शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 26 डिसेंबर 2019 (09:32 IST)

अमृता फडणवीस : राजकारण्यांच्या बायकोची इमेज बदलणाऱ्या 'मिसेस मुख्यमंत्री'

"ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी तत्त्वनिष्ठ असावं लागतं," असं ट्वीट करून अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्यांच्या या ट्विटनंतर अपेक्षेप्रमाणे शिवसैनिकांकडून प्रत्युत्तर आलंच.
 
युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत म्हटलं, की मराठी बिग बॉससाठी ऑडिशन सुरू झाली आहे का? माजी झाल्यामुळे आता कोणी इंडियन आयडॉलसाठी तर उभंही करणार नाही. त्यामुळे बिग बॉसही चालेल." शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोलप यांनी तर अमृता फडणवीस यांची तुलना चक्क आनंदीबाईंशी केली.
 
शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही अमृता यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं, की उद्धव ठाकरे त्यांच्या नावाला जागूनच काम करत आहेत. स्वतःच्याच स्तुतीची गाणी गात नाहीयेत.
 
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनीही अमृता फडणवीस यांना कोण ओळखतं, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच अमृता फडणवीस यांना लोक ओळखायला लागले आहेत. ठाकरे कुटुंबियांच्या चार पिढ्यांना लोक ओळखतात," असं या महिला शिवसैनिकांचं म्हणणं होतं.
अमृता फडणवीस यांच्यावर या पातळीवर जाऊन टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेली पाच वर्षे अमृता फडणवीस यांना वारंवार अशा टीकेचा सामना करावा लागला होता. त्यांचं गायन, सामाजिक क्षेत्रातला त्यांचा वावर किंवा सोशल मीडियावर त्यांनी व्यक्त केलेले विचार असोत अमृता फडणवीस यांना प्रचंड टीका आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. अनेक वादही उद्भवले.
 
पण खरंच टीकाकार म्हणतात त्याप्रमाणे अमृता फडणवीस यांना केवळ 'मिसेस मुख्यमंत्री' म्हणून प्रसिद्धी आणि संधी मिळत गेल्या, की एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून त्यांची ही जडणघडण झाली आहे? वाद-विवादाच्या पलिकडे जाऊन अमृता यांचं व्यक्तिमत्त्व कसं आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला.
 
इमेज ब्रेकर 'मिसेस मुख्यमंत्री'
अमृता फडणवीस या मूळ नागपूरच्या. त्यांचे वडील शरद रानडे हे नेत्ररोगतज्ज्ञ आहेत तर चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी जी.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली. त्यानंतर फायनान्स या विषयात MBA पूर्ण केलं. 2003 साली त्यांनी अॅक्सिस बँकेमध्ये एक्झिक्युटीव्ह कॅशिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. सध्या त्या अॅक्सिस बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडन्ट-कॉर्पोरेट हेड (वेस्ट इंडिया) या पदावर कार्यरत आहेत.
 
बँकिंगमधली आपली कारकीर्द सांभाळतानाच त्यांनी गायनातही आपलं करिअर घडवलं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेला अल्बम, प्रकाश झा यांच्या 'जय गंगाजल' या चित्रपटात गायलेलं गाणं, विविध कार्यक्रम अशी गायनातलंही त्यांचं करिअर सुरू होतं. अगदी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी रॅम्प वॉकही केला. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी सहभाग घेतला.
वेगवेगळ्या माध्यमांना दिलेल्या मुलाखती असोत की सोशल मीडियावर आपली मतं मांडणं असो, अमृता फडणवीस या कायम ठामपणे व्यक्त होत राहिल्या. केवळ मुख्यमंत्र्यांची बायको एवढीच आपली ओळख मर्यादित न ठेवता स्वतःची ओळख निर्माण करण्याच्या त्या प्रयत्नांचं कौतुक झालं. आमदार प्रणिती शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं होतं, की त्या राजकारण्यांच्या बायकोच्या पारंपरिक प्रतिमेला छेद देत आहेत आणि हा खरंच खूप स्वागतार्ह बदल आहे.
 
