शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 10 डिसेंबर 2022 (07:39 IST)

मल्लिकार्जुन खर्गे – ‘ माझी आई, बहीण, भाऊ आणि काकांचा दंगलीत होरपळून मृत्यू’

हैदरबाद निजामाच्या राजवटीत असताना झालेल्या दंगलीत आई, बहीण, भाऊ आणि काकांचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया टुडेच्या कार्यक्रमात सांगितली. त्यावेळी उपस्थितांचेही डोळे पाणावले.   
 
 इंडिया टुडे वृत्तवाहिनीचे सल्लागार संपादक राजदीप सरदेसाई आणि संपादिका मौसमी सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्याशी 'अजेंडा आज तक 2022' या कार्यक्रमात संवाद साधला. त्यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंनी त्यांच्या वैयक्तिक संघर्षातल्या काही घटना सांगितल्या.
 
मल्लिकार्जुन खर्गेंना राजदीप सरदेसाईंनी त्यांच्या संघर्षाबद्दल विचारलं असता, खर्गेंनी सांगितलं की, "आमच्या हैदरबाद-कर्नाटकमध्ये एक मोठी घटना झाली होती. तुम्हाला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाली, मला स्वातंत्र्य मिळालं 17 सप्टेंबर 1948 रोजी. आम्ही स्वतंत्र झालो.
 
आमच्या हैदराबाद भागात गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी मिळून तिथं पोलीस कारवाई केली. तेव्हा जनरल जे एन चौधरी होती. त्यांना पाठवून पोलीस कारवाई केली. तुमच्यानंतर 13 महिन्यांनी स्वातंत्र्य मिळालं.”
 
‘आई, बहीण, भाऊ आणि काकांचा दंगलीत होरपळून मृत्यू’
खर्गे पुढे म्हणाले, “हैदराबाद निजामाच्या राजवटीतून मुक्त होण्यापूर्वी तिथं बऱ्याच दंगली झाल्या होत्या. त्यात माझं घर जळालं. त्यात माझ्या कुटुंबातील लोक जळले. माझी आई, माझी बहीण, माझा भाऊ, माझे काका असे सगळे त्यात जळून मृत्युमुखी पडले. त्यावेळी मी तिथं झाडाखाली खेळत होतो आणि वडील शेतात कामाला गेले होते. त्याचवेळी आग लागल्यानंतर आमचं घर आणि आजूबाजूच्या घरांसह गावांमध्येही शेकडो लोक जळून मृत्युमुखी पडले होते.
 
दंगली होत असल्यानं, वडिलांनी मला वाचवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक नातेवाईकाकडे गेले, तर कुणीही आम्हाला स्वीकार करायला तयार नव्हते. तुम्ही त्या गावातून आले आहात, जिथं आग लागलीय. मग खडकीला आमचे काका होते, जे महार रेजिमेंटमध्ये होते. आम्ही बिदर ट्रेनने निघालो, तर खडकीत चौकशी केली. तर कळलं की, काका इथून व्हीआरएस घेऊन निघून गेले आहेत. पण कुठे गेले होते, हे रजिस्टरमध्ये लिहिलं नव्हतं. मग आम्ही गुलबर्ग्यात गेलो. तिथंच मग लहानाचा मोठा झालो."
 
मल्लिकार्जुन खर्गेंचा राजकीय प्रवास
नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गेंनी खासदार शशी थरूर यांचा पराभव करून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. खर्गे हे गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय मानले जातात.
 
कर्नाटकातील गुलबर्गा हे त्यांचं होमग्राऊंड आहे. कन्नड, हिंदी, इंग्रजीसह मराठी भाषेवरही त्यांचं प्रभुत्त्व आहे.
 
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर, महाराष्ट्रातील भाषणं त्यांनी मराठी भाषेतून केली होती.
 
ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवाई यांच्या माहितीनुसार, मल्लिकार्जुन खर्गे यांचं गेल्या 7-8 वर्षांतील राजकारण हे दिल्लीतीलच आहे. ते सध्या कर्नाटकात फारसे सक्रिय नाहीत. खर्गे हे 2014 नंतर लोकसभेत काँग्रेसचे पक्ष नेते होते.
 
2019 मधील पराभवानंतर सध्या ते राज्यसभेत आहेत.
 
मल्लिकार्जुन खर्गे यांची राजकीय कारकिर्द 50 पेक्षाही जास्त वर्षांची राहिली आहे. ते पहिल्यांदा 1969 मध्ये गुलबर्गा शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बनले होते.
 
तेव्हापासून ते आजपर्यंत ते 8 वेळा आमदार तर 2 वेळा खासदार राहिले. आपल्या लांबलचक राजकीय प्रवासात त्यांना केवळ एकदाच 2019 साली पराभवाचा सामना करावा लागला होता.
Published By -Smita Joshi