गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (09:34 IST)

रॉजर फेडरर शेवटच्या सामन्यानंतर घळाघळा रडला...

टेनिस खेळाडू रॉजर फेडररने त्याच्या कारकीर्दीतला शेवटचा सामना लेव्हर कपमध्ये खेळला आणि निरोपाचं भाषण केलं. या भाषणात रॉजर फेडरर अक्षरश: रडला. त्यानं अश्रू ढाळतच आपलं निरोपाचं भाषण केलं. चाहते, कुटुंबीय, मित्र आणि टेनिसमधले इतर खेळाडू या सगळ्यांचे आभार मानत अत्यंत भावनिक होत भाषण केलं.
 
रॉजर फेडररचं निरोपाचं भाषण -
"आपण यातून पुढे जाऊ, कसंतरी. आजचा दिवस खरंच अद्भुत होता. मी सगळ्यांना सांगत होतो, मी आनंदी आहे, मी दु:खी नाहीय. इथं तुमच्यासमोर खूप बरं वाटतंय. शूज घालताना आनंदी होतो, पण हे सर्वकाही आता शेवटचं होतं. तरी फारसा त्रास झाला नाही, कारण तुम्ही सगळे इथे आलात - चाहते, कुटुंबीय, मित्र - असे सगळे.
 
"सामना सुद्धा चांगला झाला. याहून मोठा आनंद नाही. हे सर्व चमत्कारिक आणि अद्भुत आहे. आणि अर्थात, राफालसोबत एकाच टीममध्ये खेळणं, तसंच या सर्व श्रेष्ठ खेळाडूंसोबत, रॉकेट, एडबर्ग, स्टीफन... सगळ्यांचे आभार.
 
"एकटं वाटावं असं वाटत नव्हतं. पण तरीही जेव्हा ते म्हणाले की, तू बाहेर जा. तेव्हा काही क्षण थोडं एकटं वाटलं. मला खरंच छान वाटतंय, पण टीम म्हणून निरोप द्यायचाय, तसंही मी स्वत:ला मनापासून टीम प्लेयर म्हणूनच पाहिलं. पण एकेरी खेळताना हे करता येत नाही.
 
"माझी एक टीम आहे, जी माझ्यासोबत जगभर फिरली. त्यांच्यासोबत फिरताना मजा आली. इतकी वर्षे मला मदत करणाऱ्या सगळ्यांचे आभार. आणि अर्थातच, अँडी, थॉमस, नोवोक, माटेओ, कॅम, स्टेफानोस, राफा, कॅस्पर आणि पूर्ण टीम... तुम्ही सगळे अफलातून आहात. लेव्हर कपमध्ये तुम्हा सगळ्यांसोबत खेळताना मजा आली.
 
"हे सर्व माझ्यासाठी सेलिब्रेशनसारखं आहे. हे सर्व असंच व्हावं असं मला मनापासून वाटत होतं. त्यामुळे खूप खूप आभार.
 
"मी आतापर्यंत ठीकठाक केले आहे, असं मी किमान बोलू शकतो. आज इथं माझ्या कुटुंबातले बहुतांशजण उपस्थित आहेत. लग्नानंतरची 13 वर्षे आनंदाची राहिली आहेत. सगळे इथे आहेत, मुलं-मुली. माझी पत्नी तर माझं आधारवड आहे. तिने खूप साथ दिली. ती मला खूप आधी थांबवू शकली असती. पण तिनं तसं केलं नाही. तिने माझं खेळणं सुरू ठेवू दिलं, जगभर जाऊन खेळण्याची मुभा दिली. हे सर्व अद्भुत आहे. धन्यवाद.
 
"मला हे कायम आश्चर्यजनक वाटलंय की, आपण आपल्या आईवर सर्व ढकलून देतो. कारण तिच्याशिवाय मी इथवर आलोच नसतो. त्यामुळे माझ्या आई-वडिलांचे आभार. तुम्ही खूप अफलातून आहात. धन्यवाद.
 
