गुरूवार, 10 ऑक्टोबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य लेख
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑगस्ट 2024 (12:34 IST)

जगातल्या इतर लोकांपेक्षा 'इथल्या' लोकांचे हृदय आणि मेंदू उशिरा म्हातारे होतात!

heart
मार्टिना कांची नेटे बोलिव्हियन जंगलातून चालत होत्या, त्यांच्या भोवती लाल फुलपाखरं पिंगा घालत होती. आम्हाला त्यांना थांबायला सांगावं लागत होतं. कारण आमची टीम त्यांच्या गतीने चालू शकत नव्हती.
 
त्यांच्या ओळखपत्रावर त्या 84 वर्षांच्या असल्याचं लिहिलं होतं. मात्र, 10 मिनिटांच्या आत त्यांनी तीन यका झाडं उपटून काढली. कारण या झाडाच्या मुळातून त्यांना काही कंदमुळं काढायची होती. त्यांनी चाकूचे दोन घाव घातले आणि केळीची झाडं तोडली. त्यांनी फळांचा एक गठ्ठा त्यांच्या पाठीवर ठेवला आणि त्या जिथे मका, केळी, तांदूळ, आणि रताळे वाढवतात तिथून त्या घरी जाऊ लागल्या.
 
मार्टिना चिमानायनाय या निम-भटक्या समुदायातील आहेत. त्यांची संख्या 16 हजार असून ते बोलिवियाची राजधानी ला पेझपासून उत्तरेला 600 किमी असलेल्या अमेझॉनच्या जंगलात राहतात.
 
त्यांचा उत्साह त्यांच्या समुदायातील लोकांसाठी नवीन नाही. वैज्ञानिकांच्या मते, या गटातील लोकांच्या धमन्या जगातील सर्वांत निरोगी धमन्या आहेत. उत्तर अमेरिका, युरोप आणि जगातल्या अन्य भागांपेक्षा त्यांचा मेंदूही उशिरा म्हातारा होतो.
 
चिमानायनाय हा एक दुर्मिळ समुदाय आहे. शिकार आणि शेतीवर पूर्णपणे अवलंबून जगणाऱ्या शेवटच्या काही लोकांमध्ये त्यांचा समावेश होतो. संशोधन करायचं असेल तरी या गटामुळे मोठा सँपल साईझ मिळतो. हिलार्ड कपलान नावाचे मानववंशशास्त्रज्ञ गेल्या दोन दशकांपासून त्यांच्यावर संशोधन करत आहेत.
 
प्राण्यांची शिकार, अन्नपदार्थांसाठी झाडं वाढवणं आणि छप्पर तयार करणं अशा कामात इथले लोक गुंतलेले असतात.
 
दिवसाउजेडी जितका काळ असतो, त्यापैकी 10 % वेळ ते बैठ्या कामात घालवतात. औद्योगिक क्षेत्रात काम करणारी लोक 54 % वेळ बैठ्या कामात घालवतात. एका शिकारीला सरासरी आठ तासापेक्षा जास्त वेळ लागतो आणि 18 किमीपेक्षा जास्त परिसर फिरावा लागतो.
 
ही लोक मॅन्किव्ही नदीवर राहतात. जवळच्या गावापासून जवळजवळ 100 किमी अंतरावर हे गाव आहे. प्रकिया केलेले अन्न, दारू आणि सिगारेट त्यांना सहजी मिळत नाही. त्यांच्या शरीरात खाण्यातून ज्या कॅलरी मिळतात त्यापैकी 14 % टक्के कॅलरी स्निग्ध पदार्थांपासून मिळवतात. हेच प्रमाण अमेरिकेत 34 % आहे. त्यांच्या जेवणात तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं. 72 % कॅलरी ते कर्बोदकांमधून मिळवतात. अमेरिकेत हे प्रमाण 52 % आहे.
 
पक्षी, माकडं आणि माश्यांची ते शिकार करतात. तेच त्यांचा प्रथिनांचा स्त्रोत आहे. स्वयंपाकाबद्दल बोलायचं झालं तर ते कोणतेही पदार्थ तळत नाहीत
 
प्रा. कलापन, त्यांचे सहकारी मायकेल गुरवेन (कॅलिफोर्निया विद्यापीठ) आणि सँटा बार्बरा या तिघांचा सुरुवातीचा अभ्यास मानववंशशास्त्राशी निगडीत होता. मात्र या समुदायातील वृद्ध लोकांना म्हातारापणातील उच्च रक्तदाब, डायबेटिस, किंवा हृदयरोगाची कोणतीही लक्षणं नव्हती.
 
