शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

118 मुलांना दत्तक घेणाऱ्या ‘लव्ह मदर’ला का जावं लागलं तुरुंगात?

'लव्ह मदर' म्हणून चीनसह जगभरात नावाजलेल्या ली यांक्झिया या महिलेला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. 118 चिमुकल्यांना दत्तक घेतल्यानंतर 54 वर्षीय ली यांक्झिया प्रसिद्धीच्या झोतात आली होती.
 
खंडणी, फसवणूक, कट रचणे आणि सामाजिक अशांतता निर्माण करणे अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये ली यांक्झिया दोषी आढळली. त्यानंतर चीनमधील हेबेई प्रांतातील वुआन कोर्टाने तिला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. तिला 20 लाख 67 हजार युआन (सुमारे 2 कोटी 65 लाख 18 हजार रुपये) इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. ली यांक्झिया आणि तिच्या मित्रासह इतर 14 जणांना या प्रकरणी कोर्टाने दोषी ठरवलं आहे.
 
ली यांक्झियाचा मित्र शू ची याच्यावरही खंडणी, फसवणूक आणि दुखापत करण्याचा हेतू असे गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्याला साडे बारा वर्षे तुरुंगवास आणि 12 लाख युआन दंड ठोठावण्यात आला आहे. तर इतर 14 जणांना प्रत्येकी चार वर्षे तुरुंगात राहावं लागणार आहे.
 
ली यांक्झिया अनाथाश्रमाच्या प्रसिद्धीचा गैरवापर करत असल्याचं आढळलं. "ली यांक्झिया हिने तिचा मित्र आणि इतर 14 जणांच्या मदतीने आर्थिक फायद्यासाठी फसवणूक केली," असं वुआन कोर्टाने विबो या मायक्रोब्लॉगिंग साईटरुन प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
 
चीनमधील 'लव्ह मदर'
ली यांक्झिया 2006 साली पहिल्यांदा प्रकाशझोतात आली होती. वुआनमधील काही चिमुकल्यांना तिने दत्तक घेतलं होतं. त्यावेळी अनेक चिनी माध्यमांनी ली यांक्झियाच्या या कृतीचं भरभरून कौतुक केलं होतं. त्यावेळी ली यांक्झियाने मुलं दत्तक घेण्यामागची कथा माध्यमांना सांगितली होती. तिचं लग्न झालं होतं, मात्र घटस्फोट झाल्यानंतर ती पतीपासून वेगळी राहू लागली. विभक्त झाल्यानंतर नवऱ्याने त्यांच्या मुलाला केवळ 7 हजार युआनमध्ये विकलं होतं, असं ली यांक्झिया सांगते.
 
मुलाला परत मिळवण्यात ली यांक्झियाला नंतर यश आलं, मात्र तिथेच तिचं आयुष्य बदल्याचं ती सांगते. आपल्या मुलाबाबतचा अनुभव गाठीशी धरून ली यांक्झियाने इतर अनाथ मुलांना आधार देण्याचं ठरवलं. कालांतराने ली यांक्झियाकडे पैसा आला. हेबेईमधील सर्वात श्रीमंत महिला म्हणूनही तिची गणना होऊ लागली. 1990 च्या दशकात तिने एका लोह खाणकाम कंपनीत गुंतवणूक केली आणि पुढे त्याच कंपनीची ती मालकीणही झाली.
 
"खाणकाम कंपनीत पाच-सहा वर्षांची एक चिमुकली फिरताना दिसली. तिच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि आई तिला सोडून गेली होती. त्या चिमुकलीला मी माझ्या घरी नेलं. मी दत्तक घेतलेली ती पहिली होती." असं यांझाओ मेट्रोपलीस डेलीला दिलेल्या मुलाखतीत ली यांक्झियाने सांगितलं होतं.
 
त्यानंतर ली यांक्झियाने अनेक मुलांना दत्तक घेण्यास सुरुवात केली. या मुलांसाठी 'लव्ह व्हिलेज' नावाचे अनाथाश्रमह सुरु केलं. या एकूणच उपक्रमाबद्दल, प्रवासाबद्दल लीने अनेकदा वृत्तपत्रातूनही लिहिले. ली यांक्झियाने कर्करोगाशीही लढा दिला होता. त्याबद्दलही तिने अनेक ठिकाणी लिहिले आहे.
 
…आणि 'लव्ह मदर'चं बिंग फुटलं
 
2017 पर्यंत ली यांक्झियाच्या 'लव्ह व्हिलेज'मध्ये 118 अनाथ मुलं होती. याच वर्षी स्थानिक सरकारला काही जणांकडून ली यांक्झिया यांच्या संशयास्पद हालचालींबद्दल कळलं होतं. मे 2018 मध्ये ली यांक्झियाच्या बँक अकाऊंटमध्ये पोलिसांना 20 लाख युआन आणि 20 हजार डॉलर इतकी भलीमोठी रक्कम आढळली. शिवाय तिच्याकडे लँड रोव्हर, मर्सिडीज बेन्झ यांसारख्या अलिशान गाड्याही होत्या. 2011 सालापासूनच ली यांक्झिया अवैध गोष्टींमध्ये गुंतली असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.
 
इमारत किंवा इतर बांधकामांमध्ये अडथळे निर्माण करण्यासाठी ली यांक्झिया या दत्तक मुलांचा वापर करायची. एखाद्या बांधकामाजवळून ये-जा करणाऱ्या ट्रकखाली मुलाला चिरडवलं जाई आणि मग ली यांक्झिया बांधकाम करणाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी गोळा करत असे. दत्तक मुलांच्या आश्रयासाठी बांधलेल्या 'लव्ह व्हिलेज' अनाथाश्रमाच्या माध्यातूनही तिने पैसे मिळवले होते.
 
2018 च्या मे महिन्यातच या गुन्ह्यांप्रकरणी ली यांक्झियाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ज्यावेळी ली यांक्झियाला पोलिसांनी तांब्यात घेतलं, त्यावेळी 'लव्ह व्हिलेज'मध्ये केवळ 74 मुलं राहिली होती. या सर्व मुलांना सरकारी शाळा किंवा इतर सरकारी संस्थांमध्ये पाठण्यात आलं.
 
चीनमध्ये सोशल मीडियावरून ली यांक्झियावर प्रचंड टीका होत आहे. "हे किळसवाणं आहे. माझ्या काकांनी तिच्या अनाथाश्रमला देणगी दिली होती." असं एका चिनी व्यक्तीने विबो या मायक्रोब्लॉगिंग साईटवर म्हटलंय. तर आणखी एक चिनी व्यक्ती विबोवर म्हणाला आहे की, "मी तिला 'लव्ह मदर' म्हणायचो. मात्र मी माझे शब्द मागे घेतो. तिच्यात अजिबात प्रेम नाहीय. प्रेम या शब्दासाठी ती लायक नाही."