेदवाराला पळता भुई थोडी करणारा बुद्धिबळपटू अशी मॅग्नस कार्लसनची ओळख आहे. शिवाय, बुद्धिबळ खेळात असा प्रकार अत्यंत दुर्मिळ मानला जातो. त्यामुळे कार्लसनच्या या कृत्याने बुद्धिबळ जगतात खळबळ माजली आहे.
 
या महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे प्रकरण सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे, हे आपण जाणून घेऊ..
 
काय आहे प्रकरण?
पाच लाख डॉलरचं बक्षीस असलेल्या सिंकफिल्ड स्पर्धेत या प्रकरणाची सुरुवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या फेरीत 3 सप्टेंबर रोजीच्या 31 वर्षीय कार्लसनची लढत 19 वर्षीय हान्स निमनविरुद्ध होती.
 
हान्स निमन हा खेळाडू जागतिक मानांकनात तुलनेने अत्यंत खाली असल्याने कार्लसनचा विजय निश्चित मानला जात होता. पण प्रत्यक्ष सामन्यात भलतंच घडल्याचं पाहायला मिळालं.
 
पांढऱ्या सोंगट्या घेऊन खेळत असल्याने सुरुवातीला कार्लसन आघाडीवर होता. सुरुवातीच्या टप्प्यात निमन थोडा घाबरल्याचं दिसून आलं. मात्र अखेर त्याने आघाडी घेऊन आपल्या डावपेचांमध्ये कार्लसनला अडकवलं.
 
अखेरीस, कार्लसनला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ग्रँडमास्टर लेव्हलच्या निमनने विश्वविजेत्या कार्लसनला पराभूत केल्यामुळे या पराभवाची जोरदार चर्चा झाली.
 
तब्बल 53 सामने पराभूत न झालेल्या, गेल्या दशकात बुद्धिबळ क्षेत्रावर राज्य करणाऱ्या कार्लसनच्या या पराभवाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
 
यानंतर, दोन्ही खेळाडू दुसऱ्या फेरीत पुन्हा समोर आले होते. पण या सामन्यात कार्लसनने केवळ दोन चाली खेळून डाव सोडून दिला.
 
या सामन्यानंतर कार्लसनने स्पर्धेतूनही माघार घेतली. याविषयी त्याने कोणतंही स्पष्टीकरण किंवा खुलासा केला नाही. जागतिक पातळीवरच्या खेळाडूने असं करणं हे अनपेक्षित आणि धक्कादायक मानलं जातं.
 
कार्लसनच्या कृत्याविषयी क्रीडा समीक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच त्याने एक ट्विट केलं.
 
यामध्ये त्याने प्रसिद्ध फुटबॉल संघ व्यवस्थापक जॉस मॉरिन्हो यांचा 8 सेकंदाचा एक व्हीडिओ पोस्ट केला होता. या व्हीडिओमध्ये मॉरिन्हो म्हणतात, जर मी काही बोललो तर मी अडचणीत येईन.
 
व्हीडिओसोबत कार्लसनने लिहिलं, "मी स्पर्धेतून माघार घेत आहे. सेंट लुईस चेस क्लबमध्ये खेळताना मी नेहमी खेळाचा आनंद घेतो. भविष्यात मी नक्कीच सहभागी होईन."
 
दरम्यान, कार्लसनने निमन संदर्भात उघड असं काहीही बोललेलं नाही. पण तरीही त्याच्या या भूमिकेचा संबंध चिटिंग प्रकरणाशी जोडण्यात आला. विशेष म्हणजे, यासंदर्भात कोणतेच ठोस पुरावे उपलब्ध नाहीत.
 
यानंतर, 8 सप्टेंबर रोजी Chess.com या बुद्धिबळच्या सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मने आपण हान्स निमन याला साईटवरून हटवत आहोत, अशी घोषणा केली.
 
निमनचं स्पष्टीकरण
हान्स निमनवर आरोप केले जात असताना एका मुलाखतीत त्याने आपली भूमिका स्पष्ट केली.
 
स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारे चिटिंग केल्याचं त्याने फेटाळून लावलं.
 
यावेळी तो म्हणाला, "मी कॉम्प्युटरच्या मदतीने 12 आणि 16 वर्षांचा असताना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये ऑनलाईन चिटिंग केली होती, हे मी मान्य करतो. पण सध्या आपण कधीच असा प्रकार केला नाही.
 
माझं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी मी नग्न होऊन डाव खेळण्यासही तयार आहे, असं निमन म्हणाला.
 
मॅग्नस कार्लसन, Chess.com आणि लोकप्रिय बुद्धिबळपटू हिराकू नाकामुरा हे माझं करिअर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही हान्स निमनने यावेळी केला.
 
स्पर्धेनंतर काही दिवसांनी Chess.com ने निमनवर लावलेले निर्बंध उठवून त्याला चेस 24 स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली.
 
कार्लसन-निमन पुन्हा आमनेसामने
सप्टेंबरच्या सुरुवातीला हे प्रकरण घडल्यानंतर 19 सप्टेंबर रोजी मॅग्नस कार्लसन आणि हान्स निमन पुन्हा आमने-सामने आले.
 
यावेळी निमनकडे पांढऱ्या सोंगट्या होत्या. त्याने राजासमोरील सैनिक दोन पाऊले पुढे चालवून डाव सुरू केला. प्रत्युत्तरात कार्लसनने सर्वप्रथम घोड्याची चाल खेळली.
 
यानंतर निमनने उंचासमोरील सैनिक दोन पाऊले पुढे नेला. यानंतर कार्लसनची फेरी असल्याने त्याने डाव खेळणं अपेक्षित होतं. पण त्याने तसं न करता डाव सोडून निमनला विजय बहाल केला.
 
या सामन्यात निमन विजयी झाला तरी तो स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकला नाही. क्वार्टर फायनल सामन्यात तो स्पर्धेबाहेर पडला.
 
कार्लसनवर टीका
आपल्या कारकिर्दीत इतर कोणत्याही खेळाडूविरुद्ध कधीच माघार न घेतलेल्या कार्लसनने गेल्या 15 दिवसांत दोनवेळा डाव सोडून दिला आहे.
 
विशेष म्हणजे, त्याने दोन्ही वेळी एकाच खेळाडूविरुद्ध अशा प्रकारे डाव सोडून दिला. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सर्वत्र जोर धरू लागली आहे.
 
कार्लसनला हान्स निमनविरुद्ध खेळायचेच नव्हते, तर त्याने सामना का सुरू केला, असा प्रश्न विचारला जात आहे.
 
हान्स निमन हा चिटिंग करूनच जिंकतो, असा समज झाल्याने कार्लसनने त्याच्याविरुद्ध ही भूमिका स्वीकारली, असं विश्लेषण तज्ज्ञांमार्फत केलं जात आहे.
 
जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेत ब्रिटनचं प्रतिनिधित्व करणारे एकमेव खेळाडू म्हणून ओळख असलेले ग्रँडमास्टर निगेल शॉर्ट यासंदर्भात म्हणतात, "निमनने कार्लसनविरुद्ध चिटिंग करून विजय मिळवला, याचा कोणताच पुरावा अद्याप उलब्ध नाही. पुरावा उपलब्ध नसताना एखाद्या खेळाडूविरुद्ध अशी भूमिका घेणं, चुकीचं आहे."
 
कार्लसन हा सर्वोत्कृष्ट खेळाडू असल्याच्या दबावाखाली आहे. त्याचंच प्रतिबिंब त्याच्या या कृत्यांमधून दिसत आहे, अशी टीकाही शॉर्ट यांनी केली.