"आणि सगळ्यांचे, सर्वा लोकांचे आभार. हे सर्व अविश्वसनीय आहे. अत्यंत विलक्षण रात्र आहे. सगळ्यांचे आभार."
 
रॉजर फेडररच्या आयुष्यातला 'तो' क्षण जेव्हा त्याला अश्रू अनावर झाले...
टेनिस खेळाडू रॉजर फेडररने निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीच्या घोषणेत फेडररने यापुढे ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
 
2000च्या दशकापासून अगदी आतापर्यंत रॉजर फेडरर- राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हिच या त्रिकुटाने ग्रँड स्लॅम जेतेपदांवर वर्चस्व राखलं आहे. फेडररच्या निवृत्तीसह त्रिकुटातला लखलखता तारा दृष्टिआड होणार आहे.
 
41वर्षीय फेडररच्या नावावर तब्बल 20 ग्रॅँड स्लॅम जेतेपदं आहेत. सर्वाधिक ग्रँड स्लॅम जेतेपदं पटकावणाऱ्यांच्या यादीत फेडरर तिसऱ्या स्थानी आहे.
 
फेडररच्या नावावर ऑस्ट्रेलियन ओपनची 6, फ्रेंच ओपनचं 1, विम्बल्डन स्पर्धेची 8 तर युएस ओपन स्पर्धेची 5 अशी एकूण 20 जेतेपदं नावावर आहेत.
 
रॉजर फेडरर सलग 237 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी होता.
 
2012 मध्ये फेडररने लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत स्वित्झर्लंडसाठी सुवर्णपदकही जिंकलं होतं.
 
चाहत्यांच्या नावे पत्र
रॉजर फेडरर ने निवृत्ती घेताना चाहत्यांच्या नावे एक निवेदन जारी केलं आहे. तो म्हणतो, "टेनिसने मला जे काही दिलं त्यातली सर्वोच्च भेट म्हणजे या प्रवासात भेटलेले लोक. मग ते माझे मित्र असो, स्पर्धक असो, माझे चाहते असो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा खेळ. आज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे."
"तुमच्यापैकी बहुतांश लोकांना माहिती असेल की गेल्या तीन वर्षांत दुखापतींनी आणि सर्जरींनी माझ्यासमोर आव्हानं उभी केली. त्यांना परतावून लावण्यासाठी मी जंग जंग पछाडले. मला माझ्या शरीराच्या मर्यादा माहिती आहेत. शरीराने मला जे संदेश दिलेत ते पुरेसे स्पष्ट आहेत. मी आता 41 वर्षांचा आहे. मी 1500 पेक्षा अधिक सामने गेल्या 24 वर्षांत खेळलो आहे. टेनिसने मला खूप काही दिलं आहे. त्याची मी खरंतर कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे कुठे थांबायचं हे मला कळायला हवं.
 
पुढच्या आठवड्यात लंडन मध्ये होणारा Laver cup माझी शेवटची ATP स्पर्धा असेल. मी भविष्यात टेनिस खेळेन पण आता ग्रँड स्लॅम स्पर्धा नाही."
 
हा निर्णय घेताना माझ्या भावना संमिश्र आहेत. टेनिस ने मला जे दिलं ते मी नक्कीच मिस करेन. मात्र त्याच वेळी साजरं करण्यासारखंही बरंच आहे. मी स्वत:ला अत्यंत नशीबवान समजतो. टेनिस खेळण्याठी मला विशेष प्रतिभा मिळाली आहे. मी जिथे पोहोचलो आहे तिथे पोहोचण्याची मी कल्पनाही केली नव्हती.
 
