1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (11:14 IST)

काश्मीर कलम 370 : लष्कराच्या कारवाईत छळ होत असल्याचा काश्मिरींचा आरोप

समीर हाश्मी
काश्मीरचा सरकारने विशेष दर्जा काढून घेतल्यानंतर या भागात तैनात असलेल्या सुरक्षा दलांकडून अमानुष मारहाण आणि छळ केला जात असल्याचा आरोप होत आहे.
 
अनेक गावकऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की त्यांना काठी आणि केबलनं मारहाण केली गेली तसंच त्यांना विजेचे शॉकही देण्यात आले आहेत.
 
अनेक गावांतील गावकऱ्यांनी मला त्यांच्या जखमाही दाखवल्या. पण आम्ही अधिकाऱ्यांकडून याची खातरजमा करून घेऊ शकलो नाही.
 
भारतीय लष्कराने हे आरोप 'निराधार आणि पुराव्याशिवायचे' असल्याचं म्हटलंय.
 
अभूतपूर्व अशा निर्बंधांमुळे काश्मीर तीन आठवड्यांपेक्षा अधिक काळ उलटला तरी टाळेबंदीच्या अवस्थेत आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवल्यानंतर 5 ऑगस्टपासून अतिशय त्रोटक माहिती बाहेर येत आहे.
 
हजारोंच्या संख्येनं अतिरिक्त सुरक्षा दलं तैनात करण्यात करण्यात आली असून सुमारे 3000 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. त्यामध्ये राजकीय नेते, व्यापारी आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अनेकांना राज्याबाहेरील तुरुंगात हलवण्यात आलं आहे.
 
प्रशासनाचं म्हणणं आहे की खबरदारी म्हणून ही कारवाई करण्यात आली असून या भागातील कायदा सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी ही पावलं उचलली आहेत. भारतातील एकमेव मुस्लीबहुल असलेल्या जम्मू काश्मीरचे दोन भागांत विभाजन करून आता जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले आहेत.
 
भारतीय लष्कर गेल्या तीन दशकांपासून इथं फुटीरतावादी बंडखोरांचा मुकाबला करत आहे. कट्टरतावाद्यांना पाठिंबा देत या भागात हिंसाचार घडवून आणल्याबद्दल भारत पाकिस्तानला जबाबदार धरत आला आहे. तर पाकिस्तानला हा आरोप मान्य नाही.
 
भारतातील अनेकांनी कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचे स्वागत करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या 'धाडसी' निर्णयाबद्दल त्यांचं कौतुक केलं आहे. भारतातील मुख्य प्रवाहातील माध्यमांनीही या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे.
 
इशारा : खालील मजकूर कदाचित काही वाचकांना धक्कादायक वाटू शकतो
 
गेल्या काही वर्षांपासून भारतविरोधी कट्टरतावादाचं केंद्रस्थान झालेल्या दक्षिण काश्मीरमधील किमान अर्धा डझन गावांना मी भेटी दिल्या. या गावांमधून मला रात्रीच्या धाडीत मारहाण आणि छळाचे एकसारखे अनुभव अनेक लोकांकडून ऐकायला मिळाले.
 
डॉक्टर आणि आरोग्य अधिकारी कोणत्याही रुग्णाविषयी काहीही बोलण्यास इच्छुक नाहीत. पण गावकऱ्यांनी मला त्यांच्या जखमा दाखवल्या आणि या जखमा सुरक्षा दलांमुळे झाल्याचा त्यांचा आरोप होता.
एका गावात, तिथल्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की जेव्हा कलम 370 बाबतचा निर्णय झाला, त्यानंतर काही तासांतच लष्कराच्या जवानांनी गावातील घर ना घर पालथं घातलं.
 
दोन भावांनी आरोप केला की त्यांना झोपेतून उठवून गावाच्या बाहेर घेऊन गेले, जिथं गावातील इतर दहा-बारा गावकऱ्यांना जमा करण्यात आलं होतं. ज्यांना आम्ही भेटलो त्या इतरांप्रमाणे हे दोन भाऊही त्यांची ओळख उघड करण्यास घाबरत होते.
 
"त्यांनी आम्हाला मारहाण केली. आम्ही त्यांना विचारत होतो की, 'आम्ही काय केलं आहे? आम्ही जर खोटं बोलत असू तर गावकऱ्यांना विचारा की आम्ही काही चुकीचं केलं आहे का?' पण त्यांना काहीच ऐकून घ्यायचं नव्हतं, काहीही न बोलता ते मारहाण करत राहिले." या दोन भावांपैकी एकानं हे सांगितलं.
 
