शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (19:57 IST)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयरची नामांकनं जाहीर

बीबीसी न्यूजने आज दिल्लीत झालेल्या व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर या पुरस्कारासाठी यावर्षी निवड करण्यात आलेल्या पाच नामांकनांची घोषणा केली. ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा क्षेत्रातले तज्ज्ञ आणि बीबीसीच्या संपादकांनी या नावांची निवड केली आहे. पुरस्कारासाठी मतदान आता सुरू झालं आहे आणि तुम्ही बीबीसीच्या भारतीय भाषा सेवांचे प्लॅटफॉर्म किंवा बीबीसी स्पोर्ट्स वेबसाईटवर जाऊन आपल्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूसाठी मतदान करू शकता.
 
पाच नामांकनं आहेत:
द्युती चंद 
क्रीडा प्रकार : अॅथलेटिक्स
 
कोनेरू हंपी 
क्रीडा प्रकार : बुद्धिबळ
 
मनू भाकेर 
क्रीड प्रकार : नेमबाजी (एअरगन शुटिंग)
 
रानी
क्रीडा प्रकार : हॉकी
 
विनेश फोगाट
क्रीडा प्रकार : कुस्ती (फ्रीस्टाईल रेसलिंग)
 
या पुरस्कारांविषयी बोलताना बीबीसीच्या भारतीय भाषा सेवा प्रमुख रूपा झा म्हणाल्या, “यावर्षीची ISWOTY विजेती ठरवण्यासाठी जगभरातले लोक सहभागी होतील आणि या अनिश्चित काळात गेमचेंजर म्हणून काम करणार्‍या सर्वोत्कृष्ट महिला स्पोर्ट्स स्टारला मतं देतील, अशी मी आशा करते.”
 
बीबीसीचे एशिया पॅसिफिक विभागातले बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रमुख इंदू शेखर म्हणतात, “आम्ही या प्रतिष्ठित क्रीडा पुरस्काराचं दुसरं वर्ष साजरं करण्यास तयार आहोत, याचा मला आनंद वाटतो आणि ‘स्पोर्ट्स हॅकेथॉन’ आणि ‘इंडियन गेमचेंजर सीरिज’च्या माध्यमातून प्रतिभावान आणि उदयोन्मुख महिला
खेळाडूंची ऑनलाईन उपस्थिती वाढवण्याचं आमचं लक्ष्य आहे.”
नामांकनांची यादी जाहीर झाल्यानंतर नामांकनं मिळालेल्या खेळाडूंनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
द्युती चंद : “बीबीसी पुरस्काराच्या दुसऱ्या वर्षीही मला नामांकन मिळालं, याचा मला आनंद आहे. भारतात हल्ली लोकांमध्ये खेळाविषयी जागरुकता निर्माण झाली आहे, हे बघून खूप छान वाटतंय. कितीतरी खेळाडू आज स्वतःचा ठसा उमटवत आहेत, पैसे कमावत आहेत आणि देशाची शानही वाढवत आहेत.”
 
मनू भाकेर : “हे नामांकन म्हणजे माझी स्वतःची माणसं माझी पाठ थोपटत असल्यासारखं आहे आणि म्हणून हे नामांकन माझ्यासाठी खूप खास आहे. लोक माझ्या कामगिरीचं कौतुक करतात आणि माझी कठोर मेहनत त्यांना दिसते, हे माझ्यासाठी खूप आहे. मी सर्वांना मनापासून धन्यवाद देते.”
 
कोनेरू हंपी : “पुरस्कारापेक्षा नामांकन मिळणं हेच माझ्यासाठी मोठं यश आहे. मला वाटतं खेळात जिंकणे किंवा हरणे याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या खेळाचा विचार करणं अधिक महत्त्वाचं आहे आणि तेही या कोरोनाकाळात. बीबीसी ISWOTY पुरस्कार सोहळा आम्हाला आनंदित होण्याची आणि जगातल्या इतर
खेळाडू आणि लोकांसोबत आनंद साजरा करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.”
 
रानी : महिला खेळाडूंचा त्यांच्या कामगिरीमुळे गौरव होत आहे, ही बाब प्रेरणा देणारी आहे. मी प्रत्येक महिलेला विनंती करते की, त्यांनी एक तरी खेळ खेळावा, कारण खेळामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.
 
विनेश फोगाट : “पूर्वी कुस्तीकडे बघून माझ्या गावातली लोकं विचारायची, ‘तुम्ही मुलींना हे काय शिकवताय?’ पण आता घरी मुलगी जन्माला आली की ते म्हणतात आम्ही हिला कुस्तीपटू बनवणार आणि ते खरंच तसं करतातही. आमच्या पदकातून आम्ही हा बदल घडवला आहे आणि आम्ही मुलींच्या आयुष्यात
बदल घडवू शकत असू तर हे माझ्यासाठी एखाद्या पदकापेक्षा कमी नाही.”
 
मतदानाविषयी माहिती : मतदान मोफत आहे आणि BBC News, BBC Hindi, BBC Marathi, BBC Gujarati, BBC Punjabi, BBC Tamil, BBC Telugu या वेबसाईटवर जाऊन तुम्ही मतदान करू शकता. 24 फेब्रुवारी रात्री साडेअकरा वाजता (1800 GMT) मतदान बंद होईल. 8 मार्च रोजी होणाऱ्या व्हर्च्युअल पुरस्कार सोहळ्यात BBC ISWOTY पुरस्काराच्या विजेतीची घोषणा होईल. त्यासोबतच जीवनगौरव पुरस्कार आणि उदयोन्मुख खेळाडू पुरस्कारांचाही घोषणा होईल.
 
बीबीसी स्पोर्ट्स हॅकेथॉन (18 फेब्रुवारी) : बीबीसीने ‘स्पोर्ट्स हॅकेथॉन’चीही घोषणा केली आहे. यात 50 भारतीय महिला खेळाडूंच्या इंग्रजी आणि 6 भारतीय भाषांमध्ये  300 हून अधिक विकिपीडिया नोंदी तयार केल्या जातील. बीबीसी हॅकेथॉनमध्ये दिल्ली, पंजाब, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश,
तेलंगणा, तामिळनाडू आणि पाँडेचेरीमधल्या 13 संस्थांमधील पत्रकारिता विभागातील विद्यार्थी सहभागी होतील. 
 
हॅकेथॉनची छोटीशी झलक म्हणून भारताच्या पॅरा-बॅडमिंटनपटू मानसी जोशी यांच्या इंग्रजीतील विकिपीडिया प्रोफाईलमध्ये आणि क्रीडा प्रवासात अधिक तपशील जोडण्यात आला आहे. तसंच हा तपशील आता हिंदीमध्येही उपलब्ध करून देण्यात आला आहे. पत्रकार परिषदेतही हे दाखवण्यात आलं - Manasi
Joshi_English, Manasi Joshi_Hindi
 
18 फेब्रुवारी रोजी बीबीसीच्या भारतीय भाषा सेवांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्पोर्ट्स हॅकेथॉन लाईव्ह बघता येईल. 
 
दि इंडियन गेमचेंजर्स : भारतातल्या वेगवेगळ्या राज्यातल्या पाच महिला खेळाडूंचा प्रेरणादायी प्रवास या विशेष मालिकेतून उलगडणार आहे. अनेक प्रकारच्या अडथळ्यांची शर्यत पार करत या महिला खेळाडू खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरल्या आहेत.