रविवार, 10 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 25 सप्टेंबर 2023 (21:24 IST)

क्रिप्टो करन्सीमधून गुंतवणूकदार सुनील कावुरीचे काही क्षणात बुडाले तब्बल 17 कोटी रुपये

sunil kavuri
जो टाइडी
  
एफटीएक्स कंपनीच्या दिवाळखोरीमुळे सुनील कुवारी नामक व्यक्तीची आयुष्यभराची कमाई मातीमोल झालीय. ‘किंग ऑफ क्रिप्टो’ सॅम बँकमन-फ्राइडची कंपनी कोसळल्यामुळे शेकडो लोकांची संपत्ती क्षणार्धात ‘नाहीशी’ झालीय.
 
एफटीएक्स कंपनी दिवाळखोर होईपर्यंत सुनील कावुरींना आशा वाटत होती की, सॅम बँकमन-फ्राईड सर्वकाही ठीक करेल.
 
किंबहुना, या ‘किंग ऑफ क्रिप्टो’चं साम्राज्य डगमगू लागलं असताना बरेच लोक अक्षरश: घाबरले होते, मात्र सुनील कावुरी अगदी शांत होते.
 
बँकांसाठी व्यापार आणि क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवण्याच्या अनुभवामुळे सुनील कावुरी यांना बाजारातील चढ-उतारांची सवय झाली होती.
 
आणखी एक कारण हेही होतं की, स्वत: सॅम बँकमन-फ्राईड जगाला शेवटपर्यंत हेच सांगत राहिले की, सर्वकाही ठीक होईल.
 
मग एके दिवशी क्रिप्टोमध्ये पैसे गुंतवणार्‍यांच्या स्क्रीनवर ‘पैसे काढण्याची सुविधा निलंबित करण्यात आलीय.’
 
गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये एफटीएक्स कंपनी दिवाळखोरीत निघाली. ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज कंपनी होती.
 
सुनील कावुरी यांचा अनेक वर्षांपासून सुरू असलेला, मोठ्या काळजीपूर्वक चालवेला यशस्वी व्यवसाय एका क्षणात मातीमोल झाला. एकट्या सुनील कावुरींनी 21 लाख डॉलर (भारतीय रुपयात – सुमारे 17 कोटी रुपये) गमावले,
 
सुनील कावुरी म्हणतात की, “मी 24 तास कॉम्प्युटर स्क्रीन रिफ्रेश करत राहिलो. माझे पैसे परत मिळवण्यासाठी FTX सपोर्ट डेस्कला ईमेल करण्याचा प्रयत्न केला. मला आजारी पडल्यासारखं वाटलं. माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडले, अरे देवा... सगळं संपलं, मी माझं सर्वस्व गमावलं.”
 
घर खरेदीसाठी जमवलेले सर्व पैसे ‘गायब’
ईस्ट मिडलँड्समध्ये राहणारे सुनील कावुरी त्यांचं नवीन घर घेण्यासाठी पैसे वाचवत होते. कावुरींना त्यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी विद्यापीठाची फी सुद्धा भरायची होती. मात्र, आता त्यांच्या हातात केवळ पैशांच्या हिशेबाची कागदपत्रंच उरली आहेत.
 
FTX च्या दिवाळखोरीमुळे ब्रिटनमध्ये ज्या ज्या लोकांना सर्वाधिक फटका बसलाय, त्यातले सुनील कावुरी हे एक आहेत.
 
FTX कंपनी क्रिप्टोच्या जगात गुंतवणुकीचे सुरक्षित साधन असल्याचं सांगून ग्राहकांपर्यंत पोहोचोवलं गेलंय.
 
BBC च्या ‘पॅनोरमा’ या इन्व्हेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंट्री सीरिजने क्रिप्टोचे जग बदलण्यासाठी निघालेल्या, गणितातील प्रतिभावान समजल्या जाणाऱ्या सॅम बँकमन-फ्राइडचा थरारक उदय आणि नंतर खळबळजनक पडझडीचा आढावा घेतलाय.
 
FTX एक्सचेंजने एखाद्या अनियमित बँकेसारखं काम केलं, जिने लोकांना बिटकॉइनसारख्या क्रिप्टो नाण्यांविरूद्ध पैशांचा व्यापार करण्याची परवानगी दिली आणि त्यांचा निधी सुरक्षित ठेवला.
 
या कंपनीचे 100 देशांमध्ये 90 लाख ग्राहक होते. कंपनी दिवाळखोरीत निघाल्यानं 10 लाखांहून अधिक ग्राहकांचे पैसे वेळेवर काढता न आल्याने अडकले. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, अनेक कंपन्या, गुंतवणूकदार आणि अगदी धर्मादाय संस्थांनीही पैसे गमावले.
 
पुढील आठवड्यात अमेरिकेतील वकील या हाय-प्रोफाइल खटल्याच्या सुनावणीत युक्तिवाद करण्यास सुरुवात करतील. या प्रकरणात सॅम बँकमन-फ्राइडला आरोपी करण्यात आले आहे. त्याच्यावर फसवणूक, कट रचणे आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित सात आरोप आहेत.
 
बँकमन-फ्राइड यांनी FTX च्या दिवाळखोरीनंतर म्हटलं की, “मी निधी चोरलेला नाही, किंवा मी कुठेही अब्जावधी रुपये लपवलेले नाहीत.”
 
एफटीएक्स आणि अल्मेडा रिसर्च नावाची एक क्रिप्टो हेज फंडची स्थापना करणाऱ्या 31 वर्षीय सॅम बँकमन-फ्राईडने सर्व आरोप फेटाळले आहेत. बँकमन-फ्राईड हे त्यांच्यावरील आरोपांविरोधात लढण्यासाठी तुरुंगातू न्यूयॉर्कच्या न्यायालयात जातील.
 
