गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्री स्वामी समर्थ
Written By

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा

श्री स्वामी चरित्र सारामृत नवमोध्याय
॥ श्री गणेशाय नमः ॥ घरोघरी स्वामीकीर्तने । नित्य होती ब्राह्मण-भोजने । स्वामीनामाची जप ध्याने अखंडित चालती ॥१॥ दिगंतरी गाजली ख्याती । कामना धरोनी चित्ती । बहुत लोक दर्शना येती । अक्कलकोट नगरात ॥२॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक । शूद्र आणि अनामिक । पारसी यवन भाविक । दर्शना येती धावोनी ॥३॥ यात्रेची गर्दी भारी । सदा आनंदमय नगरी । साधु संत ब्रह्मचारी । फकीर संन्यासी येती पै ॥४॥ किती वर्णावे महिमान । जेथे अवतरले परब्रह्म । ते नगरी वैकुंठधाम । प्रत्यक्ष भासू लागली ॥५॥ असो ऐशा नगरात । शंकरराव प्रवेशत । आनंदमय झाले चित्त । समाधान वाटले ॥६॥ यात्रेची झाली दाटी । कैशी होईल स्वामीभेटी । ही चिंता उपजली चित्ती । मग उपाय योजिला ॥७॥ जे होते स्वामीसेवक । त्यात सुंदराबाई मुख्य । स्वामीसेवा सकळिक । तिच्या हस्ते होतसे ॥८॥ तियेची घेऊनी गाठी । शंकरराव सांगती गोष्टी । करोनी द्याल स्वामीभेटी । तरी उपकार होतील ॥९॥ व्याधी दूर करावी म्हणोनी । विनंती कराल स्वामीचरणी । तरी आपणा लागोनी । द्रव्य काही देईन ॥१०॥ बाईसी द्रव्यलोभ पूर्ण । आनंदले तियेचे मन । म्हणे मी इतुके करीन । दोन सहस्त्र रुपये द्याल की ॥११॥ ते म्हणती बाईसी । इतुके कार्य जरी करिसी । तरी दहा सहस्त्र रुपयांसी । देईन सत्य वचन हे ॥१२॥ बाई विस्मित झाली अंतरी । ती म्हणे हे सत्य जरी । तरी उदक घेऊनी करी । संकल्प आपण सोडावा ॥१३॥ शंकरराव तैसे करिती । बाई आनंदली चित्ती । म्हणे मी प्रार्थुनिया स्वामीप्रती । कार्य आपुले करीन ॥१४॥ मग एके दिवशी यती । बैसले होते आनंदवृत्ति । शंकरराव दर्शन घेती । भाव चित्ती विशेष ॥१५॥ बाई स्वामींसी बोले वचन । हे गृहस्थ थोर कुलीन । परी पूर्वेकर्मे यालागून । ब्रह्मसमंध पीडितो ॥१६॥ तरी आता कृपा करोनी । मुक्त करावे व्याधीपासोनी । ऐसे ऐकता वरदानी । समर्थ तेथोनी उठले ॥१७॥ चालले गावाबाहेरी । आले शेखनुराचे दर्ग्यावरी । शंकररावही बरोबरी । त्या स्थळी पातले ॥१८॥ यवनस्मशानभूमीत । आले यतिराज त्वरीत । एका नूतन खाचेत । निजले छाटी टाकोनी ॥१९॥ सेवेकरी शंकररावासी । म्हणती लीला करून ऐसी । चुकविले तुमच्या मरणासी । निश्चय मानसी धरावा ॥२०॥ काही वेळ गेल्यावरी । उठली समर्थांची स्वारी । शेखनुराचे दर्ग्यावरी । येउनी पुढे चालले ॥२१॥ शंकररावे तया दिवशी । खाना दिधला फकिरांसी । आणि शेखनुरासी दर्ग्यासी । एक कफनी चढविली ॥२२॥ मग काही दिवस लोटत । स्वामीराज आज्ञापित । बारीक वाटूनी निंबपत्र । दहा मिरे त्यात घालावी ॥२३॥ ते घ्यावे हो औषध । तेणे जाईल ब्रह्मसमंध । जाहला स्वामीराज वैद्य । व्याधी पळे आपणची ॥२४॥ स्वामीवचनी धरुनी भाव । औषध घेती शंकरराव । तयासी आला अनुभव । दहा दिवस लोटले ॥२५॥ प्रकृतीसी आराम पडला । राव गेले स्वनगराला । काही मास लोटता तयाला । ब्रह्मसमंधे सोडिले ॥२६॥ मग पुन्हा आनंदेसी । दर्शना आले अक्कलकोटासी । घेउनी स्वामीदर्शनासी । आनंदित जाहले ॥२७॥ म्हणती व्याधी गेल्यानंतर । रुपये देईन दहा सहस्त्र । ऐसा केला निर्धार । त्याचे काय करावे ॥२८॥ महाराज आज्ञापिती । गावाबाहेर आहे मारुती । तेथे चुनेगच्ची निश्चिती । मठ तुम्ही बांधावा ॥२९॥ ऐशिया एकांत स्थानी । राहणार नाही कोणी । ऐसी विनंती स्वामीचरणी । कारभारी करिताती ॥३०॥ परि पुन्हा आज्ञा झाली । मठ बांधावा त्याच स्थळी । भुजंगादिक मंडळी । दाखविली जागा तयांनी ॥३१॥ सर्वानुमते तेथेचि । मठ बांधिला चुनेगच्ची । किर्ती शंकररावाची । अजरामर राहिली ॥३२॥ अगाध स्वामीचरित्र । तयाचा न लागेची पार । परी गंगोदक पवित्र । अल्प सेविता दोष जाती ॥३३॥ श्रवणी धरावा आदर । तेणे साधती इहपरत्र । जे झाले स्वामीकिंकर । विष्णू शंकर वंदिती त्या ॥३४॥ इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत भाविक भक्त । नवमोऽध्याय गोड हा ॥३५॥
 
॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