शुक्रवार, 20 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (21:07 IST)

बांगलादेशातून नागपुरात परतलेल्या विद्यार्थ्यांचा अनुभव, 'आमच्या डोळ्यांसमोर लोक मारले गेले'

- भाग्यश्री राऊत
"आंदोलन हिंसक झाल्यामुळे कर्फ्यू लागला होता. त्यामुळे नीट खायला सुद्धा मिळत नव्हतं. दुपारी 1-2 च्या दरम्यान दुकानं, रेस्टॉरंट सुरू असायची. त्यामुळे या वेळेत आम्ही जेवायला बाहेर पडत होतो. त्याचवेळी रात्रीचंही जेवण घेऊन येत होतो.
 
"पण, कधी कधी जेवण खराब व्हायचं. त्यामुळे उपाशीच झोपावं लागत होतं. आम्ही दुपारी जेवण आणायला बाहेर पडलो त्यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट सुरू होती. यातच गोळीबार झाला आणि आमच्यासमोरच दोन-तीन जणांचा जीव गेला."
 
बांगलादेशातून नागपुरात परतलेला अबुजार अली खान बांगलादेशातील डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती सांगत होता.
 
हे सांगताना अबुजारच्या चेहऱ्यावर आताही भीती दिसत होती.
 
अबुजार नागपुरातल्या जाफरनगर भागात राहतो. त्याचे वडील व्यवसाय करतात, तर आई शिक्षिका आहे. भारतापेक्षा बांगलादेशात मेडिकलचं शिक्षण कमी पैशांत होत असल्यानं त्यानं ढाकामधल्या शिराजुल इस्लाम या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.
 
सध्या तो एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला आहे. गेल्या जानेवारी महिन्यापासून त्यांचं नवीन सत्र सुरू झालंय. पण, मध्यंतरी त्यांना ईदसाठी सुट्टी मिळाली होती.
 
नागपुरात ईदचा उत्सव साजरा करुन ते बांगलादेशमध्ये गेले तेव्हा तिथलं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. देशाच्या काही भागांमध्ये लहान-मोठी आंदोलनं सुरू होती.
 
पण, 18 जुलैला ढाकामध्ये आंदोलन अधिक तीव्र आणि हिंसक झालं. कॉलेजचे काही विद्यार्थी आंदोलनात सहभागी असल्यानं त्यांना या आंदोलनाची कल्पना होतीच. पण, 18 जुलैला इंटरनेट अचानक बंद झाल्यानं भीती आणखी वाढली होती.
 
तिथल्या परिस्थितीबाबत अबुजार सांगतो, "गोळीबाराचे आवाज येत होते. जेवणासाठी बाहेर पडलं की लष्काराच्या टँक ठिकठिकाणी दिसत होत्या. आंदोलक तोडफोड, जाळपोळ करत होते. हेलिकॉप्टर रात्रभर घोंगावत होते. त्यामुळे झोपही येत नव्हती."
 
फक्त अबुजार नाहीतर नागपूर आणि आजूबाजूच्या परिसरातले आणखी काही विद्यार्थी बांगलादेशमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेतात.
 
नागपुरातल्या जाफरनगर भागातले सहा जण ढाकामध्ये मेडिकलची पदवी घेत आहेत.
 
त्यापैकी चार जणांशी आमचा संपर्क झाला. अर्सालन हसनाई, अमान शरीफ हे दोन विद्यार्थी ढाका कम्युनिटी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला आहेत, तर सुमेरा सगीर ही विद्यार्थिनी ढाकामधल्या सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये तिसऱ्या वर्षाला शिकतेय.
 
सुमेराच्या वसतिगृहाच्या जवळच्या परिसरात माजी पंतप्रधान शेख हसीना राहत होत्या. त्यामुळे या भागात आंदोलन अधिक हिंसक असल्यांचं सुमेरा सांगतेय.
 
ती बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाली, "आंदोलनं सुरू असल्यानं हॉस्टेलमधून बाहेर पडण्यास बंदी होती. पण, 18 जुलैला जसं इंटरनेट बंद झालं तेव्हा आम्ही घाबरलो. ढाकामधली परिस्थिती अधिकच चिघळल्याची माहिती आम्हाला हॉस्टेलमध्ये मिळाली.
 
"माझे भारतातले मित्र आधीच निघून गेले होते. पण, मी अशा परिस्थिती सहा दिवस तिथं काढले. कारण मला फ्लाईटचं तिकीटचं मिळत नव्हतं. पण, आम्ही भारतीय दुतावासाच्या संपर्कात होतो," सुमेरा सांगतात.
 
सगळे विद्यार्थी भारतात कसे परतले?
सुमेरा राहत असलेल्या परिसरात आंदोलन तीव्र असल्यानं भारतीय दुतावास त्यांना सूचना देत होतं. शेवटी भारतीय दुतावासाने सुमेराच्या कॉलेजमध्ये एक बस पाठवली. त्यानंतर तिच्यासह आणखी 45 विद्यार्थी बसनं कॉलेजमधून बाहेर पडले.
 
"आम्ही भारतात येण्यासाठी कॉलेजच्या वसतिगृहाच्या बाहेर पडलो तेव्हा आमची तपासणी करण्यात आली. तिथं आंदोलक देखील होते. लष्कराचे जवान आम्हाला ठिकठिकाणी विचारपूस करत होते. पण, आमचा पासपोर्ट बघून आम्ही भारताचे आहोत हे खात्री पटल्यानंतर त्यांनी आम्हाला सोडून दिलं. लष्कर ठिकठिकाणी आमची तपासणी करत होते. रस्त्यावर आंदोलकही होते. त्यामुळे भीती वाटत होती. आम्ही बांगलादेश-भारताची सीमा बदलून कोलकात्यामध्ये आलो तेव्हा जीवात जीव आला," असं सुमेरा सांगत होती.
 
