रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (22:59 IST)

Penny Challenge : 'अॅलेक्सा'ने दिला लहान मुलीला 'हा' धोकादायक सल्ला, अमेझॉननं मागितली माफी

व्हर्चुअल असिस्टिंट या संकल्पनेतून जन्माला आलेल्या अॅलेक्सा या उपकरणाच्या एका गंभीर चुकीमुळे अॅमेझॉन या ई-कॉमर्स कंपनीला तोंडघशी पडावं लागलं आहे.
अॅलेक्साच्या या चुकीमुळे अॅमेझॉनला त्याच्यामधील एक यंत्रणा अपडेट करावी लागणार आहे. शिवाय, याप्रकरणी अॅमेझॉनने लोकांची माफीही मागितली आहे.
झालं असं की अॅमेझॉनच्या अॅलेक्सा इको असिस्टंटने एका 10 वर्षांच्या मुलीला एक आगळावेगळा आणि धोकादायक असा सल्ला दिला होता.
अॅलेक्साने त्या लहान मुलीला आपल्या फोनचा चार्जर एखाद्या चालू इलेक्ट्रिक बोर्डमध्ये अर्धवट स्वरुपात घालण्यास सांगितलं.
त्यानंतर हातात एक नाणं पकडून त्या बाहेर राहिलेल्या चार्जरच्या प्लग पिनला स्पर्श कर, असंही अॅलेक्साने म्हटलं.
 
तत्पूर्वी, 10 वर्षांच्या मुलीने अॅलेक्साकडे एखादं 'चॅलेंज' देण्याची मागणी केली होती. त्यानंतर अॅलेक्साने अशा प्रकारचं धोकादायक आव्हान त्या मुलीला दिलं होतं.
हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर संबंधित मुलीच्या आईने सोशल मीडियावर यासंदर्भात आपली तक्रार मांडली.
त्यानंतर सोशल मीडियावर अॅमेझॉन आणि त्यांच्या व्हर्चुअल असिस्टंट तंत्रज्ञानावर जोरदार टीका होऊ लागली.
मुलीची आई क्रिस्टिन लिव्हडॉल यांनी याबाबत ट्विटरवर लिहिलं आहे, "अरे देवा, माझ्या मुलीने अॅलेक्साला एक चॅलेंज देण्यास सांगितलं. तर पहा अॅलेक्साने काय करायला लावलं."
यानंतर क्रिस्टिन यांनी अॅलेक्सा अॅपचा एक स्क्रिनशॉटही शेअर केला. त्यामध्ये अॅक्टिव्हिटी सेक्शनमध्ये मला एखादं चॅलेंज दे, असं लिहिलेलं आढळून येतं.
 
"मला वेबसाईटवर हे दिसून आलं. ourcommunitynow.com मधील माहितीनुसार, हे चॅलेंज सामान्य स्वरुपाचं आहे. आपल्या फोनचा चार्जर एखाद्या चालू इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये अर्धवट टाकून ठेवायचा. नंतर हातात एक नाणं पकडून त्याने बाहेर दिसत असलेल्या प्लग पिनला स्पर्श करायचा."
 
त्यानंतर त्यांनी पुढे म्हटलं, "आम्ही शारिरिक शिक्षणासंदर्भात एका शिक्षकाने दिलेली काही व्यायामाचे चॅलेंज करत होतो. बाहेरचं वातावरण जरा खराब असंच होतं. दरम्यान, माझ्या मुलीने या चॅलेंजची मागणी केली."
त्यानंतर अॅलेक्साने कोण्या एका वेबसाईटवरचं हे चॅलेंज काढून क्रिस्टिन यांना दिलं.
पण त्यातला आशय ऐकताच क्रिस्टिन भयभित झाल्या. त्या उत्तरल्या, "नाही, अॅलेक्सा. नाही."
 
वर्षभरापूर्वी व्हायरल झालेलं चॅलेंज
नाण्याने चालू चार्जरच्या पिनला स्पर्श करण्याचं हे धोकादायक चॅलेंज नवं नाही. एका वर्षापूर्वी 'द पेनी चॅलेंज' नावाने ते सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं.
त्यानंतर या चॅलेंजमुळे अनेक ठिकाणी अनुचित प्रकार घडल्याच्या बातम्या आणि फोटो समोर आले होते.
नाणं हे साधारणपणे धातूचं असतं. यातून वीजप्रवाह वाहू शकतो. ते हातात धरून चालू इलेक्ट्रिक बोर्डमध्ये लावलेल्या चार्जरच्या पिनशी त्याचा स्पर्श केल्याने जोराजा झटका बसण्याची शक्यता असते. तसंच यामुळे शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याचीही भीती आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये पूर्ण हात भाजल्याचा, बोटं तुटण्याचा धोका आहे. अमेरिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनीही या धोकादायक चॅलेंजचा कठोर निषेध केला होता.
 
अॅमेझॉनने मागितली माफी
हा प्रकार समोर आल्यानंतर अॅमेझॉनने आपल्या अॅलेक्सा या व्हॉईस असिस्टिंटकडून झालेल्या चुकीबद्दल माफी मागितली आहे.
ते म्हणाले, "हे अत्यंत धोकादायक ठरू शकतं. अमेरिकेच्या क्रिस्टिन लिव्हडॉल यांनी आम्हाला याबाबत सांगितलं. त्यांच्या मुलीने गेल्या शुक्रवारी अॅलेक्साला असंच एक चॅलेंज मागितलं होतं. त्याच्या उत्तरादाखल अॅलेक्साने हे चॅलेंज करण्याचा सल्ला तिला दिला."
बीबीसीला पाठवलेल्या आपल्या प्रतिक्रियेत अॅमेझॉनने म्हटलं, "भविष्यात अॅलेक्साकडून असा प्रकार होऊ नये, यासाठी त्याच्यातील यंत्रणा अपडेट करण्यात आली आहे. आमच्यासाठी आमच्या ग्राहकांचा विश्वास सर्वात महत्त्वाचा आहे."