गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (21:41 IST)

नीरज गुंडे: नवाब मलिकांनी ज्यांच्यावर आरोप केले ते गुंडे कोण आहेत?

मयांक भागवत
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकीय चिखलफेकीत सोमवारी नीरज गुंडे हे नवीन नावं चर्चेत आलंय.
 
"नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस काळातील 'वाझे' आहेत," असा मोठा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलाय.
 
देवेंद्र फडणवीस यांनी नीरज गुंडेंशी संबंध असल्याचं मान्य केलंय. तर, नवाब मलिक यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया देण्यास नीरज गुंडे यांनी नकार दिलाय.
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले ,"मी कोण काय बोललं हे ऐकलेलं नाही. त्यामुळे या विषयावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही."
 
मात्र नीरज गुंडे आहेत तरी कोण? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
 
'नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस काळातील वाझे'
देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना नवाब यांनी नीरज गुंडे याचं नाव घेतलं.
 
नीरज गुंडे देवेंद्र फडणवीस काळातील वाझे असा उल्लेख त्यांनी केला.
 
ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नीरज गुंडे यांच्यामार्फत पैसे उकळले जायचे. हा देवेंद्र फडणवीस यांचा वाझे सगळीकडे फिरत होता."
 
काय म्हणाले नीरज गुंडे?
नवाब मलिक यांच्या आरोपांवर बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने नीरज गुंडे यांना संपर्क केला. नीरज गुंडे यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
 
ते म्हणाले, "कोणी काय आरोप केले आहेत हे मी ऐकलेलं नाही. मी सर्वांचं ऐकून प्रतिक्रिया देईन. त्याआधी कोणतीही प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही."
 
कोण आहेत नीरज गुंडे?
नीरज गुंडे पूर्व मुंबईच्या चेंबूर परिसरात रहातात. 48 वर्षांचे नीरज गुंडे इंजीनिअर आहेत.
नीरज गुंडे यांना जवळून ओळखणारे नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, "नीरज गुंडे भाजपचे खूप जुने कार्यकर्ते आहेत."
 
नीरज गुंडे यांचं कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याची माहिती त्यांचे निकटवर्तीय देतात.
 
"भ्रष्टाचाराबद्दल कायम ते तपास यंत्रणांकडे तक्रार करत असतात. भ्रष्ट लोकांचा पर्दाफाश करण्याचं काम ते सातत्याने करत असतात," असं ते पुढे सांगतात.
 
नीरज गुंडे यांनी मुंबईतील एका प्रसिद्ध वकिलासोबतही काम केल्याची माहिती आहे.
 
नीरज गुंडे यांच्या ट्विटर टाइमलाइनवर नजर टाकल्यास त्यांनी अनेकांची तक्रार केंद्रीय तपास यंत्रणांकडे केल्याचं दिसून येतंय. त्यांनी अनेक ट्विटमध्ये PMO India आणि देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शाह यांना टॅग केल्याचं दिसून येतंय.
 
नीरज गुंडे एका ट्टीटमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'Dear' असा केला आहे.
देवेंद्र फडणवीसांना नीरज गुंडे यांच्याबद्दल विचारलं असता ते म्हणाले, "नीरज गुंडे यांना मी ओळखतो. त्यांच्याशी संबंध मी नाकारणार नाही."
 
तर नवाब मलिक यांच्या आरोपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिल्याचं गुंडे म्हणाले.
 
नीरज गुंडे यांनी एक रविवारी नवाब मलिक यांच्याशी संबंधित फरहाज नवाब मलिक यांच्याबाबतची एक तक्रार CBI च्या संचालकांना मेल करून केली होती. या मेलचा ट्वीट त्यांना केला आहे.
 
नीरज गुंडे यांचे वरिष्ठ IPS आणि IAS अधिकाऱ्यांशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा नेहमी मंत्रालयात ऐकू येते. पण यावर कोणीही बोलण्यास तयार नाही.
 
नीरज गुंडे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संबंध?
नीरज गुंडेंना मी ओळखतो असं सांगतानाच, फडणवीसांनी त्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संबंध असल्याचं म्हटलं.
 
"माझ्यापेक्षा जास्त वेळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नीरज गुंडे यांच्या घरी गेले आहेत. मला वाटतं, या दोघांचे पूर्वीपासूनचे संबंध आहेत," असं ते म्हणाले.
पेशाने खासगी व्यवसायिक असलेले नीरज गुंडे मीडिया आणि प्रसारमाध्यमांपासून लांब रहाणं पसंत करतात. त्यामुळे त्यांना राजकारणातील पडद्यामागचा प्लेयर असं मानलं जातं.
 
नीरज गुंडे यांची मातोश्रीवर ये-जा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमी होते. भाजप-शिवसेनेत मध्यस्थ म्हणूनही त्यांचं नाव नेहमी घेतलं जातं.
 
उद्धव ठाकरेंशी संबंधाबाबत नवाब मलिक यांना विचारलं असता ते म्हणाले, "देवेंद्र फडणवीसांचा दूत म्हणून नीरज गुंडे उद्धव ठाकरेंना भेटायचे."
 
मात्र नीरज गुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही.
IPL प्रकरणी नाव आलं होतं चर्चेत
साल 2015 मध्ये नीरज गुंडे पहिल्यांदा IPL प्रकरणी चर्चेत आले होते. गुंडे BCCI चे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या अत्यंत जवळचे मानले जायचे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार तत्कालीन BCCI सचिव अनुराग ठाकूर आणि किरण गिल्होत्रा यांचा एक फोटो नीरज गुंडे यांनी ICCला दिल्याचा आरोप होता. किरण गिल्होत्रा क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचाराविरोधी विभागाच्या वॅाचलिस्टवर असल्याची चर्चा होती.
 
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना "मी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्यासोबत काही गोष्टींवर काम केल्याचं ते म्हणाले होते.
 
मिड-डे वृत्तपत्राच्या माहितीनुसार "अनुराग ठाकूर यांनी गुंडे यांनी एन. श्रीनिवासन यांच्या सांगण्यावरून, आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हे फोटो लिक केल्याचा आरोप केला होता."
 
मात्र आम्ही त्यांना याबाबत विचारल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही.