1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By वेबदुनिया|

कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते. 

भारताच्या अमेरिकेतील राजदूत मीरा शंकर यांनी विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. विसाव्या शतकातील भारतातील महान नेत्यांपैकी एक आणि सामाजिक बदल आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते असलेल्या आंबेडकरांचा हा गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. आंबेडकरांना बडोद्याच्या महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते कोलंबिया विद्यापीठात शिकायला गेले होते. एमए केल्यानंतर डिएससी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये केले. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठात पीएचडी केली. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन सत्कार केला. पुढे १९९५ मध्ये बुद्दिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.

कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेवी यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेवीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेवी, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाईम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.