गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

चांद्रयान-2: चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारी पहिली मोहीम अशी आहे ऐतिहासिक

- रमेश शिशु
श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन केंद्रामधून चांद्रयान-2 अंतराळात झेपावलं. 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयानचं यशस्वी प्रक्षेपण झालं आणि शास्त्रज्ञांनी जल्लोष केला.
 
चांद्रयान-2 चं प्रक्षेपण 15 जुलैला होणार होतं, मात्र प्रक्षेपणाच्या 56 मिनिटं आधीच हे उड्डाण तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आलं होतं.
 
GSLV MK-3 रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयानाचं प्रक्षेपण करण्यात आलं. 48 दिवसांचा प्रवास करून चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचेल.
 
"हा ऐतिहासिक क्षण आहे. चांद्रयान-2 हे ज्या कक्षेत जाणं अपेक्षित होतं त्याहून 6 हजार किमी दूर गेलं आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. याचाच अर्थ इंधनाची बचत होईल. काही दिवसांपूर्वी तांत्रिक अडचण आली होती. आम्ही 24 तास रॉकेटचं निरीक्षण केलं, चूक शोधून काढली.

इस्रोच्या टीमने केलेलं काम हे अभूतपूर्व आहे. त्यांनी सर्वांनी खूप मेहनत घेतली," अशी प्रतिक्रिया इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी चांद्रयान-2 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर व्यक्त केली.
 
भारताचं चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आजवर चंद्राच्या विषुववृत्तीय प्रदेशामध्ये आजवरची चांद्रयानं उतरली आहेत. चंद्राचा विषुववृत्तीय प्रदेश इतर भागाच्या तुलनेत थोडा सपाट आहे.
 
चंद्राचा दक्षिण ध्रुव मात्र दऱ्याखोऱ्यांचा आणि खडबडीत पृष्ठाचा आहे. त्यामुळे इतर कोणत्याही देशानं आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाण्याचं धाडस केलेलं नाही.
 
या चांद्रयान-2 मोहिमेचं मुख्य उद्देश आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करून त्यातून एक रोव्हर चंद्राच्या पृष्ठावर सोडणं.
 
अशी आहे चांद्रयान-2 मोहीम
चांद्रयान-1 या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे. चंद्रावर सापडलेल्या पाण्याच्या रेणूंवर आणखी अभ्यास करण्याची गरज आहे. चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा गाभा आणि बाह्य वातावरणाचा अभ्यास करून चंद्रावरील पाण्याचे मूळ शोधून काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
 
चंद्रावरील भूरचनेचा अभ्यास, तिथल्या खनिजांचा, त्याच्या बाह्यवातावरणाचा अभ्यास करणं तसेच तेथे कोणत्या स्वरूपात पाणी उपलब्ध आहे, हे पाहाणं या सुद्धा चांद्रयान-2 मोहिमेच्या उद्दिष्टांमध्ये समावेश आहे.
 
चंद्राच्या पृष्ठावर सॉफ्ट लँडिंग करणारा, त्याच्या भूरचनेचा, अंतर्गत गर्भाचा आणि वातावरणाचा अभ्यास करणारा भारत चौथा देश झाला आहे. यापूर्वी असी कामगिरी सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि चीन यांनी केली आहे. मानवाला दीर्घकाळ फायदेशीर ठरेल, अशा गोष्टींचा अभ्यास या मोहिमेत करण्याचा प्रमुख उद्देश आहे.
 
कसं आहे हे चांद्रयान?
या चांद्रयानाचे तीन भाग असतील. यामध्ये ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हरचा समावेश आहे.
 
लँडरचं नाव 'विक्रम' असं ठेवण्यात आलं आहे. भारतीय अंतराळ मोहिमेचे जनक मानले जाणारे डॉ. विक्रम साराभाई यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आलं आहे.
रोव्हरचं नाव 'प्रग्यान' असं ठेवण्यात आलं आहे. हे सर्व भाग इस्रोने तयार केले आहेत.
ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील.
विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग तंत्राने उतरेल. त्यातून प्रग्यान बाहेर पडेल आणि चंद्रावरील भूरचनेची माहिती गोळा करण्याचं, वेगवेगळे प्रयोग करण्याचं काम करेल. नंतर हे यान मॅंझिनस-सी आणि सिंपेलीयस-एन या दोन क्रेटर म्हणजे खोलगट दऱ्यांच्या मधल्या भागात उतरेल.
 
दुसरा भाग म्हणजे रोव्हर हे चंद्रावरील दिवसभराच्या मोहिमा आणि वेगवेगळे प्रयोग करण्याचं काम करेल. चंद्रावरचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरच्या 14 दिवसांएवढा लांब असतो.
 
तर ऑर्बिटर एक वर्षभर कार्यरत राहील.
 
GSLV MK-III हे 640 टन वजनाचे लाँचर भारतानं आजवर तयार केलेलं सर्वांत जास्त वजनदार लाँचर आहे. हे लाँचर 3,890 किलो वजनाचं चांद्रयान-2 घेऊन जाईल. या यानामध्ये 13 वैज्ञानिक उपकरणं आहेत. या 13 उपकरणांमध्ये 1 उपकरण नासाचं आहे.
 
चांद्रयान चंद्रावर अशोक चक्र आणि इस्रोच्या चिन्ह उमटवून परतणार आहे. रोव्हरच्या एका चाकावर अशोकचक्र आणि दुसऱ्यावर इस्रोचं चिन्ह आहे. त्यामुळे रोव्हर उतरल्यानंतर त्यांची प्रतिमा चंद्रावर उमटेल.
 
दक्षिण ध्रुवावरच का?
चंद्राचा दक्षिण ध्रुव इतका खडबडीत आहे तर मग तिथं चांद्रयान उतरवण्याची का धडपड सुरू आहे, असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर आजवर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास झालेला नाही. त्यामुळे या मोहिमेतून काहीतरी नवं सापडेल, असं मानलं जात आहे.
 
या भागाचा मोठा प्रदेश सूर्याच्या सावलीत असतो आणि सूर्यकिरणं कमी प्रमाणात पोहोचल्यामुळे हा प्रदेश अत्यंत थंड झाला आहे. त्यामुळे कायम अंधारात असणाऱ्या या प्रदेशात पाण्याचे अंश किंवा खनिजं असतील असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
 
नुकत्याच झालेल्या काही चांद्रमोहिमांमधून त्यावर थोडंफार संशोधनही झालं आहे. जर त्यावर अधिक संशोधन झालं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध लागला तर भविष्यात माणसाला ते फायदेशीर ठरेल.
 
चंद्रावर माणसाचं इतकं लक्ष का?
जर माणूस अंतराळात गेला नाही तर माणसाला भविष्यच उरणार नाही, असं मत प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज यांनी व्यक्त केलं होतं.
 
अंतराळ मोहिमा पार पाडण्यासाठी चंद्र अत्यंत आश्वासक आहे. पृथ्वीच्या प्राचीन इतिहासाचा आणि चंद्राचा संबंध आहे. सौरमालेच्या निर्मितीचे ऐतिहासिक पुरावेही यामुळे समोर येतात त्यामुळेच चंद्रावरती इतकं लक्ष दिलं जातं.