शोभा डे यांनीही अमृता फडणवीस यांच्याबद्दल लिहिलं होतं, की अमृता या मॉडर्न आहेत. अतिशय सहजपणे त्या 'स्पॉटलाइट'मध्ये वावरतात. मनोरंजन क्षेत्रात करिअर करणारी व्यक्ती जशी स्वतःला 'ग्रूम' करेल तसंच त्या करत आहेत. त्या स्वतःवर मेहनत घेतात. फोटोशूट करून घेणं, स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणं सगळं त्या करत आहेत.
 
शोभा डे यांनी आपल्या लेखात त्यांच्या भेटीची आठवण सांगताना लिहिलं होतं, की कॅटरिना कैफप्रमाणेच मोठ्या आत्मविश्वासानं त्या स्वतःच्या फोटोशूटबद्दल आपल्या पीआर टीमशी चर्चा करत होत्या.
 
गाणं- पॅशन ते करिअर
मुख्यमंत्र्यांची ग्लॅमरस बायको अशी आपली इमेज जपताना या काही वर्षांत अमृता यांनी गाण्याच्या आपल्या आवडीचं रुपांतर करिअरमध्ये केलं. गायक अनिरुद्ध जोशी हे अमृता फडणवीस यांना गाणं शिकवायला जायचे. नागपूर ते मुंबई असा त्यांचा प्रवासही अनिरुद्ध जोशी यांनी पाहिला आहे. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दलचे आपले अनुभव सांगितले.
अनिरुद्ध जोशी यांनी सांगितलं, की त्यांना खूप आधीपासून गाण्याची आवड होती. पण एक काळ असा होता, की त्यांना गाण्यात करिअर करायचं होतं. काही कारणामुळे ते शक्य झालं नाही. त्यांनी ती पॅशन सोडली नाही. त्या गाणी गात राहिल्या. त्यामध्ये काही गैर आहे, असं मला वाटत नाही. आता प्रत्येक जण आपल्या क्षेत्रामध्ये कुठपर्यंत जाईल, हे आपल्याला माहीत नसतं. त्यांनी चित्रपटांसाठी गायलेली गाणी चांगली आहेत. पण आपल्याकडे राजकारण्यांना नावं ठेवण्याची सवय आहे आणि त्यांच्या बायकोनं काही केलं की नाकं मुरडतो.
 
गाण्याचा त्यांना किती ध्यास होता हे सांगताना अनिरुद्ध जोशींनी म्हटलं, "अत्यंत बिझी शेड्युलमध्येही आमचा क्लास व्हायचा. त्या उशीरा आल्या तरी लगेच क्लास रुममध्ये येऊन सुरुवात करायच्या. आजही अमृता फडणवीस यांना जेव्हा काही परफॉर्म करायचं असतं, तेव्हा-तेव्हा त्या सल्ला घेतात. काय स्केलमध्ये गायला हवं हे विचारतात. गाऊन पाठवतात.
 
अमृता फडणवीस यांच्यावर होणाऱ्या टीकेबद्दलही अनिरुद्ध जोशींनी प्रतिक्रिया व्यक्त केली. व्यक्ती म्हणून खूप डायनॅमिक आहेत. हुशार आहेत. त्यांना खूप काही करायचं आहे. पण दुर्दैवानं आपल्याकडे राजकारण्याची बायको म्हटलं, की साडी नेसून येणाऱ्या-जाणाऱ्यांचं स्वागत करणं एवढंच त्यांचं काम आहे, अशी गेल्या पन्नास वर्षांपासूनची आपली धारणा आहे. जेव्हा एक बाई स्वतःच्या भरवश्यावर काही वेगळं करायला जाते, तेव्हा त्यांना नाव ठेवायची आपल्याकडे पद्धत आहे.
 
अमृता फडणवीस आणि वाद
अर्थात, एका बाजूला इमेज ब्रेकर असं कौतुक वाट्याला येत असताना अमृता यांना वादांनाही तोंड द्यावं लागलं.
 
या वादापैकी सर्वांत गंभीर आरोप होता, महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवल्याचा. अमृता फडवणीस या अॅक्सिस बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्याने बँकेला झुकते माप देत राष्ट्रीय बँकांना तोटा होणारा हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप यासंबंधी याचिका दाखल करणाऱ्या मोहनीष जबलपुरे यांनी म्हटलं होतं.
 
या आरोपावर स्पष्टीकरण देताना मुख्यमंत्र्यांच्या जनसंपर्क कार्यालयानं म्हटलं होतं, की मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासून बँकेकडे केंद्रीय विद्यालय, नगरविकास, मुंबई पोलीस, धर्मादाय आयुक्त अशा अनेक विभागांची खाती आहेत.
 
महाराष्ट्र सरकारनं केलेल्या रिव्हर साँग या गाण्यावरुनही असाच वाद झाला होता. महाराष्ट्र सरकारनं मुंबईतील चार मुख्य नद्यांना वाचविण्यासाठी व्हीडिओ अल्बम बनवला होता. या अल्बममधलं गाणं हे अमृता फडणवीस यांनी गायलं होतं, तर देवेंद्र फडणवीस, तत्कालिन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हेसुद्धा या व्हीडिओमध्ये झळकले होते.
 
काँग्रेसनं हा मुद्दा विधिमंडळात उचलून धरला. हा व्हीडिओ शूट करण्यासाठी ज्या कंपनीला कंत्राट देण्यात आलं, तिची निवड कोणत्या पद्धतीनं करण्यात आली होती, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला. हे सरकार आहे की नाटक कंपनी अशी टीकाही विरोधकांनी केली होती.
 
17 सप्टेंबर 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख 'देशाचा पिता' असा केला. त्यानंतर त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या.
 
अगदी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही अमृता फडणवीस यांनी केलेलं एक ट्वीट खूप चर्चेत आलं होतं. राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींदरम्यान 'पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे' अशी शायरी करत 'मी पुन्हा येईन' असं म्हटलं होतं.
 
अगदी काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये यापूर्वीही ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप झाले. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी तातडीनं एक ट्वीट करत म्हटलं होतं, की ढोंगीपणा हा आजार आहे. गेट वेल सून शिवसेना. झाडं तोडणं तुमच्या सोयीनुसार आहे. जर कमिशन मिळत असेल तर झाडं तोडायला परवानगी देणार. हे अक्षम्य पाप आहे.
 
आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला शिवसेनेनं केलेल्या विरोधावरून अमृता यांनी सेनेला हा टोला लगावला होता. त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी या बातमीत काहीही तथ्यं नसल्याचं म्हटलं होतं. "सातत्यानं खोटं बोलणं हा एक आजार आहे. ठीक होईल. वृक्षतोडीसाठी कमिशन घेणं ही महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेला नवीन प्रघात आहे," असा टोला लगावायलाही त्या विसरल्या नव्हत्या.
 
अमृता फडणवीस शिवसेनेवरील टीका कोणत्या अधिकारानं करत आहेत, असंही विचारलं गेलं. अमृता फडणवीस यांच्या शिवसेनाविरोधी भूमिकेसंबंधी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी अमृता यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आणि स्वतंत्र आहे. त्यांची मतेही स्वतंत्र आहेत, असं म्हटलं होतं.
 
स्वतंत्र व्यक्तिमत्वामुळेच सातत्यानं ट्रोल?
 
"देवेंद्र फडणवीस हे जेव्हा आमदार, प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हा अमृता फडणवीस या नागपूरमध्येच होत्या. राजकारणात त्या सक्रिय नव्हत्या. प्रचारापुरताच त्यांचा सहभाग असायचा. पण तेव्हाही त्या नेत्याची बायको जशी कायम त्याची सावली बनून राहते, तशा नव्हत्या. त्यांचं स्वतःचं करिअर होतं. Young Professional म्हणून त्यांची स्वतःची ओळख होती. तेव्हाही त्या संगीताची आवड जोपासत होत्या आणि राजकारणाच्या पलीकडे त्यांचे स्वतंत्र असे एक सोशल लाईफ होते. त्यांच्या आई-वडिलांच्या प्रोफेशनल बॅकग्राऊंडमधून ते घडले होते. फक्त नागपुरामध्ये त्यांच्यावर स्पॉटलाइट नव्हता," असं एबीपी माझाच्या विदर्भ विभागाच्या संपादक सरिता कौशिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
 
" नागपूरमधून मुंबईमध्ये आल्यानंतरही त्यांच्या व्यक्तिमत्वात फारसा बदल झाला नाही. त्यांच्या ज्या आवडी-निवडी नागपूरमध्ये होत्या, त्या त्यांनी मुंबईमध्येही जोपासल्या. केवळ त्याचा अवकाश अधिक विस्तारला होता. त्यांनी स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व जोपासलं आणि देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना वाव दिला. पण आता मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून आता मात्र त्यांच्या प्रत्येक कृतीकडे मीडियाचं लक्ष होतं. हा त्यांच्या आयुष्यात झालेला बदल होता. महाराष्ट्राला एक तरुण, 'आऊट ऑफ बॉक्स' मिसेस सीएम मिळाल्या. कदाचित त्यामुळेच त्यांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींची चर्चा झाली. त्यांनी ग्रामीण विकास किंवा कॅन्सर रुग्ण ह्यासाठी केलेल्या कामांपेक्षा मुख्यमंत्र्यांची पत्नी म्हणून त्यांचे जे वेगळेपण होते ते त्यांचं ग्लॅमर, कपडे, इन्स्टाग्राम पोस्ट्स, अल्बम, गाण्याचे शो ह्यात असल्यामुळे त्या बाबींवर स्वाभाविक जास्त फोकस होता," असं सरिता कौशिक म्हणतात.

सरिता कौशिक यांनी सांगितलं, की नागपूर प्रमाणेच मुंबईत पण त्या राजकारणापासून दूर होत्या. जिथे अगदी गरज आहे अशा ठिकाणीच त्या राजकीय प्लॅटफॉर्मवर देवेंद्र फडणवीसांसोबत दिसल्या.
 
महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये अमृता फडणवीस शिवसेनेवर जी थेट टीका करत आहेत, त्याबद्दल बोलताना सरिता कौशिक यांनी म्हटलं, की आतापर्यंत त्यांनी अशापद्धतीनं पॉलिटिकल कमेंट केल्या नव्हत्या. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः म्हटलं होतं, की अमृता स्वतंत्र विचार करतात. त्या मला विचारून ट्वीट करत नाहीत. आपल्या स्वभावाला अनुसरून त्यांनी ट्वीट केले असले, तरी सध्याच्या परिस्थितीत ही राजकीय अपरिपक्वता ठरू शकते.
 
"त्यांचा स्वतंत्र विचार देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणावर काय परिणाम करेल हा प्रश्न जरी अनेकांनी उपस्थित केला असला, तरी हा सर्वस्वी त्या दोघांचा निर्णय आहे. सोशल मीडियावर असे व्यक्त झाल्यावर स्वतः अमृता फडणवीसांना ही परिणाम भोगावे लागत आहेत. अत्यंत वाईट स्तराच्या ट्रोलिंगला त्यांना सामोरे जावे लागते आहे. ट्रोलिंग हाही आता शेवटी राजकारणाचाच भाग झाला आहे," असंही सरिता कौशिक यांनी म्हटलं.