"त्यांनी माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला मारहाण केली. त्यांनी आम्हाला लाथेनं तुडवलं, काठ्यांनी मारलं, विजेचे शॉक दिले, केबलनं मारहाण केली. आमच्या पायांच्या मागच्या बाजूला मारले. जेव्हा आम्ही बेशुद्ध पडलो तेव्हा इलेक्ट्रिक शॉक देऊन शुद्धीवर आणलं. जेव्हा ते काठ्यांनी मारत होते तेव्हा आम्ही किंचाळत होतो तर त्यांनी आमच्या तोंडात चिखल कोंबला."
 
"आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निर्दोष आहोत. आम्ही विचारलं की तुम्ही हे का करताय? पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. आम्ही त्यांना म्हटलो की मला मारू नका. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला मारहाण करण्याऐवजी थेट गोळ्या घाला. मी देवाला याचना करत होतो की मला घेऊन जा कारण तो छळ असह्य होता."
 
आणखी एक तरूण गावकरी सांगत होता की सुरक्षा दलं त्याला वारंवार विचारत होती की दगडफेक करणाऱ्यांची नावं सांग. काश्मीर खोऱ्यात तरुण आणि कुमारवयीन मुलांकडून गेल्या दशकापासून होणाऱ्या दगडफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्याला हे विचारलं गेलं.
 
तो तरूण म्हणाला की त्यानं जवानांना सांगितलं की त्याला याबाबत काही माहिती नाही. त्यावर त्यांनी त्याचा चष्मा, कपडे आणि बुट काढायला सांगितले.
 
"जेव्हा मी माझे कपडे काढले त्यांनी जवळपास दोन तास मला रॉड आणि काठ्यांनी अमानुष मारहाण केली. जेव्हा मी बेशुद्ध होत होतो तेव्हा ते शॉक देऊन मला शुद्धीवर आणत."
 
"जर त्यांनी माझ्यासोबत पुन्हा असं केलं तर मी कोणत्याही थराला जाईल. मी बंदूक उचलेल. मी रोजरोज हे सहन करू शकत नाही," असं तो तरूण सांगतो.
 
तो तरूण पुढे सांगतो की त्याला सुरक्षा दलांनी बजावलं की गावातल्यांना सांग की जर यापुढे कोणी निदर्शनात उतरलं तर त्यांचे असेच परिणाम भोगावे लागतील.
 
ज्या सर्व गावांमध्ये आम्ही गावकऱ्यांशी बोललो, त्यांचं हेच म्हणणं होतं कोणतीही निदर्शनं होऊ नयेत म्हणून भीती दाखवण्यासाठी सुरक्षा दलांनी हे केलं.
 
बीबीसीला दिलेल्या निवेदनात भारतीय लष्कराने म्हटलंय की, "आरोप केल्याप्रमाणे एकाही नागरिकाला मारहाण केलेली नाही."
"याबाबत कोणतेही ठोस आरोप आमच्या निदर्शनास आणले गेलेले नाहीत. हे आरोप विरोधी शक्तींपासून प्रेरित झालेले असावेत," लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी म्हटलंय.
 
नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलली गेली असून "लष्कराच्या खबरदारीच्या उपाययोजनांमुळे कोणालाही दुखापत किंवा जीवितहानी झालेली नाही," असं त्यांनी सांगितलं.
 
आम्ही अनेक अशा गावांना भेटी दिल्या जिथं अनेक गावकरी फुटीरतावादी कट्टरतावाद्यांना सहानुभूती दाखवत होते आणि ते त्यांचा उल्लेख स्वातंत्र्यसैनिक म्हणून करत होते.
 
याच भागातील एका जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात एका आत्मघातकी हल्ल्यात भारताच्या 40 जवानांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते.
 
तसंच याच भागात विशेष लोकप्रिय असलेला काश्मिरी कट्टरतावादी बुऱ्हाण वाणी 2016 मध्ये मारला गेला होता. त्यानंतर अनेक तरुण आणि संतप्त काश्मिरी भारतविरोधी बंडखोरीकडे वळाले.
 
या भागात लष्कराचा एक तळ असून जवान नियमितपणे कट्टरतावाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना पकडण्यासाठी हा भाग पिंजून काढतात. पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की यात मधल्यामध्ये आम्ही भरडले जातो.
 