मी माझी पत्नी मिरकाचा मनापासून आभारी आहे. ती या प्रवासात प्रत्येक क्षणी माझ्या बरोबर होती. तिने अंतिम फेरीच्या आधी मला आधार दिला. माझ्या असंख्य मॅचेस तिने पाहिल्या. अगदी आठ महिन्यांची गरोदर असतानाही. मला आणि माझ्या टीमला तिने वीस वर्षं सहन केलं. माझ्या मुलांचे, पालकांचे, बहिणींचे, प्रशिक्षकांचे मी आभार मानतो.
 
रॉजहंसाचे राजाश्रू
तब्बल वीस ग्रँड स्लॅम जेतेपदांचा मानकरी असणाऱ्या फेडररचे चाहते जगभर पसरले आहेत. आज त्या तमाम चाहत्यांना त्याची ही खेळी नक्कीच आठवेल.
 
कुंचल्याने कॅनव्हासवर चित्र रेखाटावं त्या तरलतेने कोर्टरूपी कॅनव्हासवर टेनिसची मैफल सजवणारी फेडररची शैली वेगळी ठरते. विक्रमांची शिखरं गाठतानाही फेडररने जपलेली नम्रता केवळ युवा टेनिस पिढीसाठी नव्हे तर सर्वसामान्यांसाठीही प्रेरणादायी ठरते. यंदाच्या वर्षात फेडररने वयाच्या पस्तिशीतही ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. त्या क्षणी आणि जेतेपदाचा करंडक स्वीकारताना फेडररला अश्रू अनावर झाले होते. खेळताना दणकट बुरुजासारखा कणखरपणा दाखवणारा फेडरर जिंकल्यानंतर एवढा भावुक का होतो?
अश्रूंना वाट मोकळी करून देत जेतेपद साजरं करणाऱ्या रॉजर फेडररने साचेबद्ध प्रतिमांना वेळोवळी छेद दिला.
 
हे दृश्य होतं ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधल्या 'रॉड लेव्हर एरिना'मधलं. एका दिग्गज टेनिसपटूच्या नावानं प्रसिद्ध हे स्टेडियम रविवारीही खच्चून भरलेलं. रात्री दिसणारं तांबूस आकाश आणि फ्लडलाईट्सचा पिवळसर प्रकाश यांचं मिश्रण होऊन वेगळाच रंग आसमंतात विखुरलेला. आणि या आसमंताखाली पाचव्या सेटपर्यंत गेलेली टेनिसची मैफल जिंकून रॉजर फेडरर समाधानाने भरून पावलेला.
 
दुसरीकडे सहा-फूट-सात इंचीपेक्षाही अधिक उंची लाभलेल्या मारिन चिलीचच्या देहबोलीत उपविजेतं झाल्याची खंत पसरून राहिलेली.
 
फेडररला टिपण्यासाठी टेलिव्हिजन चॅनेलचे कॅमेरे आणि फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट जोशात आलेला. जेतेपदाचा चषक देण्याची औपचारिकता झाल्यावर फेडररचं भाषण सुरू होतं. दाटून आलेला आवंढा, लालबुंद झालेलं मोठं नाक आणि पापण्यांआड अनावर होऊ पाहणारा अश्रूंचा बांध थोपवून धरत फेडरर बोलतो.
 
विसावं ग्रँड स्लॅम नावाचं आव्हान किती खडतर होतं हे त्याच्या गदगदलेल्या अवस्थेतून स्पष्टपणे दिसतं. आपल्या टीमचे, कुटुंबीयांचे आभार मानताना अश्रू त्याच्याही नकळत ओघळू लागतात. त्या चंदेरी चषकाला जवळ घेऊन तो एखाद्या लहान मुलासारखा हमसून रडतो.
 
