रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

कपूर कुटुंबातील असल्याचा अभिमान : रणबीर

PRPR
ऋषी कपूरचा मुलगा रणबीर कपूर 'सांवरीया' या चित्रपटातून अभिनय कारकीर्दीस सुरूवात करत आहे. संजय लीला भन्साळीसारख्या बड्या दिग्दर्शकाचा हा चित्रपट असल्याने साहजिकच प्रेक्षकांच्या त्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. येत्या 9 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने रणबीरशी केलेली चर्चा -

आर. के. बॅनरची महान चित्रपट परंपरा आहे. खुद्द कपूर कुटुंबातही ‍दिग्दर्शक आहेत. असे असूनही बाहेरच्या बॅनरमधून कारकीर्दीची सुरूवात का करावी लागत आहे?
-आम्ही चांगल्या कथानकाच्या शोधात होतो, मात्र मनाजोगतं कथानक गवसत नव्हतं. संजय लीला भन्साळींकडून अनपेक्षितपणे प्रस्ताव आला. त्यांचे कथानक उत्तम होतं. शिवाय स्वतः भन्साळी सर्जनशील दिग्दर्शक आहेत. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र, मी आर. के. बॅनरच्या चित्रपटामधून निश्चितच झळकेन.

तुझी तुलना वडील ऋषी कपूर किंवा आजोबा राज कपूर यांच्याशी केली जाईल, याचे काही दडपण जाणवते का?
- दबावास बळी पडल्यास मला निराशा येईल. महान चित्रपट परंपरा लाभलेल्या कपूर कुटुंबात जन्मल्याचा मला अभिमान आहे. चित्रपटसृष्टीस मोठे योगदान देणार्‍या त्यांच्यासारख्या कलाकारांशी माझी तुलना होऊच शकत नाही. मी स्वत:च त्यांचा चाहता आहे. माझ्या अभिनयाबाबतचा निर्णय प्रेक्षकच घेतील.

'सांवरीया' विषयी काही सांगशील.
हा प्रेमकथेवर आधारीत चित्रपट आहे. भन्साळींनी यावर फार काम केले आहे. यास संजय लीला भन्साळींचा चित्रपट म्हटल्यास अधिक योग्य ठरेल.

'सांवरीया' मध्ये तुला सलमान व राणी मुखर्जीसोबत अभिनयाची संधी मिळाली. तुझा अनुभव कसा होता?
- सलमानशी पडदा शेअर करण्याची संधी मला मिळाली नाही. मात्र, त्यांच्या व्यक्तीमत्वाने मी प्रभावित झालो आहे. त्यांच्याकडून मी अभिनयातले बारकावे शिकलो. राणी मुखर्जी अद्वितीय कलाकार आहे. त्यांनी मला नेहमीच मदत केली आहे. त्यांच्यासोबत अभिनयाची संधी मिळाल्याने मी खूपच आनंदी आहे.

तुझ्या वडिलांनी बहुतांश नवीन नायिकांसोबत अभिनय केला आहे. तुलाही तसे करायला आवडेल?
- माझ्या वडिलांची जोडी बहुतांश समकालीन नायिकांशी जुळली नव्हती. त्यामुळे त्यांना नवीन नायिकांशी अभिनय करावा लागला. माझ्यासमोर असल्या समस्या उद्भवणार नाही, याची आशा करतो. तसे पाहता मला नविन नायिकांशी काम करण्यात काहीही अडचण नाही.

तुझ्या ‍वडिलांनी 'सांवरिया' बघितला?
- नाही. ते अगदी मोकळ्या मनाचे आहेत. आढेवेढे न घेता ते आपले मत व्यक्त करतात. त्यामुळेच मला त्यांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे.

सोनमची खटकलेली एखादी गोष्ट?
-आहे ना. ती खूप बोलते.

राज कपूर किंवा संजय लीला भंन्साळी दोघांमधून दिग्दर्शकाची निवड करायची झाल्यास तू कुणास पसंती दिली असती?
-अर्थातच, राज कपूर यांना.

आगामी काळात तुला कसल्या प्रकारच्या भूमिका करायला आवडेल?
- मला कोणत्याही एका भूमिकेत अडकायचे नाही. प्रेमकथा, स्टंटपट, विनोदी सर्वच प्रकारच्या भूमिका करण्यात मला आनंद वाटेल.

'सांवरीया' व 'ओम शांती ओम' एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यामुळे तुझ्या चित्रपटावर परिणाम होणार, असे वाटते काय?
-शाहरूखमुळे 'ओम शांती ओम' विषयी उत्सुकता आहे. त्यांच्या चित्रपटास माझ्या शुभेच्छा आहेत. दोन्ही चित्रपट हिट होवो, अशी मी प्रार्थना करतो. मात्र, सांवरीयाने अधिक व्यवसाय करायला हवा.

राजकपूर दिग्दर्शित चित्रपट अभिनयाची संधी मिळाल्यास कोणता चित्रपट निवडशील?
- खरंच सांगू! श्री 420