1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 24 मे 2021 (15:24 IST)

स. का. पाटील कोण होते, ते महाराष्ट्राचे हिरो होते की व्हिलन?

नामदेव अंजना
मुंबईचे अनभिषिक्त सम्राट अशी ओळख असलेले नेते स. का. पाटील यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने हा लेख प्रकाशित करत आहोत.)
 
'हा सदोबा... लोकसभेत जायला म्हणतोय, याला मी शोकसभेत पाठवेन.'
हे वक्तव्य आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेंचं आणि आणि निमित्त होतं 1967 च्या लोकसभा निवडणुकीतल्या प्रचाराचं.
 
1967 च्या निवडणुकीत साऊथ बॉम्बे (आताचं दक्षिण मुंबई) मतदारसंघातून काँग्रेसकडून 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट' म्हणून ओळखले जाणारे स. का. पाटील उमेदवार होते आणि त्यांच्या विरोधात उभे होते जॉर्ज फर्नांडिस.
 
जॉर्ज फर्नांडीस यांच्यापेक्षा आचार्य अत्रेंनीच स. का. पाटलांविरोधात अधिक सभा घेतल्याची आठवण ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सांगतात.
 
एका सभेत तर अत्रे म्हणाले होते, "मी 13 ऑगस्टला जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मधे एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले."
या निवडणुकीत स. का. पाटील पराभूत झाले आणि जॉर्ज फर्नांडिस जिंकले. नुसते जिंकले नाहीत, तर मुंबईच्या या अनभिषिक्त सम्राटाच्या राजकीय वर्चस्वाला त्यांनी मोठा हादरा दिला आणि उतरती कळाही लावली.
 
ही घटना स्वांतत्र्योत्तर भारतीय निवडणुकांमधील सर्वांत महत्त्वाच्या घटनांपैकी एक मानली गेली.
स. का. पाटील यांचा पराभव करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना 'जायंट किलर' म्हटलं गेलं. केवळ मुंबई-महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देश-परदेशातील प्रसारमाध्यमांनीही भारतातील सर्वांत श्रीमंत लोकांची वस्ती अशी ओळख असलेल्या 'साऊथ बॉम्बे'च्या या निकालाची दखल घेतली होती.
 
असं काय होतं 'स. का. पाटील' या नेत्यामध्ये, जेणेकरून त्यांना पराभूत करणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट वाटावी? याच निवडणुकीत आचार्य अत्रे पराभूत झाले होते, पण स. का. पाटलांच्या पराभवाने त्यांना विजयी झाल्यासारखं का वाटलं होतं? का म्हटलं जायचं स. का. पाटलांना 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट'? खरंच त्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला होता का?
 
स. का. पाटील यांचे आजवर केवळ 'खलनायकी' किस्से तुम्ही ऐकले असाल, पण आज आपण त्यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेणार आहोत. यातून तुम्हीच ठरवा, स. का. पाटील महाराष्ट्राचे हिरो होते की व्हिलन?
 
कोकण ते मुंबई
सदाशिव कानोजी पाटील अर्थात स. का. पाटील. तेव्हाच्या रत्नागिरी आणि आताच्या सिंधुदुर्गातील पाट नावाच्या गावात स. का. पाटलांचा जन्म झाला. हे गाव आताच्या कुडाळ तालुक्यात आहे. दोन बहिणी आणि दोन भाऊ अशी स. का. पाटलांची भावंडं. ते कुडाळदेशकर ब्राह्मण कुटुंबातील होते.
 
स. का. पाटील 10 वर्षांचे असतानाच पितृछत्र हरपलं. वडिलांचाच आधार गेल्यानं ज्या खाचखळग्यांना सामोरं जावं लागणार होतं, त्या प्रत्येक संकटाला ते सामोरे गेले.
 
शिक्षणासाठी मोठी पायपीट करावी लागली. शब्दश: पायपीट. चार-चार मैल चालून मालवणमध्ये शिकण्यासाठी त्यांना जावं लागत असे. गावी शिक्षण पूर्ण केल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते मुंबईत आले.
 
1918 च्या दरम्यानचा हा काळ. मुंबईतल्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये शिकत असतानाच, भारतासह जगभरात इन्फ्लुएन्झा साथीनं धुमाकूळ घातला. याचा फटका स. का. पाटलांनाही बसला आणि ते कॉलेज सोडून गावी निघून गेले. गावी जाऊन मालवण पालिकेत काम करू लागले. साथ गेल्यानंतर ते पुन्हा मुंबईत आले आणि झेवियर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. अर्धवेळ काम करून तिथं ते शिकू लागले.
 
याच काळात देशात स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. 1920 साली टिळक गेले आणि गांधींकडे देशाचं नेतृत्व आलं.
टिळकांना भेटण्यासाठी गांधी मुंबईत आले असताना स. का. पाटलांनी पहिल्यांदा गांधींना पाहिले. धोती, खादी कुर्ता आणि डोक्यावर पांढरी टोपी (जी पुढे गांधी टोपी म्हणून प्रसिद्ध पावली) अशा वेशात गांधी होते, असं वर्णन स. का. पाटील त्यांच्या आत्मचरित्रात करतात.
 
त्यावेळच्या प्रसिद्ध नागपूर परिषदेनंतर गांधींनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागाचं आवाहन केलं आणि गांधींमुळे भारावलेल्या स. का. पाटलांनी कॉलेजला राम राम ठोकला. गांधीजींच्या असहकार चळवळीच्या विद्यार्थ्यांच्या सभांसाठी ते संयोजक बनले.
 
स. का. पाटील यांची राजकारणातील सक्रिय सहभागाची ही पहिली घटना.
 
त्यानंतर स. का. पाटील पुन्हा मालवणला गेले. तिथं त्यांनी गांधीजींच्या संदेशाप्रमाणं शाळा काढल्या. चार ते पाच शाळा उघडून शिक्षणाचं कार्य सुरू केलं. पुढे पुन्हा मुंबईत आले. असहकार चळवळीसाठी कॉलेज सोडणाऱ्या पहिल्या काही विद्यार्थ्यांपैकी ते एक असल्यानं तत्कालीन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्याची संधी त्यांना लाभली. विठ्ठलभाई पटेल यांची भेट इथंच झाली.
 
विठ्ठलभाई पटेल यांना स. का. पाटील यांनी पुढे कायमच गुरुस्थानी मानलं. आपल्या आत्मकथेत स. का. पाटील विठ्ठलभाई पटेलांचा आदरानं उल्लेख करतात आणि गुरुच्या जागी त्यांना मानत असल्याचंही नमूद करतात. विठ्ठलभाई पटेल म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे बंधू.
 
स. का. पाटील हे पुढे 'पटेल गटा'तील मानले जाण्याची आणि नेहरूंची त्यांच्यावरील नाराजीचं बिजं इथं सापडतात.
 
लंडनमधून पत्रकारितेत डिप्लोमा
असहकार चळवळीमुळे शिक्षणाची अवस्था बिकट झाली होती. मात्र, स. का. पाटलांना शिक्षण पुढे सुरू ठेवायचं होतं. पण पुढे काय करायचं, हे त्यांना कळत नव्हतं. यावेळीही त्यांनी गांधीजींची मदत घेण्याचं ठरवलं. तसं पत्र त्यांनी गांधींना धाडलं. गांधींनी त्यांना काकासाहेब कालेलकरांना भेटण्यास सांगितलं.
 
स्वातंत्र्य चळवळीत पत्रकाराच्या भूमिकेचं महत्त्व सांगत काकासाहेब कालेलकरांनी स. का. पाटलांना परदेशातून पत्रकारितेचं शिक्षण घेण्यास सूचवलं. मात्र, परदेशात शिक्षण घेण्याइतकी आर्थिक ऐपत स. का. पाटलांची नव्हती. मात्र, यावेळी त्यांच्याच समाजातील पी. बी नाईक, नारायणराव देसाई टोपीवाले अशा मंडळींनी स. का. पाटलांसाठी आर्थिक मदत उभारली.
 
पण लंडन विद्यापीठापेक्षा अमेरिकेतून शिक्षण घेण्याची इच्छा स. का. पाटालांना होती. त्यादृष्टीने ते बोटीने अमेरिकेच्या दिशेला निघाले. मात्र, लंडनला पोहोचेपर्यंतच ते थकले आणि लंडन विद्यापीठातून पत्रकारिता करण्याचं त्यांनी ठरवलं.
लंडनमधून पत्रकारिता शिकून भारतात परतल्यानंतर स. का. पाटील 'बॉम्बे क्रोनिकल'मध्ये कामास रुजू झाले. पत्रकार म्हणून पाहिलीच असाईनमेंट त्यांना गांधीजींनी सुरू केलेल्या दांडी यात्रेची देण्यात आली. दांडी यात्रेदरम्यान ते गांधीजींच्या आणखी जवळ गेले.
 
बॉम्बे क्रोनिकलसाठी त्यांनी मोहम्मद अली जिना, जगदीश चंद्र बोस, सर प्रफुल्ल चंद्र राय, मदन मोहन मालवीय आणि महात्मा गांधी यांसारख्या दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या.
 
गांधींच्या सहवासात आल्यानंतर पुन्हा ते स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले आणि त्यांचं पत्रकारितेचं करिअर तिथेच थांबलं. बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटी (BPCC) चे ते सरचिटणीस बनले.
 
आत्मकथेत स. का. पाटील सांगतात, "गांधींसोबत आंदोलनात सहभागी होत असल्यानं दर दोन वर्षांनी मला तुरुंगाच्या वाऱ्या कराव्या लागत. त्यामुळे बॉम्बे क्रोनिकलचा राजीनामा दिला. पत्रकारिता माझी आवड होती. त्यामुळे पुढील आयुष्यात कुठल्याही कागदपत्रावर व्यवसायाच्या जागी पत्रकारितेचाच उल्लेख करत असे."
 
'दॅट बादशाह फ्रॉम बॉम्बे'
बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटी (BPCC) चं सरचिटणीस म्हणून सुरुवात हीच स. का. पाटलांच्या 'मुंबईचा अनभिषिक्त सम्राट' होण्याची सुरुवात होती.
 
मुंबई शहर, मुंबई महानगरपालिका, बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटी, मुंबईतील उद्योगपती. या सर्व गोष्टींवर स. का. पाटील या नेत्याचा अफाट दबदबा होता.
 
1935 साली स. का. पाटील मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले, तर 1952 सालापर्यंत ते कायम राहिले. 1952 साली भारतात पहिल्या निवडणुका पार पडल्या, त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी म्हणून त्यांनी महापालिकेतून बाहेर पाऊल टाकलं. मात्र, तोपर्यंत मुंबई शहर आणि महापालिकेवर त्यांचं एकहाती वर्चस्व होतं.
 
1949 ते 1952 या काळात तीनवेळा स. का. पाटील मुंबई महापालिकेचे महापौरही होते. महापौरपदाच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईसाठी बरीच कामं केली. झाडं लावणं आणि उद्यानं बांधणं हे तर त्यांच्या अजेंड्यावरच असे. मुंबई सुंदर दिसावी असं त्यांना वाटत असे.
 
आज मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावरील 'क्वीन नेकलेस' दिसतो, तो स. का. पाटील यांनीच त्यांच्या महापौरपदाच्या कार्यकाळात बांधला.
मुंबईची सीमारेषा वाढवण्यासाठीही त्यांनी बरेच प्रयत्न केले. ठाणे शहराचं ग्रेटर मुंबईत समाविष्ट करण्यासाठी ते आग्रही होते. मात्र, पुढे ठाणे जिल्ह्याचं ते मुख्य ठिकाण बनलं. स. का. पाटलांच्याच कार्यकाळात ग्रेटर बॉम्बेत 42 नव्या गावांचा समावेश झाला.
 
एकीकडे मुंबई महापालिकेवर वर्चस्व, दुसरीकडे मुंबई शहरावर एकहाती राजकीय सत्ता असणाऱ्या BPCC म्हणजे बॉम्बे प्रदेश काँग्रेस कमिटीवरही त्यांचं वर्चस्व होतं. 1942-43 च्या दरम्यान BPCC चं अध्यक्षपद हाती आल्यानंतर ते पुढे 1957 साली पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात पहिल्यांदा मंत्रिपद मिळेपर्यंत मुंबई काँग्रेसचं (BPCC) अध्यक्षपद स. का. पाटील यांच्याकडेच होतं.
 
देशातील काँग्रेसला मुंबईतून आर्थिक आधार देणाऱ्या स. का. पाटलांचे मुंबईतील उद्योग जगतातील 'मैत्री'ची नेहमीच चर्च होत राहिली. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे सांगतात, "उद्योगपती जे. आर. डी. टाटा हे स. का. पाटलांना भेटण्यासाठी वेटिंग रुममध्ये थांबत असत," यावरून स. का. पाटलांचा दबदबा लक्षात यावा.
 
'द अनक्राऊन किंग ऑफ बॉम्बे' म्हणून प्रसारमाध्यमं तेव्हा स. का. पाटलांचा उल्लेख करत असतच. मात्र, स. का. पाटलांच्या आत्मकथेच्या प्रस्तावनेत एम. व्ही. कामत यांनी नमूद केलंय की, स्वत: महात्मा गांधी हे स. का. पाटलांचा उल्लेख करताना म्हणायचे, 'दॅट बादशाह फ्रॉम बॉम्बे.'
 
केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश, पण नेहरूंशी मतभेद
आजही बऱ्याच जणांमध्ये स. का. पाटील हे नेहरूवादी होते म्हणून त्यांनी महाराष्ट्राला विरोध केला, असं समज दिसून येतो. मात्र, इतिहास काही वेगळं सांगतो. नेहरूंबद्दल स. का. पाटील यांनी स्वत: त्यांच्या आत्मकथेत स्वतंत्र प्रकरणं लिहिली आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतर विशेषत: नेहरूंशी असलेले मतभेद त्यांनी यात नमूद केलीत.
 
स. का. पाटील हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गटातील होते. त्यामुळे आपल्याला नेहरूंच्या नाराजीचा सामना करावा लागल्याचे स. का. पाटील म्हणतात.
 
भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाची धुरा कुणाच्या हाती द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा सरदार पटेल वयाच्या सत्तरीपार होते. त्यामुळे धुरा पंडित नेहरूंच्या हाती गेल्याचं स. का. पाटील म्हणतात. महात्मा गांधी होते, तोवर ते गांधींकडून मार्गदर्शन घेत असत. मात्र, गांधींच्या मृत्यूनंतर पंडित नेहरूच सर्व निर्णय घेऊ लागल्याचं पाटील नमूद करतात.
 
स. का. पाटील यांच्या लिहिण्यात पंडित नेहरूंसोबत त्यांची असलेली नाराजी पानापानावर दिसून येते.
 
मंत्रिमंडळात असतानाचा एक किस्सा स. का. पाटील सांगतात. 1958 चा प्रसंग. स. का. पाटील तेव्हा नेहरूंच्या मंत्रिमंडळात अन्न आणि कृषिमंत्री होते. ऊस शेतकऱ्यांना दर वाढवून देण्याचा प्रस्ताव नेहरूंसमोर मांडला. नेहरूंनी तो नाकारला. हा प्रस्ताव महत्त्वाचा असल्याचं म्हणत स. का. पाटील यांनी थेट राजीनामाच दिला. त्यानंतर नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री वल्लभ पंत यांना मध्यस्थी करायला लावली आणि स. का. पाटलांना राजीनामा मागे घ्यायला लावला. तो ऊसदराचा प्रस्तावही स्वीकारला.
स. का. पाटील आणि पंडित नेहरूंमध्ये असे वारंवार खटके उडत राहिले. नेहरूंनी 1962 नंतर पंतप्रधान पदावर राहायला नको होतं, शेवटचे दोन वर्षे त्यांनी दखल घ्यावी असं काहीच काम केलं नाही, अशी स्पष्ट मतं स. का. पाटील यांची होती.
 
पण 1957 पासून 1964 पर्यंत स. का. पाटील नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायम होते.
 
दरम्यान, याच काळात व्ही. के. कृष्ण मेनन यांच्यावरूनही नेहरू-पाटील यांच्यात बिनसलं.
 