बँकमन-फ्राईड यांच्या कंपनीतल्या इतर अधिकाऱ्यांनी मात्र आधीच गुन्हा कबूल केलाय. तसंच, हे कर्मचारी एकेकाळी 40 अब्ज डॉलर्सच्या किंमतीची कंपनी कशी कोसळली, याचे पुरावेही लवकरच देऊ शकतात.
 
FTX कंपनीच्या चढ-उताराचा कहाणी
बँकमन-फ्राइडने त्यांच्या हेज फंडमधील जोखमीची गुंतवणूक वाढवण्यासाठी निधी वापरून ग्राहकांची फसवणूक केल्याचा मुख्य आरोप आहे. आलिशान मालमत्ता आणि राजकीय देणग्यांवरही त्यांनी लाखो आणि करोडो रुपये खर्च केले.
 
कॉईन डेस्क नावाच्या संकेतस्थळानं जेव्हा एफटीएक्सच्या निधीवर एक इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट प्रसिद्ध केला, त्यानंतर एफटीएक्सला धक्क्यावर धक्के मिळत गेले आणि कंपनी अक्षरश: कोलमडायला सुरुवात झाली. या रिपोर्टमध्ये एफटीएक्स आणि अल्मेडा रिसर्चच्या धोकादायक गुंतवणुकीवर प्रकाश टाकण्यात आला आहे.
 
FTX एक्सचेंज दिवाळखोर होईपर्यंत घाबरलेल्या ग्राहकांनी त्यांचे अब्जावधी डॉलर्स काढून घेतले.
 
सॅम बँकमन-फ्राईड यांना बहामामधून अटक करण्यात आली. त्यापूर्वी बँकमन-फ्राईड यांनी बीबीसीसह इतर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, “आर्थिक प्रकरणांशी संबंधित चुकांसाठी मला खेद वाटतो. पण हे हेतुपुरस्सर किंवा गुन्हेगारी हेतूने केले गेले नाही.”
 
कंपनी दिवाळखोर होऊन आता एक वर्ष होत आहे आणि गुंतवणूकदार बँकमन-फ्राईडशी संबंधित न्यायालयीन लढाईवर लक्ष ठेवून आहेत. आपले पैसे परत मिळतील की नाही, याकडे गुंतवणूकदार डोळे लावून बसले आहेत.
 
“सॅम बँकमन-फ्राइड यांनी खरंच शेकडो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय,” असं सुनील कावुरी सांगतात.
 
सुनील कावुरी म्हणतात की, “तुर्कीमधल्या एका व्यक्तीनं सर्वकाही गमावल्यानंतर त्याच्या बँक खात्यात केवळ 600 डॉलर शिल्लक होते, तर कोरियामधील एका व्यक्तीला तर पॅनिक अटॅकमुळे रुग्णालयात दाखल करावं लागलं.”
 
सॅम बँकमन-फ्राईडच्या वाढीस प्रोत्साहन देणाऱ्यांना FTX मधील अनेक गुंतवणूकदार दोषी मानतात. सुनील कावुरीही या गुंतवणूकदारांशी सहमत होतात.
 
यामध्ये अशा सेलिब्रिटींचा समावेश आहे, ज्यांनी FTX ला विश्वासार्ह आणि सुरक्षित कंपनी म्हणून सादर केलं.
 
क्रिप्टोला लोकप्रिय करण्यासाठी ज्या ज्या सेलिब्रिटींनी प्रचार केला, अशा प्रसिद्ध व्यक्तींविरोधातही न्यायालयात खटले दाखल झालेत. त्यातील दोन खटले सुनील कावुरींचे आहेत.
 
अमेरिकन कॉमेडियन लॅरी डेव्हिड, अमेरिकन फुटबॉल स्टार टॉम ब्रॅडी आणि सुपरमॉडेल गिसेल बनचेन हे न्यायालयाबाहेरच हे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करतायेत. मात्र, ‘पॅनोरमा’ने पाठवलेल्या प्रश्नांना मात्र या सेलिब्रेटींनी उत्तरं दिली नाहीत.
 
भलेही सर्व ग्राहकांचे पैसे मिळवण्यासाठी वकील न्यायालयीन लढाई लढतायेत. मात्र, असं मानलं जातंय की, एफटीएक्समुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकट आणि गुंतागुंतीला सोडण्यासाठी अनेक वर्षे जाऊ शकतात.
 
अजूनही आशावादी...
गेल्या आठवड्यात बँकमन-फ्राइडच्या पालकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकमन-फ्राइडने बहामामध्ये त्याच्या पालकांना रोख रक्कम आणि आलिशान मालमत्ता दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
एफटीएक्समध्ये मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीनंतर त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे कावुरी सांगतात.
 
सुनील कावुरी म्हणतात की, “मी पाहिलंय की, अनेक समूहांनी एफटीएक्सला एकप्रकारे स्वीकार्हता आणि मान्यता दिली होती. म्हणूनच मला वाटलं की, ही कंपनी कायदेशीर एक्सचेंज कंपनी असेल.”
 
सुनील कावुरी त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी अथक प्रयत्न करतायेत. मात्र, आता त्यांच्या हातात वाट पाहण्याच्या पलिकडे फारसं काहीच नाहीय.
 
(या बातमीवर सॅम बँकमन-फ्राईड यांची बाजू समजून घेण्यासाठी ‘बीबीसी पॅनोरामा’ने बँकमन-फ्राइडच्या वकिलांशी संपर्क साधला. कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याने या प्रकरणावर भाष्य करू शकत नसल्याचे वकिलाने सांगितले.)