एका गावात मी एका विशीतल्या तरुणाला भेटलो. तो सांगत होता की लष्करानं त्याला धमकी दिली आहे की जर तो त्यांच्यासाठी खबरी नाही बनला तर त्याला अडकवू. त्यानं जेव्हा नकार दिला, तेव्हा त्याला इतक्या वाईट रितीने मारले की त्यानंतर तो दोन आठवडे पाठीवर झोपू शकला नाही. असा त्याचा आरोप आहे.
 
"हे असंच सुरू राहिलं तर मला घर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही. ते आम्हाला जनावरासारखं मारतात. ते आम्हाला माणूस समजतंच नाहीत."
 
दुसरा एक व्यक्ती ज्यानं मला त्याच्या जखमा दाखवल्या, तो सांगत होता की त्याला जमिनीवर पाडण्यात आलं आणि "15 ते 16 जवानांनी" त्याला "केबल, बंदूक, काठी आणि लोखंडी रॉड" यांनी अमानुष मारहाण केली. "मी अर्धवट बेशुद्ध झालो होतो. त्यांनी इतक्या जोरात माझी दाढी ओढली की मला वाटलं माझे दात उपटून बाहेर येतील."
 
त्याला नंतर एका मुलाने सांगितलं की एका जवानानं तुझी दाढी जाळायचाही प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या एका जवानाने रोखलं.
 
दुसऱ्या एका गावात मला एक तरूण भेटला. तो सांगत होता की त्याचा भाऊ दोन वर्षांपूर्वी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेत सामील झाला.
 
तो सांगतो की त्याला काही दिवसांपूर्वी लष्करी तळावर चौकशीसाठी बोलावलं गेलं. तिथं छळामुळे डावा पाय फ्रॅक्चर झाला असा या तरुणाचा दावा आहे.
 
"त्यांनी माझे हात आणि पाय बांधून मला उलटं लटकवलं. दोन तास ते मला अमानुषपणे मारत होते," असं तो सांगतो.
 
लष्करानं आरोप फेटाळले
पण लष्करानं कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
 
बीबीसीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, आम्ही "एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहोत जी मानवी हक्कांना समजते आणि त्यांचा आदरही करते." तसंच सर्व आरोपांची "तातडीने चौकशी केली जात आहे."
 
त्यांनी पुढं म्हटलंय की, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं गेल्या पाच वर्षांत उपस्थित केलेल्या 37 प्रकरणांपैकी 20 प्रकरणं निराधार निघाली, 15 प्रकरणांची चौकशी सुरू आहे तर केवळ तीन प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या पात्रतेची निघाली आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, असंही या निवेदनात म्हटलंय.
 
अर्थात या वर्षाच्या सुरुवातील दोन महत्त्वाच्या काश्मीरमधील मानवी हक्क संघटनांनी गेल्या तीस वर्षांतील मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या शेकडो केसेस संदर्भातील एक अहवाल प्रसिद्ध केला.
 
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार आयोगाने काश्मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाची व्यापक आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी होण्यासाठी एक चौकशी आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे. त्यांनी या भागातील सुरक्षा दलांकडून केल्या जाणाऱ्या कथित अत्याचारांबाबत 49 पानी अहवाल प्रसिद्ध केला आहे.
 
भारतानं हे आरोप आणि अहवाल फेटाळून लावला आहे.
 
काय घडतंय काश्मीरबाबत?
काश्मीर एक हिमालयातील प्रदेश असून भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश संपूर्ण काश्मीर आपलाच असल्याचा दावा करतात. काश्मीरचा काही भाग भारताच्या तर काही भाग पाकिस्तानच्या नियंत्रणात आहे. काश्मीरवरील ताब्यावरून दोन्ही देशांनी दोन युद्ध लढलं असून एक मर्यादीत संघर्षही दोन्ही देशांमध्ये घडला आहे.
भारताच्या नियंत्रणात असलेली बाजू - जम्मू आणि काश्मीर - मध्ये आत्तापर्यंत भारतीय राज्यघटनेच्या कलम 370 नुसार अंशतः स्वायत्तता अस्तित्वात होती.
5 ऑगस्ट 2019 रोजी दिल्लीतील सरकारने कलम 370 हटवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचं म्हणणं आहे की काश्मीरचा दर्जा भारतातील इतर भागासारखाच असला पाहिजे.
तेव्हापासून भारताच्या नियंत्रणात असलेल्या भागात संचारबंदीत असून काही ठिकाणी मोठी निदर्शनं झालीत ज्यांना हिंसक वळणही मिळालेलं आहे. पाकिस्तानानं यावर संतप्त प्रतिक्रिया देत आंतराष्ट्रीय समुदायाला हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलं आहे.