व्ही. के. कृष्ण मेनन हे लंडनमध्ये शिकायला होते. तिथं त्यांनी इंडियन लीग नावाची संघटना स्थापन केली होती आणि त्यातूनच नेहरूंशी त्यांचा परिचय झाला होता. मेनन यांना लंडनमधील भारताचे पहिले उच्चायुक्तही नेहरूंनी केलं होतं. स. का. पाटील म्हणतात, नेहरूंना मेनन इतके का आवडत असत, हे मला कधीच कळलं नाही.
मेनन भारतात परतले तेव्हा त्यांनी राजकारणात प्रवेश करावा असं नेहरूंना वाटत होतं. 1957 सालच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई शहरातून मेनन यांना जिंकवण्याची विनंती नेहरूंनी पाटलांकडे केली. मुंबईतील पाटलांचं वर्चस्व पाहता मेनन जिंकलेही.
 
संरक्षणमंत्री म्हणून मेनन यांची कारकीर्द बरी नसतानाही नेहरू त्याकडे दुर्लक्ष करत होते, असं मत पाटलांचं होतं. पाटलांना हे सर्व पसंत पडत नव्हतं.
 
1962 साली पुन्हा जेव्हा नेहरूंनी पाटलांना सांगितलं की, मुंबईतून मेनन यांना जिंकवून द्या. मेनन यांना विरोध करणार नाही, मात्र समर्थनही देणार नाही, असं म्हणत तेव्हा स. का. पाटील यांनी स्पष्ट नकार कळवला. मुंबई काँग्रेस तेव्हा पार दुभंगली. मेनन जिंकले. पुन्हा संरक्षणमंत्री झाले. मात्र, पुढे चीनसोबत युद्ध झालं आणि मेनन यांना राजीनामा द्यावा लागला.
 
या सगळ्यामुळे काँग्रेसअंतर्गत स. का. पाटील आणि नेहरू यांच्यातील मतभेदाची चर्चा मोठ्या प्रमाणावर झाली.
 
संयुक्त महाराष्ट्राबाबत नेमकी काय भूमिका होती?
राजकीय इतिहास संशोधक य. दि. फडके त्यांच्या 'विसाव्या शतकातील महाराष्ट्र' या पुस्तकाच्या सातव्या खंडात 'स. का. पाटील यांची मनमानी' नावानं स्वतंत्र प्रकरण लिहिलं आहे.
 
त्यात ते म्हणतात, "मुंबईचे अनभिषिक्त राजे म्हणून ओळखले जाणारे स. का. पाटील यांच्या ताब्यात दोन संघटना होत्या. मुंबई प्रदेश काँग्रेसवर त्यांचं नियंत्रण होतेच. शिवाय, अखिल भारतीय ऐक्य व्यासपीठ नावाच्या नव्यने स्थापन करण्यात आलेल्या दबावगटाचे ते अध्यक्ष होते. या दबावगटाने किमान 25 वर्षे तरी राज्यांच्या पुनर्रचनेचा प्रश्न लांबणीवर टाकावा असे राज्य पुनर्रचना आयोगाला सादर केलेल्या ज्ञापनात आवाहन केले."
 
स. का. पाटील यांनी 'संयुक्त महाराष्ट्रविरोधी' भूमिका घेतल्याचे लालजी पेंडसे यांनी त्यांच्या 'महाराष्ट्राचे महामंथन' या ग्रंथातही लिहिलंय. या ग्रंथात पेंडसेंनी स. का. पाटलांचे त्या त्या काळातल्या भूमिका आणि वक्तव्य नमूद केले आहेत. य. दि. फडकेंनीही 'विसाव्या शतकातील महाराष्ट्र'च्या सातव्या आणि आठव्या खंडात ठिकठिकाणी स. का. पाटलांच्या 'महाराष्ट्रविरोधी' भूमिकेचा समाचार घेतलाय.
 
स. का. पाटलांच्या 'मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही' या विधानाचा वारंवार उल्लेखही केला जातो.
 
मात्र, स. का. पाटील यांचे नातू सुहास ठाकूर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "स. का. पाटील यांच्या विधानाची मोडतोड करून कायम सांगितलं गेलं. 'अशी हिंसा केलीत तर मुंबई महाराष्ट्राला कधीच मिळणार नाही' असं ते म्हणाले होते. मात्र, यातलं आधीचे शब्द न सांगताच कायम प्रचार करत राहिले."
मात्र, संयुक्त महाराष्ट्राबाबत स. का. पाटील यांच्या भूमिकेबाबत मतमतांतरी असली, तरी स. का. पाटील हे स्वतंत्र मुंबई राज्यासाठी आग्रही होते, हे निश्चित.
 
