शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शनिवार, 12 जून 2021 (21:32 IST)

राम खांडेकर: यशवंतरावांपासून नरसिंह रावांपर्यंत सत्ताकेंद्राचा साक्षीदार

इतिहास अनेक डोळ्यांनी पाहिला जातो. ते डोळे वेगवेगळ्या स्थानांवरुन, वेगवेगळ्या कालरेषेवरुन, कधीकधी वेगवेगळे चष्मे परिधान करुन इतिहास घडताना पाहत असतात.
 
तो घडत असताना कोणत्याही अभिनिवेशाशिवाय ते ऐतिहासिक घटनेच्या वा व्यक्तीच्या किती जवळ असतात, यावर सांगितलेल्या इतिहासाची विश्वासार्हता, व्याप्ती, खोली, उपयुक्तता अवलंबून असते. राम खांडेकरांचे डोळे असे साक्षीदार होते, इतिहासाच्या रंगमंचासमोर पहिल्या रांगेतून तो घडताना पाहणारे.
 
बुधवारी 9 जूनला नागपूरात राम खांडेकरांचं वयाच्या 87व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या कारकीर्दीची अखेर होऊन जवळपास दोन दशकं उलटली होती. दिल्लीचं वास्तव्य 2006 मध्येच संपलं होतं.
 
'सत्तेच्या पडछाये'पासून दूर निवृत्त आयुष्यात जाऊन मोठा कालावधी झाला होता. राम खांडेकरांसारखा सत्ताकेंद्राच्या अगदी शेजारी जवळपास पाच दशकं उभं राहून महाराष्ट्राला आणि देशाला कलाटणी देणा-या घटना पाहणारा व्यक्ती अत्यंत विरळा असेल.
 
अगोदर यशवंतराव चव्हाण आणि त्यानंतर नरसिंह राव यांचे निजी म्हणजे खाजगी सचिव म्हणून त्यांची मोठी कारकीर्द घडली. यशवंतराव द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री असल्यापासून, ते केंद्रात संरक्षण-गृह-अर्थ-परराष्ट्र ही सगळी पदं सांभाळत असतांना त्यांच्या अखेरापर्यंत खांडेकर त्यांच्यासोबत होते. त्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव हे केंद्रात कॅबिनेट मंत्री असल्यापासून ते पंतप्रधान असेपर्यंत आणि नंतर एका प्रकारच्या विजनवासात त्यांची अखेर होईपर्यंत सोबत होते.
राजकीय नेत्यांना आणि मंत्रिपदाची जबाबदारी असणा-या नेत्यांना अनेक प्रकारचे सहाय्यक आणि सचिव असतात. त्यांच्या ज्येष्ठता वेगवेगळ्या असतात आणि सेवाही.
 
मंत्र्यांचे स्वीय सचिव हे प्रशासकीय सेवेतून आलेले असतात. पण सोबतच काही निजी वा खाजगी सचिव हे थेट मंत्र्यानं निवडलेले असतात. ते IAS नसतात. सरकारी, पक्षीय आणि खाजगी पातळीवरचे संबंध, पत्रव्यवहार, कामं अशी कामं निजी सचिव पाहतात, म्हणूनच ते अत्यंत विश्वासातले, जवळचे ठरतात.
 
साहाजिक आहे की एखादा सचिव त्या नेत्यासोबत दीर्घकाळ राहिला तर हे संबंध वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर घनिष्ठ बनत जातात. मुळाशी विश्वास असतो.
 
नेता जेवढा मोठा, तेवढा त्याच्या सार्वजनिक कार्याचा पसारा मोठा आणि परिणामी तो पसारा सांभाळणा-या खाजगी सचिवावरचा विश्वास अधिक. गुप्त, गोपनीय, वाच्यता न करण्यासारख्या गोष्टीही त्याच्यासमोर होत असतात. असा विश्वास संपादन करुन राम खांडेकर काही दशकं यशवंतराव चव्हाण आणि पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासोबत राहिले.
 
राम खांडेकरांच्या पाच दशकांच्या काळाचा पटही किती असंख्य घटनांनी भरलेला आहे. ते मूळचे नागपूरचे आणि स्वातंत्र्यांनंतर द्वैभाषिक राज्य स्थापन झाल्यावर स्टेनोग्राफर म्हणून मुंबईतल्या एका सरकारी विभागात आले.
 