आंदोलन चिघळल्याच्या सहाव्या दिवशी म्हणजे 24 जुलैला सुमेरा भारतात आली. अबुझारही 24 जुलैला भारतात परतला. सुमेराला विमान मिळालं. पण, अबुझारला नागपूरपर्यंतचा प्रवास रेल्वेनं करावा लागला.
 
अर्सालन हसनाई आणि अमान शरीफ हे दोघेही सोबतच 22 जुलैला भारतात परतले.
 
मुलं अशा परिस्थिती अडकल्यानं आई-वडीलही चिंतेत होते. अर्सालन सांगतो, "18 जुलैला मी घरच्यांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत होतो. पण, अचानक व्हिडिओ कॉल कट झाला. अम्मीला वाटलं काही प्रॉब्लेम असेल तर तिनं मला परत कॉल केला. पण, कॉल काही लागला नाही.
 
"तिनं टाकलेला मेसेज पण मी दुसरा दिवस उजाडला तरी बघितला नव्हता. त्यामुळे अम्मी-अब्बू टेंशनमध्ये होते. त्यांनी इंटरनॅशनल कॉल केला तेव्हा त्यांना परिस्थिती समजली. मी 22 जुलैला भारतात आलो तेव्हा अम्मी-अब्बूचा जीवात जीव आला," अर्सालन सांगतो.
 
विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं नुकसान
आधीच कोरोना काळात विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय. त्यानंतर आता पुन्हा बांगलादेशातील परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे सगळे कॉलेज बंद आहेत.
 
वेळेत कोर्स पूर्ण होईल की नाही या चिंतेत विद्यार्थी आहेत. एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकणारा अर्सलान ही भीती बोलून दाखवतो.
 
तो म्हणतो, "कोरोना काळातही आमचं सात महिन्याचं नुकसान झालं होतं. बांगलादेशी विद्यापीठ हळूहळू हे नुकसान भरून काढत होते. पण, आता आणखी परिस्थिती बिघडली आहे. त्यामुळे आमच्या अभ्यासाचं आणखी नुकसान झालंय. आता अभ्यासाचं आणखी किती नुकसान होईल माहिती नाही. आमची फायनल परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होती. पण, आता या हिंसाचारामुळे आमची परीक्षा पुढे ढकलली जाऊ शकते. त्यामुळे दोन-तीन महिने आमचं आणखी नुकसान होईल."
 
अभ्यासाचं नुकसान होत असल्यानं बांगलादेशमधली परिस्थिती लवकर बरी होईल अशी आशा या विद्यार्थ्यांना आहे. पण, परिस्थिती ठीक झाल्यावर आम्ही दोन आठवडे वाट बघू आणि त्यानंतर जाऊ असं ढाका कम्युनिटी मेडीकल कॉलेजमध्ये चौथ्या वर्षाला शिकणारा विद्यार्थी अमान शरीफ सांगतो.
 
तो बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाला, "ढाका वगळून इतर लहान शहरांमधली आंदोलन थोडी कमी होत आहेत. त्यामुळे तिथले कॉलेज 15 ऑगस्टपर्यंत सुरू होतील अशी माहिती मिळतेय. पण, 15 ऑगस्टपर्यंत कोणीही बांगलादेशला जायचं नाही अशा सूचना भारत सरकारनं आम्हाला दिल्या. आम्हाला 15 ऑगस्टनंतर जायला सांगितलं तरी आम्ही दोन आडवड्यानंतर जाऊ. कारण, सध्याची परिस्थिती बघून भीती वाटतेय. पण, पदवी पूर्ण करायची तर जावं लागेलच."
 
तिथले स्थानिक विद्यार्थी आणि बांगलादेश सरकारमधली हे हिंसक लढाई होती. त्यांनी बाहेर देशातल्या कुठल्याच लोकांना त्रास दिला नाही, असंही हे विद्यार्थी सांगतात.
 
विद्यार्थी भारत सोडून बांगलादेशमध्ये मेडिकलच्या शिक्षणासाठी का गेले?
भारतात सरकारीसह खासगी मेडिकल कॉलेज आहेत. मग हे विद्यार्थी शेजारच्या बांगलादेशमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेण्यासाठी का गेले? तर याबद्दल त्यांनी सविस्तर समजावून सांगितलं.
 
अमान सांगतो, भारतात सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर नीटमध्ये खूप जास्त गुण लागतात. पण, एक जरी गुण त्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सरकारी कॉलेज मिळत नाही.
 
खासगी कॉलेजमधून एमबीबीएस करायचं असेल तर कोटींच्या घरात पैसे मोजावे लागतात. पण, बांगलादेशमध्ये फक्त 30-40 लाख रुपयांमध्ये आमची पाच वर्षांची एमबीबीएसची पदवी पूर्ण होते, असं अमान सांगतो.
 
तसेच बांगलादेश आणि भारताच्या शिक्षणामध्ये जास्त फरक जाणवत नाही. अभ्यास हा इंग्रजीतूनच असतो. पण दैनंदिन व्यवहारासाठी फक्त तिथं बांगला ही भाषा आहे. पण, ती भाषाही सहज शिकता येते. अनेकांना तर हिंदी देखील येतं, त्यामुळे भाषेची अडचण येत नाही असं हे विद्यार्थी सांगतात.