जेतेपद हे कौशल्य, चिकाटी, फिटनेस यांची हुकूमत सिद्ध करणारं असतं. पण फेडरर अपवाद आहे. फेडररच्या जिंकण्यात मुक्त झाल्याची भावना असते. 'ध्येयाप्रती सर्वोत्तम कौशल्य दिलं, जेतेपदासह ते साध्य केलं. रिता आलेलो- भरून जातोय, पण पुढचं जिंकण्यासाठी मला मोकळं होऊ द्या' अशी साद ते अश्रू घालतात.
सार्वजनिक ठिकाणी डोळ्यातले अश्रू वाहू देणं पुरुष मंडळींकरता बहुतांशवेळा अडचणीत आणणारं असतं. फेडररने या अश्रूंमागची मानसिकता बदलवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे.
 
'तू शेवटचं चारचौघात कधी रडला होतास?' असा प्रश्न तुम्ही आजूबाजूच्या कोणत्याही पुरुषाला विचारलं की तो क्षणभर तुमच्याकडे 'काय एकेक प्रश्न विचारतोय?' या नजरेने पाहील. त्याला या प्रश्नाचं आश्चर्यही वाटेल पण उत्तर देता येणार नाही. कारण त्याला आठवणारच नाही... कारण चारचौघात रडणं या कृतीची सामाजिक आणि नैतिक परवानगीच नाही पुरुषाला!
 
हे करायचं, हे करायचं नाही. याबद्दल विचारायचं नाही, चर्चा तर अजिबातच नाही, असे ठोकताळे आपण बऱ्याच गोष्टींविषयी करून घेतले आहेत. हे पूर्वापार चालत आलंय, आपणही तेच फॉलो करायचं. उगाच जिज्ञासा, ज्ञानपिपासू वृत्ती वगैरे इंटलेक्च्युअल गोष्टी सांगायच्या नाहीत! रडणं हे त्याच टॅबूंपैकी एक.
 
पण फेडररच्या त्या अश्रूंमागे कुठलाही PR स्टंट नाही. स्वत:चा ब्रँड विकण्याचं मार्केटिंग गिमिक नाही. विचारांचं-तयारीचं-कृतीचं-अविरत कष्टांचं एक मोठ्ठं वर्तुळ पूर्ण केल्याची भावना त्यामागे दाटलेली असते. कारण रॉजर फेडरर हा केवळ एक खेळाडू नाही. तो एक अनुभव आहे.
 
खेळाडूंचे चाहते असतात. फेडररचं इथेही वेगळं आहे. चाहत्यांना तो आपल्याच शरीराचा एक भाग वाटतो. म्हणूनच त्याचं जिंकणं-हरणंही तटस्थ न राहता खूप आतलं होतं.
 
अपेक्षांचं ओझं
फेडरर खेळतो तेव्हा तो जिंकावा यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी माणसं दुवा करतात. एक अदृश्य असं दुवांचं अर्थात पॉझिटीव्ह वाइब्सचं अद्भुत नेटवर्क फेडररकडे आहे. त्याची मेहनत आहेच पण तो खेळत असताना सगळ्या दुवा एकवटून त्याच्याभोवती अभेद्य कवच निर्माण व्हावं इतका तो दंतकथा वर्गात गेला आहे.
 
इतक्या सगळ्या आशाअपेक्षांचं ओझं तो गेली अनेक वर्षं वागवतोय. पण त्याने तो खचून जात नाही, त्याचं त्याला दडपण येत नाही, त्याने तो विचलित होत नाही. प्रत्येक ग्रँड स्लॅम स्पर्धेत तो स्वत:ला नव्याने सादर करतो. मागच्या स्पर्धेपेक्षा यावेळी त्याच्या भात्यात काहीतरी नवं असतं.
 