पण लवकरच त्यांना मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या कार्यालयातनं बोलावणं आलं आणि यशवंतरावांशी ते शेवटपर्यंत जोडले गेले.
 
द्वैभाषिकाची बांधणी, संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन, महाराष्ट्र राज्याची स्थापना, त्यानंतर यशवंतरावांचं दिल्लीला जाणं, भारत- चीन युद्ध, भारत पाकिस्तान युद्ध, नेहरुंचं जाणं, यशवंतरावांची देशाचं नेतृत्व करण्याची संधी हुकणं, कॉंग्रेसमधली दुफळी, आणीबाणी या अशा सगळ्या टप्प्यांमध्ये राम खांडेकर त्यांच्या बाजूला उभं राहून हा सगळा इतिहास पाहत होते.
 
मोहन धारिया, वसंत साठे या मंत्र्यांसोबत त्यांनी काही काळ काम केलंच, पण परत त्यांची कारकीर्द खरी बहरली ती पी. व्ही. नरसिंह रावांकडे गेल्यावर.
 
इंदिरा गांधींचं जाणं, राजीव गांधींचा उदय, त्यांच्या नंतर अचानक नरसिंह रावांचं कॉंग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधान होणं, आर्थिक उदारीकरण, बाबरी प्रकरण, हर्षद मेहता प्रकरण, रावांवरचे भ्रष्टाचाराचे आरोप आणि खटले, कॉंग्रेसचं पतन असा प्रचंड आणि निर्णायक पट हा खांडेकरांच्या डोळ्यासमोर उलगडत होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात निर्णायक काळ त्यांनी पंतप्रधान कार्यालयातून पाहिला.
त्यामुळे या काळाबद्दल आणि त्या काळाचे नायक ठरलेल्या या दोन नेत्यांचं राजकीय आयुष्य राम खांडेकरांकडून समजणं हा एक दस्तऐवज ठरतं. कारण त्यांना जे पहायला मिळालं, ते थोडक्यांना पहायला मिळालं.
 
पण खांडेकरांनी त्यांच्या सेवेच्या काळात आणि नंतरही अनेक वर्षं व्यावसायिक पथ्य मोडायचं नाही, म्हणून काहीही लिहिलं नाही.
 
पण नंतर त्यांनी काही दिवाळी अंकांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये लेख लिहिले. त्यातला महत्वाचा दस्तऐवज म्हणजे 'लोकसत्ता'मध्ये वर्षंभर त्यांनी लिहिलेलं एक सदर. 'राजहंस प्रकाशन'नं 2019 मध्ये 'सत्तेच्या पडछायेत' या नावानं या सदरातल्या लेखांचं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्यात या मोठ्या कालखंडाचा धावता आढावा खांडेकर घेतात.
त्यातून यशवंतराव आणि नरसिंह राव यांच्या राजकारणासोबत वैयक्तिक आयुष्यातल्या अनेक माहित नसलेल्या गोष्टी पुढे येतात. माणूस म्हणून हे नेते कसे होते ते समजतं.
 
खांडेकरांनी 43 वर्षं दिल्लीत वास्तव्य केलं. दिल्लीच्या सत्तावर्तुळातले डावपेच, माणसांचं मोठं-खुजं होणं, बाबूशाहीच्या पायऱ्या, पदोपदीचं आमिषं आणि त्यातही कधीकधी झिरपणारी माणुसकी असं सगळं या लिखाणातून येत जातं.
 
1991 पर्यंत पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेनं मनाई करण्यापर्यंत सायकलनं कार्यालयात जाणाऱ्या, कायम तटस्थ राहणाऱ्या, प्रामाणिकतेविषयी शंका घेतल्यास स्वाभिमानानं राजीनामाही देणाऱ्या, ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्यातला साधुपणा शोधणाऱ्या राम खांडेकरांचं व्यक्तिमत्वही समोर येत जातं. त्यांचे हे अनुभव म्हणजे एक कोष बनला आहे.
 