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत स. का. पाटलांनी त्यांच्या आत्मकथेत भाषानिहाय राज्यनिर्मितीच्या प्रकरणात सविस्तर लिहिलंय.
 
स. का. पाटील म्हणतात, "यशवंतराव चव्हाण द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असताना, ते स्वतंत्र महाराष्ट्राच्या मागणीकडे झुकलेले पाहायला मिळाले. तेव्हा मी पंतप्रधान पंडित नेहरूंकडे गेलो आणि त्यांना स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या मागणीची व्याप्ती सांगितली. आपण मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मुंबईतील आपलं समर्थन गमावून बसू. त्यानंतर पुढे त्यांनी हे चव्हाणांपुढे मांडलं. मग भाषाअधारित राज्यनिर्मितीला होकार दिला."
 
स. का. पाटील इथं शेवटी म्हणतात की, "महाराष्ट्र निर्मितीत माझ्या सहभागाच्या सत्यता अनेकांना माहित नाही."
 
यापुढे स. का. पाटील खंतही व्यक्त करतात. ते म्हणतात, "संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला मला निमंत्रणही दिलं गेलं नाही. 10 मे 1960 रोजी मी अमेरिकेला जाणार होता. पण मला निमंत्रणच नसल्यानं माझा अमेरिका दौरा पुढे सरकवला आणि 1 मे रोजीच गेलो. मला खूप दु:ख झालं होतं."
 
स. का. पाटील म्हणतात की, "मी महाराष्ट्राच्या निर्मितीच्या विरोधात कधीच नव्हतो. देशाची भाषेच्या आधारावर विभागणी होऊ नये, इतक्याच मताचा मी होतो."
 
यशवंतराव चव्हाणांनीही महाराष्ट्र निर्मितीत माझ्या सहभागाचा कुठे उल्लेख केला नाही, याची खंतही स. का. पाटील आत्मकथेत व्यक्त करतात. यात ते शेवटी सांगतात की, ज्यांना खरं जाणून घ्यायचंय, त्यांनी यशवंतराव चव्हाणांच्या नातेवाईकांनी त्यांचं लिहिलेलं चरित्र वाचावं.
 
पण नेमके कुणी लिहिलेलं आणि चरित्राचं नाव काय, हे स. का. पाटलांनी नमूद केले नाही. पण एक गोष्ट निश्चित की, स. का. पाटलांनी आत्मकथेत संयुक्त महाराष्ट्रामुळे त्यांची झालेली बदनमाी वेदनादायी होते असं म्हटलंय.
 
कामराज प्लॅन नेहरूविरोधींना बाहेर काढण्यासाठी होता?
कामराज प्लॅनबाबत स. का. पाटील यांनी आत्मकथेत नोंदवलेली मतं फारच वादग्रस्त आहे. मात्र, एकसारखीच मतं माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या आत्मकथेच्या दुसऱ्या खंडात नोंदवली आहेत.
 
1963 साली तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांनी एक योजना आणली. काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनी राजीनामे द्यायचे आणि संघटनेत काम करायचं, असा उद्देश या योजनेचा होता. कामराज प्लॅन म्हणून पुढे या योजनेला ओळखलं गेलं.
या योजनेअंतर्गत मोरारजी देसाई, जगजीवन राम, लाल बहादूर शास्त्री, स. का. पाटील यांसारखे केंद्रीय मंत्री, तर अनेक तत्कालीन काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही राजीनामे दिले.
 
मात्र, स. का. पाटलांच्या मते, "पंडित नेहरू आणि त्यांची मुलगी इंदिरा गांधी यांनी मंत्रिमंडळात नको असलेल्या मंत्र्यांना बाहेर काढण्यासाठी कामराज प्लॅन आणला होता."
 
माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी त्यांच्या 'द स्टोरी ऑफ माय लाईफ' या आत्मकथेच्या दुसऱ्या खंडात कामराज प्लॅनचा उल्लख केलाय. किंबहुना, मे-जून 1963 मध्ये लोकसभा स्थगित झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू काश्मीरमध्ये गेले होते, तिथे बिजू पटनाईकही सोबत होते, तेव्हा बिजू पटनाईक यांनी ही योजना पहिल्यांदा सांगितली. के. कामराज यांनी त्यांची योजना जुलै 1963 मध्ये मांडली. अशी माहिती मोरारजी देसाईंनी नोंदवून ठेवलीय.
 