वाढतं वय लोकांना मागे नेतं. वाढतं वय फेडररला मुरलेल्या लोणच्यासारखं अधिक घोटीव करतं. तरुण वयाचे प्रतिस्पर्धी, टेनिसमध्ये येणारं नवनवीन तंत्रज्ञान, दुखापतींचं व्यवस्थापन, प्रतिकूल हवामान, असे एकेक डोंगर पार करत जेतेपदासह तो समेवर येतो आणि मुक्त होतो. ते अश्रू चमत्काराचे नसतात. मानवी क्षमता काय काय किमया घडवू शकते याचा ते अश्रू प्रत्यय देतात. ते अश्रू पाहणाऱ्याला प्रेरणा देणारे असतात. ते अश्रू उत्कट आणि उत्स्फूर्त असतात. त्यांना बेगडीपणाची झूल नसते. रडणं हे इतकं अर्थपूर्ण असतं, याची साक्ष फेडररला ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावल्यानंतर पाहताना मिळते.
 
कर्ता पुरुष होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निकषांपैकी एक म्हणजे न रडणं, अशी अलिखित शिकवण आपल्याकडे बिंबवली जाते. विज्ञानात डोकावलं तर रडण्याचे खूप सारे फायदे कळतात. मित्रवर्य गुगल याबाबत तपशीलवार माहितीही देतो. परंतु पुरुषाने चारचौघात रडण्याला अजिबातच अनुमती नाही. चारचौघांत तुम्ही असे कुठे रडलात तर पुरुषासारखा पुरुष असून काय रडतोस असे ऐकवलं जातं.
समाज संरचनेनुसार स्वत: अश्रू ढाळण्यापेक्षा लोकांचे अश्रू पुसण्याचं काम पुरुषाला नेमून दिलं जातं. भावना खरंतर प्रत्येकाला असतात, पण त्या व्यक्त करण्याची परवानगी आपला समाज पुरुषाला देत नाही.
 
सामान्य माणसाभोवती अफाट समस्या असतात. जागेचा प्रश्न, कौटुंबिक अडीअडचणी, प्रॉपर्टीचे वाद, नोकरी-व्यवसायातल्या ठोकरा, अपमान-विश्वासघात अशी अडचणींची मोठी मालगाडीच असते उभी. वाढत्या महागाईत घर-संसार डोलारा सांभाळताना जीव मेटाकुटीला येऊन रडकुंडीला येतो खरंतर पण अब्रमण्यम-सुब्रमण्यम... रडणं वगैरे कमकुवत मनाच्या लक्षण मानलं गेलेल्या कृतीचं नावही काढू नका... तुम्ही लढा, संघर्ष करा, धडपडा, उभे राहा- (झाल्यास विजिगीषु वृत्ती जागवणारं साहित्य वगैरे वाचा) पण रडू नका...!
 
तुम्हीच रडलात तर बाकीच्यांना कोण आधार देणार, हा विचार बिंबवून तुम्ही अश्रूंना पार रेटिनाच्या मागे ढकलून द्या...!
 
पोलिओपासून टीबीपर्यंत आजारासाठी लसी निघाल्या आहेत परंतु रडण्याद्वारे मोकळं होण्याची संधी नसल्यामुळे अश्रू तंबुवून जगणाऱ्या पुरुष मंडळींसाठी कुठलीच लस नाही. यातून एकप्रकारे मानसिक कुचंबणासदृश रोगांना आपण खतपाणी घालतो. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात यशाचा फेडरर मोमेंट येतोच. पण त्याच्यासारखं जाहीरपणे अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचं स्वातंत्र्य कधी मिळेल? फेडररचे अश्रू जितके मनाला आत जाऊन भिडतात तसं आजूबाजूच्या पुरुषांनी अनेक वर्ष रोखलेले अश्रू मोकळे झाले तर?
 
खेळात थरार असतो. जीव पणाला लागतो. देशासाठी खेळण्याचं निमित्त असतं. कोट्यवधींच्या आशाअपेक्षा असतात. जिंकणं-जेतेपद म्हणजे या सगळ्या अडथळ्यांना भेदून अत्युच्चपदी पोहोचणं. गायक मंडळी एखाद्या घराण्याची दीक्षा घेतात. फेडररचं घराणं टेनिस आहे. आता ते घराणं कायमचं लोप पावेल.