यशवंतरावांचं पोर्ट्रेट
राम खांडेकर मोठा काळ यशवंतरावांसोबत होते. त्यांच्या लिखाणातून यशवंतरावांचं एक पोर्ट्रेट तयार होत जातं. काही नवे तपशील समोर येत जातात.
 
खांडेकरांनी स्वतंत्र राज्य महाराष्ट्राची बातमी यशवतंरावांना कशी समजली ते लिहिलं आहे. दिल्लीतून नाही, तर जयंतराव टिळकांकडून त्यांना संसदेत ठराव पास झाल्याचं समजलं होतं.
 
खांडेकर लिहितात : 'एप्रिल 1960 मध्ये लोकसभेत स्वतंत्र राज्याचं बिल पास झालं. ते होणार याची खात्री होती, पण केव्हा याची कल्पना नव्हती.
 
ही बातमी केसरीच्या प्रतिनिधीनं विधानसभेचे सदस्य असलेल्या 'केसरी'चे संपादक जयंतराव टिळक यांना तारेनं कळवली. विधानसभेचे सत्र सुरु होते आणि जयवंतराव सभागृहात होते.
 
तार वाचून त्यांनी ती यशवंतरावांना दिली. ती वाचल्यानंतर थोड्या वेळासाठी बाहेर येऊन सरकारी चाकोरीतून खात्री करुन घेतल्यानंतर विधानसभेत त्यांनी ही आनंदाची बातमी दिली.'
 
यशवंतनीतीमुळे संयुक्त महाराष्ट्र मिळाला असं म्हणतांना खांडेकर पुढे हेही नोंदवतात की जसा गुजरातसोबतचा सीमेचा कोणताही प्रश्न त्यांनी प्रलंबित ठेवला नाही, तसाच यशवतंराव अजून काही काळ महाराष्ट्रात असते तर बेळगांवचा सीमाप्रश्नही सुटला असता.
 
नेहरुंनी संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला बोलावल्यानंतर यशवंतरावांना पहिल्या दिवसापासून तिथल्या राजकारणाचा कसा त्रास झाला याच्या आतल्या गोष्टी राम खांडेकर सांगतात.
नेहरुंच्या जवळचे असणारे बिजू पटनाईक यांचा संरक्षणमंत्रीपदावर डोळा होता हे सर्वश्रुत होतं.
 
यशवंतरावांनी अजून मंत्रिपदाची शपथही घेतली नव्हती तेव्हा पहिल्या दिवशी रात्रीच पटनाईक त्यांना भेटायला आल्याचं सांगून खांडेकर लिहितात: 'यशवंतरावांना दिल्लीच्या राजकारणातील आतल्या गाठीच्या राजकारणी पुरुषाचा पहिला धक्कादायक कटू अनुभव त्यांच्या भेटीतून आला. पटनाईकांनी अर्धा पाऊण तास केवळ संरक्षण खाते, चिनी आक्रमण याबाबत यशवंतरावांच्या मनात भीती उत्पन्न होईल अशी माहिती वरकरणी गंभीरतेचा आव आणून तिखट-मीठ लावून सांगितली.
 
पटनाईक शेवटी म्हणाले,"तुम्ही दिल्लीला इतक्या लांबवर कशाला आलात?" या प्रश्नानं यशवंतराव अक्षरश: चक्रावून गेले. पटनाईक इथेच थांबले असते तर बरे झाले असते. पण ते मुरलेले दिल्लीकर होते.
 
ते पुढे म्हणाले,"चीनचे सैन्य झपाटून पुढे सरकत आहे अन् कदाचित मुंबईला धोका होऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही मुंबईत असले पाहिजे." यशवंतराव मुंबईचे नाव ऐकताच आल्या वाटेनं परत जातील अशी त्यांना खात्री झाली असावी. म्हणूनच त्यांनी यशवंतरावांना रात्रीच गाठले होते.'
 
यशवंतराव आणि वेणुताई
राम खांडेकरांचं चव्हाण दाम्पत्याशी कामासोबतच कौंटुंबिक सख्य तयार झालं. त्यांच्या कुटुंबाचाच एक ते भाग बनून गेले. त्यामुळे यशवंतराव आणि वेणुताई या दोघांचं पोर्ट्रेटही त्यांच्या नोंदींतून दिसत जातं.
सत्तेच्या पडछायेत' या 'राजहंस'नं प्रकाशित केलेल्या पुस्तकात ते लिहितात: '1963 च्या फेब्रुवारीमध्ये यशवंतराव 1 रेसकोर्स रोड, या नवीन बंगल्यात राहण्यास गेले. यशवंतरावांचे खरे कौटुंबिक जीवन सुरु झाले ते इथे.
 
