रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. फिल्लमबाजी
Written By वेबदुनिया|

शब्द ज्याचे गुलजार...(वाढदिवस विशेष)

NDND
मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है मधील काळीज तुटलेपण, यारा सिली सिली विरह की रात का जलना मधील विरहाच्या काट्याची ठसठस किंवा मोरा गोरा अंग लै ले मधली प्रियकरातूर तरूणीची विव्हल भावावस्था....अशी तरल अभिव्यक्ती करणारे हात एकेकाळी हातात पाने घेऊन गाड्यांची दुरूस्ती करत होते असे सांगितले तर विश्वास बसेल? नाही ना? पण ठेवावाच लागेल. शब्द आणि अनुभव ज्यांच्या ओंजळीत येऊन मला अभिव्यक्त करा असे आर्जव करतात, त्या गुलजार यांच्या बाबतीत हे घडले होते.

गुलजार म्हणजे भारतीय चित्रसृष्टीला पडलेलं मधुर स्वप्न. हा शब्दब्रम्हाचा स्वामी संपूर्णसिंह हे कवीला अजिबात शोभत नसलेले नाव घेऊन वावरत होता असे सांगितले तर आज हसू येईल. पण ही वस्तुस्थिती आहे. आता पाकिस्तानात असलेल्या झेलम जिल्ह्यातील दीना हे गाव त्यांचे जन्मगाव. १८ ऑगस्ट १९३६ ला त्यांचा जन्म झाला.

शब्दांशी लडिवाळ खेळ करण्याची खोडी त्यांची लहानपणापासूनच. त्यावेळी शेर आणि शायरीचे त्यांना भारी आकर्षण. त्यापोटी अनेकदा अंताक्षरीच्या कार्यक्रमांनाही ते हजेरी लावायचे. त्याच्या जोडीला संगीताचाही त्यांना कान. त्यामुळे सूर कानावर पडले की हा संपूर्णसिंह तिथे गेला म्हणून समजा. रवीशंकर आणि अली अकबर खान हे त्यांचे आवडते कलावंत.

शब्द सूरांशी दोस्ताना जडला असतानाच देश स्वतंत्र झाला. आणि फाळणीही झाली. देशांची आणि मनांची सुद्धा. या घटनेचा ओऱखडा गुलजार यांच्या मनावर उमटला. अगदी कायमचा. निर्वासित असल्याचा शिक्का त्यांच्यावरही बसला. पाकिस्तानातील आपले गाव आणि गावाबरोबर असणारे संबंध सोडून देत त्यांचे कुटुंब अमृतसरला आले. अस्वस्थ असलेल्या गुलजार यांनी मग तेथे न थांबता मुंबईची वाट धरली. पण यशाची वाट बिकट होती. त्यासाठी पडेल ती काम करणे आलं. मग ते काम गॅरेजमध्ये मॅकेनिकचं का असेना.

मुंबईतल्या प्रवाहात मिसळताना मुंबईतील काव्य चळवळीशीही ते जोडले गेले. आणि त्याच शिडीद्वारेचित्रपटसृष्टीतही प्रवेश केला. सुरवातच या क्षेत्रातील दादा माणसाबरोबर झाली. बिमल रॉय यांच्याबरोबर. आणि चित्रपटही पुढे अविस्मरणीय ठरलेला. बंदिनी. नूतनच्या सहजसुंदर अभिनयाने गाजलेला. गुलजार त्यावेळी बिमल रॉय यांच्या हाताखाली सहाय्यक होते.

या चित्रटासाठी त्यांनी पहिलं गाणं लिहिलं. ज्या गाण्याने पुढे इतिहास निर्माण केला. गाण होतं, 'मेरा गोरा अंग लै लै, मोहे श्याम रंग दै दे'. प्रियकराला भेटायला जाणार्‍या प्रेयसीला लोकांच्या नजरा चुकवत जायचंय. त्यासाठी ती चंद्राला म्हणते माझा गोरा रंग तू घे आणि तुझ्यातील कृष्णवर्ण दे. किती तरल कल्पना? गुलजार यांच्या प्रतिभेची ओळख पटण्यासाठी एवढं गाणं पुरेसं होतं.