2013 मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधाने त्यांचे लक्ष वेधून घेतलं. अमेरिकेतले हृदयरोगतज्ज्ञ रँडल. सी. थॉम्पसन यांच्या एका टीमने इजिप्त, इन्का आणि उनगन संस्कृतीतल्या 137 ममीजचा अभ्यास करण्यासाठी सीटी स्कॅनचा आधार घेतला.
 
माणसाचं वय जसं वाढतं तसं मेद, कोलेस्टेरॉल, आणि इतर पदार्थांमुळे धमन्या कडक होतात, त्यामुळे अथेरोस्केलेरॉसिस नावाचा आजार होतो. या आजाराची 47 ममींमध्ये लक्षणं या टीमला दिसली. त्यामुळे आधुनिक जीवनशैलीमुळेच हे आजार होतात या धारणेला त्यांनी छेद दिला.
 
त्यांच्याबरोबर संशोधनासाठी आणखी दोन टीम्स आल्या आणि त्यांनी चिमामनायनाय समुदायातील 40 वर्षांच्या वरच्या वयाच्या 705 लोकांच्या शरीरातील कोरोनरी आर्टरी कॅल्शियमची (CAC) तपासणी केली. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
 
लॅन्सेट जर्नलमध्ये त्यांचा शोधनिबंध 2017 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाला. त्यात 65% लोकांना CAC ची कोणतीही लक्षणं नव्हती. त्यांच्या तुलनेत 80% अमेरिकन लोकांमध्ये ही लक्षणं आढळली.
 
कलापन सांगतात, “75 वर्षीय चिमामनायनाय समुदायातील लोकांची धमनी ही 50 वर्षीय अमेरिकन माणसासारखी आहे.”
 
याच संशोधनाचा दुसरा भाग 2023 मध्ये जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित झाला होता. त्यात असं आढळलं की वयोवृद्ध चिमामनायनाय लोकांमध्ये मेंदूची झीज त्यांच्याच वयाच्या युके, जपान आणि अमेरिकेतल्या लोकांपेक्षा 70 टक्क्यांनी कमी होते.
 
“वयस्क लोकांमध्ये अल्झायमरचा एकही रुग्ण दिसला नाही. हे फारच उल्लेखनीय आहे,” असं बोलिव्हियामधील डॉक्टर डॅनियल ईद रोड्रिग्ज यांनी आम्हाला सांगितलं. ते या संशोधकांबरोबर वैद्यकीय समन्वयक म्हणून काम करतात.
 
तसं पाहायला गेलं तर सिमाने याचं वय शोधणं हे काही शुद्ध शास्त्र म्हणता येणार नाही. काहींना संख्याच मोजता येत नाही, कारण त्यांना आकडेवारीच शिकवलेली नसते.
 
त्यांच्या भागातील ख्रिश्चन मिशनने काही नोंदी ठेवल्या आहेत. ते एकमेकांना किती काळ ओळखतात यावरून त्यांचं वय ठरतं. मुलांच्या वयानुसार वैज्ञानिक त्यांच्या पालकांचं वय मोजतात.
 
त्यांच्या नोंदीनुसार हिलडा यांचं वय 81 आहे. मात्र त्या म्हणतात की, त्यांचा 100 वा वाढदिवस की काहीतरी साजरा करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी एक डुक्कर कापला.
 
जुआन म्हणतात की, ते 78 वर्षांचे आहेत. ते आम्हाला शिकारीसाठी बाहेर घेऊन गेले. त्यांचे केस काळे आहेत. त्यांच्या डोळ्यात तेज आहे आणि त्यांचे बाहू अजूनही मजबूत आहे. त्यांनी एका रानडुकराकडे लक्ष वेधल्याचं आम्ही पाहिलं मात्र तो पळून जाण्यात यशस्वी ठरला.
 
आपलं वय जाणवत असल्याचं ते म्हणतात, “माझं शरीर हा आता माझ्यासाठी त्रासदायक होत आहे. आता मी जास्त चालू शकत नाही. जास्तीत जास्त दोन दिवस चालू शकतो.”
 