शिवाय, कामराज प्लॅनमध्ये ज्या गोष्टी आहेत, त्यावरून तुमच्यावर संघटनेअंतर्गत शंका घेतल्या जातील, असं देसाईंनी थेट नेहरूंनाच सांगितलं होतं. देसाईंनी आपल्या आत्मकथेत स्वतंत्र प्रकरण लिहून कामराज प्लॅनबाबत शंका उपस्थित केलीय. अशीच शंका आधी नमूद केल्याप्रमाणे स. का. पाटलांनीही उपस्थित केलीय.
 
इंदिरा गांधींबद्दल नाराजी आणि 1967 चा पराभव
पंडित नेहरूंची कन्या यापलीकडे लाल बहादुर शास्त्री यांच्यानंतर पंतप्रधान बनण्यासाठी इंदिरा गांधी यांच्याकडे अनुभव नव्हता, असं मत स. का. पाटील यांनी आत्मकथेत नोंदवलं आहे.
 
स. का. पाटील हे आधी वल्लभभाई पटेल यांचे निकटवर्तीय आणि नंतर मोरारजी देसाई यांचे समर्थक म्हणून ओळखले जात. त्यामुळे इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचं फारसं जमलं नाही.
 
स. का. पाटील यांनी इंदिरा गांधींसाठी आपण बऱ्याचवेळा मार्गदर्शकाची भूमिका पार पाडल्याचं म्हटलं. पण सुहास ठाकूर सांगतात की, "ज्या निवडणुकीमुळे स. का. पाटलांच्या राजकारणाला उतरती कळा लागली, त्या 1967 च्या निवडणुकीत पक्षाकडून फारशी मदत झाली नाही. तेव्हा इंदिरा गांधींचा पक्षावर वरचष्मा होता."
 
1967 सालची निवडणूक मात्र भारतत गाजली. एकीकडे मुंबईवर एकहाती वर्चस्व गाजवणारे स. का. पाटील, तर दुसरीकडे संयुक्त सोशालिस्ट पार्टीकडून जॉर्ज फर्नांडीस उभे होते. जॉर्ज यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक होती.
या निवडणुकीत आचार्य अत्रेंपासून सगळ्यांनी जॉर्ज फर्नांडीसांच्या विजयासाठी जोर लावला. त्यावेळची भाषणंही गाजली.
 
निळू दामलेंनी जॉर्ज फर्नांडिस यांचं 'सुसाट जॉर्ज' नावानं चरित्र लिहिलंय. त्यात ते म्हणतात, "स. का. पाटील हे काँग्रेसचे नेते मुंबईतून निवडून जात. काँग्रेसची अखिल भारतीय थैली त्यांच्याकडं असे. पैसे गोळा करण्यात त्यांचा हातखंडा होता. भारतातला खूप पैसा मुंबईत होता. मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी होती. मोठमोठाले कारखाने मुंबईत होते. भारतातले मोठे धनिक उद्योगपती मुंबईत असत. स. का. पाटील त्या मंडळींची काळजी घेत असल्यानं पाटील यांच्याकडे पैसा असे."
 
यावरूनच ही निवडणूक किती आव्हानात्मक होती हे लक्षात यावं. मात्र, याच पुस्तकात निळू दामले पुढे एक प्रसंग लिहितात. त्यावरून इंदिरा गांधी यांनी स. का. पाटलांना पाडण्यासाठी केलेले प्रयत्न दिसून येतात.
 
या प्रसंग सांगताना निळू दामले लिहितात - एकदा जॉर्जना दिल्लीतून यशवंतराव चव्हाणांच फोन आला. चव्हाण तेव्हा केंद्रीय गृहमंत्री होते आणि इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. चव्हाणांनी जॉर्जना दिल्लीत भेटायला बोलावलं.
 
जॉर्ज फर्नांडिस दिल्लीत जाऊन चव्हाणांना भेटले. चव्हाणांनी आस्थेनं चौकशी केली आणि निवडणूकनिधीला व्यक्तीगत देणगी दिली.
 