बंदिनीसाठी पहिलं गाणं लिहिलं तरी त्यांच्या भाळी यशस्वीतेचा टिळा लागला तो काबुलीवाल्याच्या निमित्ताने. कारण तो बंदिनीआधी प्रदर्शित झाला. काबुलीवालामधील ऐ मेरे प्यारे वतन आणि गंगा आए कहॉं से ही कधी विसरली जातील?

गुलजार यांच्या यशाचा मार्ग यानिमित्ताने मोकळा झाला. या प्रशस्त मार्गावरून त्यांचे शब्द सूरांच्या साथीने ऐटीत चालू लागले. त्यांचा यानंतरचा प्रवास म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुंदर, मधुर आणि अविस्मरणीय गीतांची मैफल आहे. १९७२ मध्ये तर परिचयच्या निमित्ताने आर. डी. बर्मन आणि गुलजार एकत्र आले आणि शब्दसूरांचा जणू सोहळा साजरा झाला. पुढे या जोडीने घातलेला शब्दसूरांचा मेळ म्हणजे म्हणजे रसिकांच्या आयुष्यातले कातर क्षण आहेत. ते कधीही काढून बसा. हळवं करून सोडतात.

खुशबू, आंधी, किनारा, देवता, घर, गोलमाल, खुबसुरत, नमकीन, मासूम, इजाजत, लिबास....यातील कुठलीही गाणी घ्या अवीट माधुर्याची अनुभूती आल्याशिवाय रहाणार नाही. या गाण्यातील भाव तुमच्याशी एकरूप नाही झाला बेशक सांगाल ते हारू.

शब्दांशी खेळ करणारा हा कवी १९७१ मध्ये दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही उतरला. मेरे अपने हा त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीचा पहिला चित्रपट. त्यानंतर कोशिश १९७१, परिचय १९७२, अचानक १९७३, 'खुशबू' 1975, 'आँधी' 1975, 'मौसम' 1975, 'किनारा', 'किताब' 1977, 'मीरा' 1979, 'नमकीन' 1982, 'अंगूर' 1982, 'इजाजत' 1987, 'लिबास' 1988, 'लेकिन' 1990, 'माचिस' 1996 और 'हू तू तू' हे त्यांचे चित्रपट. यातील प्रत्येकाची कथा वेगळी. त्यातील आशय वेगळा आहे.

दिग्दर्शनाशिवाय पटकथा आणि संवादलेखनही त्यांनी केले. कोशिश, हारजीत, बावर्ची, परिचय, अचानक, नमक हराम, खूशबू, चुपके-चुपके, आँधी, फरार, मौसम, पलकों की छाँव में, किताब, गृहप्रवेश, खूबसूरत, बसेरा, नमकीन, अंगूर, मौसम, इजाजत, मिर्जा गालिब, लेकिन, रूदाली, माचिस, चाची 420, हू तू तू आणि साथिया हे त्यांचे चित्रपट. याशिवाय १९७७ मधील किताब व किनारातून ते निर्मातेही बनले.

गुलजार यांना गीतलेखनासाठी नऊ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. १९७७ मध्ये घरौंदातील दो दिवाने शहरमे हे त्यांचे पुरस्कारप्राप्त पहिले गीत. 'आने वाला पल जाने वाला है' गोलमाल 1979, 'हजार राहें मुड़ के देखीं' थोड़ी-सी बेवफाई 1980, 'तुमसे नाराज नहीं जिंदगी' मासूम 1983, 'मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है' इजाजत 1988, 'यारा सिली सिली बिरह की रात का जलना' लेकिन 1991, 'चल छइया छइया' दिल से 1998, 'साथिया साथिया' 2002 और 'कजरारे कजरारे तेरे काले काले नैना' बंटी और बबली 2005 ही त्यांची अन्य पुरस्कारप्राप्त गीते.

गुलजार यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरविले गेले आहे. १९७२ मधील कोशिशसाठी सर्वश्रेष्ठ पटकथा, १९७५ मधील मौसमसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि १९८७ मधील इजाजतसाठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला आहे.

शिवाय त्यांचे अनेक कथा, कविता संग्रहही आहेत. रावीपार हा त्यांचा संग्रह खूप गाजला. लहान मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या एकता या काव्यसंग्रहाला एनसीईआरटीचे पारितोषकही मिळाले आहे. असा हा कवीमनाचा कलावंत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढंच म्हणता येईल, तुमच्यामुळे आमचं जगणं समृद्ध झालं. दुसरं काय?