मार्टिना याच्याशी सहमत आहेत. चिमामनायनाय स्त्रिया जटाटापासून छप्पर विणण्यासाठी ओळखल्या जातात. ही झाडं घनदाट जंगलात वाढतात. ते शोधण्यासाठी मार्टिना यांना तीन तास चालावं लागतं आणि तीन तास परतीचाही प्रवास असतो. या झाडाच्या फांद्या पाठीवर न्याव्या लागतात.
 
मी एकदा किंवा दोनदा जाते, आता मात्र माझ्यासाठी कठीण जातं, त्या म्हणतात.
 
अनेक चिमामनायनाय म्हातारे होत नाही. जेव्हा हे संशोधन सुरू केलं तेव्हा त्यांचं सरासरी आयुष्य 45 वर्षं होतं, आता ते वाढून 50 झालं आहे.
 
क्लिनिकमध्ये स्कॅनिंग करतात तेव्हा महिलांना त्यांच्या कुटुंबियांबद्दल विचारलं जातं.
 
बोटावर मोजता मोजता एक बाई म्हणते की, तिला सहा मुलं होती. त्यातली पाच मुलं दगावली. एक सांगते की, तिला 12 मुलं होती, त्यातली 4 दगावली. अजून एक बाई सांगते की, तिला नऊ मुलं आहेत आणि सगळी जिवंत आहेत. पण आणखी तीन मुलं दगावली.
 
“ज्या व्यक्तींनी वयाची 80 वर्षं पूर्ण केली आहेत त्यांना लहानपणी खूप आजार आणि संसर्ग झाला होता,” असं डॉ. ईद म्हणतात.
 
चिमामनायनाय समुदायातील लोकांना लहानपणी पॅरासाईट्सचा काही ना काही संसर्ग झाला आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यांच्या शरीरात खूप रोगजंतू सापडले आणि त्यांच्या शरीरावर सूज होती. त्यामुळे त्यांचं शरीर कायम संसर्गाशी लढत होतं.
 
वृद्ध चिमामनायनाय लोकांच्या आरोग्यामागे आहार आणि व्यायाम यांच्या जोडीला कमी वयात झालेले संसर्ग हे सुद्धा एक कारण आहे का याचा वैज्ञानिक शोध घेत आहेत.
 
या समुदायाची जीवनशैली आता बदलते आहे.
 
जुआन म्हणतात की, अनेक महिने त्यांना जंगलात मोठ्या प्राण्याची शिकार करता येत नाही. 2023 च्या शेवटी जंगलात पसरलेल्या आगीमुळे 20 लाख हेक्टर जंगल आणि वनं नष्ट झाली आहेत.
 
“आगीमुळे सर्व प्राणी निघून गेले आहेत,” ते म्हणाले.
 
त्यांनी आता प्राणी पाळायला सुरुवात केली आहे. त्यांनी आम्हाला गोमांस दाखवलं. यामुळे आमच्या कुटुंबाला पुढचे चार महिने प्रथिनं मिळतील अशी आशा आहे असं ते म्हणाले.
 
बाहेर मोटर असलेली एक बोट आहे. त्याला पिकी-पिकी असं म्हणतात. या बोटीच्या वापरामुळे बराच बदल होत आहे असं डॉ.ईद म्हणाले. त्यामुळे बाजारात जाणं सोपं होतं आणि या समुदायातील लोकांना साखर, कणीक आणि तेल मिळतं.
 
ते सांगतात की, आता ते आधीपेक्षा कमी प्रमाणात नाव वल्हवतात. यात शरीराचा बराच कस लागतो.
 
वीस वर्षांपूर्वी तिथे डायबेटिसच्या अगदी तुरळक केसेस होत्या. आता त्यांचं प्रमाण वाढू लागल्या आहेत. तरुण लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतंय असं संशोधकांना लक्षात आलं आहे.
 
डॉ. ईद सांगतात, “त्यांच्या सवयीतील छोट्या बदलामुळे त्यांच्या आरोग्यात बदल होतो. या लोकांसाठी आता मोतीबिंदूचं ऑपरेशन, तसंच मोडलेली हाडं जोडण्यासाठी आणि सर्पदंशासाठी उपचार करावे लागत आहेत.”
 
मात्र, हिल्डा यांच्या मते म्हाताऱ्या वयाचा ताण घ्यायची गरज नाही. “मी मरणाला घाबरत नाही, कारण मी मेले तरी ते मला पुरतील आणि मी तिथेच राहणार आहे, एकदम स्थिर आणि शांत.”