चव्हाण हे इंदिरा गांधी यांच्या शब्दाबाहेर असण्याची शक्यता नव्हती, म्हणजे इंदिरा गांधींनाही स. का. पाटील निवडून यायला नको होते, अशी शंका या पुस्ताक निळू दामले उपस्थित करतात.
 
स. का. पाटलांनी इंदिरा गांधी यांच्याबाबत आत्मकथेत केलेल्या वर्णानाला दुजोरा देणारा हा प्रसंग आहे.
 
या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांना 1 लाख 47 हजार 841 मतं, तर स. का. पाटलांना 1 लाख 18 हजार 407 मतं पडली. स. का. पाटील पराभूत झाले आणि त्यांच्या राजकीय घसरणीचा काळही सुरू झाला.
 
पुढे काँग्रेस फुटली आणि इंदिरा गांधींच्या विरोधातील नेतेमंडळी काँग्रेस (ओ) मध्ये गेली. या काँग्रेसला सिंडिकेट काँग्रेस म्हणतात. स. का. पाटीलही ऑर्गनायझेशन काँग्रेसमध्ये गेले.
 
साऊथ बॉम्बेतून पराभूत झाल्यानंतर स. का. पाटील गुजरातमधील बनासकांठा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून लोकसभेत निवडून गेले. मात्र, त्यांच्या कारकीर्दीतला हा त्यांचा शेवटचा विजय ठरला.
 
राजकीय सक्रीयतेचा अस्त
1971 साली स. का. पाटील पुन्हा गुजरातमधील बनासकांठा मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीला उभे राहिले. मात्र, तिथून ते पराभूत झाले. काँग्रेस (ऑर्गनायझेशन) कडूनच स. का. पाटील यावेळीही उभे होते. मात्र, इंदिरा काँग्रेसच्या पोपटलाल जोशींनी त्यांच पराभव केला.
 
या पराभवानंतर स. का. पाटील राजकारणातून बाहेरच पडले. ते फारसे सक्रीय राहिले नाहीत.
 
स. का. पाटलांचे नातू आणि त्यावेळी त्यांच्यासोबत वावरणारे सुहास ठाकूर सांगतात, "स. का. पाटील 1971 च्या निवडणुकीनंतरही रोज त्यांच्या कार्यालयात जाऊन बसत. भेटीला आलेल्या लोकांशी चर्चा करत."
 
लोक ज्यांच्या बाजूने, त्यांनी सत्ता गाजवावी, या मताचे स. का. पटील होते, असं ठाकूर सांगतात. त्यामुळे स. का. पाटलांना पराभव आणि सत्तेत नसल्याची कधीच खंत वाटली नसल्याचंही ठाकूर म्हणतात.
"1980 साली संजय गांधी यांचं निधन झालं, तेव्हा स. का. पाटील दिल्लीत जाऊन इंदिरा गांधींना भेटले. इंदिरा गांधींनी स. का. पाटलांच्या खांद्यावर डोकं ठेवून रडल्या होत्या. मी तिथेच बाजूला उभा होता," असंही ठाकूर सांगतात.
 
1981 साली 24 मे रोजी स. का. पाटील यांचं निधन झालं. बॅरिस्टर ए. आर. अंतुले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.
 
स. का. पाटील मूळचे कोकणातले आणि बॅरिस्टर अंतुलेही कोकणातलेच.
 
शोकसंदेशात बॅरिस्टर अंतुले म्हणाले होते, "स. का. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची, विशेषत: कोकणची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे."
 
संदर्भ :
 
माय इयर्स विथ काँग्रेस - स. का. पाटील
ऑर्गनायझेशनल रिकंस्ट्रक्शन अँड द फ्युचर प्रोग्राम - स. का. पाटील
द स्टोरी ऑफ माय लाईफ - मोरारजी देसाई
सुसाट जॉर्ज - निळू दामले
विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड सातवा) - य. दि फडके
विसाव्या शतकातील महाराष्ट्र (खंड आठवा) - य. दि. फडके
लोकराज्य अंक (मे 1981)
द न्यूयॉर्क टाइम्स वृत्तपत्राचे अर्काईव्ह्ज