या वास्तूने यशवंतरावांचे राजकीय, सांसारिक, साहित्यिक जीवन पाहिले. सुखे पाहिली, दु:खाच्या छटाही पाहिल्या, उतार-चढाव पाहिले,आनंदाश्रू पाहिले, तसेच यशवंतरावांच्या डोळ्यातून सतत वाहणाऱ्या गंगा-जमुना पाहण्याचे दुर्भाग्यसुद्धा अनुभवले,' असं लिहून चव्हाण यांच्यासाठी संक्रांत हा सण सर्वात महत्वाचा का होता याची एक हळुवार नोंद खांडेकर करतात.
 
1942 मध्ये लग्न झाल्यावर यशवंतरावांची पहिली संक्रांत होती, तेव्हा ते भूमिगत होते आणि वेणुताई तुरुंगात होत्या. त्यांना तिथे खूप त्रास सहन करावा लागला. आपल्यामुळे वेणुताईंवर हा प्रसंग आला ही सल यशवंतरावांच्या मनात कायम होती, त्यामुळे संक्रांत हा नंतर त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचा सण बनला.
 
'संक्रांतीच्या दिवशी वेणुताई सकाळी पाच-साडेपाचला उठत. सुगडांची पूजा करत. यशवंतरावही त्या दिवशी लवकर आंघोळ करुन तिथे बसत. पूजेत सहभाही होत.
 
पूजा झाली की बंगल्यातल्या सगळ्या सवाष्णींना, अगदी झाडूवाल्याच्या पत्नीलासुद्धा बोलावून एक-एक सुगडं देत. सोबत हलवा आणि तिळगुळही देत. आश्चर्य वाटेल, त्या त्यांच्या पायाही पडत. वेणुताईंमध्ये किती सोज्वळता होती, हे दिसून येईल. नंतर तिळगुळासोबत एक सुगडं माझ्याकडे आणि दुसरं सहकारी जोशी यांच्याकडे पाठवत. ऑफिसशिवाय यशवंतराव त्या दिवशी दुसरं काम ठेवत नव्हते,' खांडेकर लिहितात.
 
सत्तेबाहेरचे यशवंतराव
निवडणुकांच्या राजकारणात आल्यापासून यशवंतरावर कायम सत्तेच्या जबाबदारीत राहिले. त्यांचं व्यक्तिमत्व व्यासंगी होतं, त्यामुळे सत्तेबाहेरचेही विरंगुळे होते. पण कायम सत्तेतल्या महत्वाच्या जबाबदा-या खांद्यावर घेतलेला हा माणून सत्तेशिवाय कसा असेल? याचं उत्तर खांडेकरांकडून मिळतं.
 
आणीबाणीनंतर 1977 मध्ये निवडणुका झाल्या आणि कॉंग्रेसचा पूर्ण पराभव झाला. त्यावेळचा एक जगावेगळा अनुभव राम खांडेकर लिहितात, 'ज्या दिवशी इंदिराजींचं सरकार जाऊन मोरारजींचं सरकार आलं, त्या दिवशी यशवंतराव मुक्त झाल्याचा आनंद लुटत होते.
 
मला म्हणाले,"गाडी काढायला सांगा. सूरजकुंडला जाऊ. सूरजकुंड हरियाणामध्ये दिल्लीपासून दूर 20 किलोमीटर पर्यटनस्थळ आहे. सुदैवानं ड्रायव्हर जुना असल्यानं त्याला माहीत होते. गाडीतून उतरल्यावर यशवंतरावांचा उत्साह पाहून हार्ट फेल होते की काय असे वाटू लागले. हातात स्टिक होती.
 
यशवंतराव जवळपास अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ तलावाच्या बाजूच्या पायऱ्या उतरत होते, चढत होते. असे करता करता तलावाला पूर्ण चक्कर मारली, पण मी मात्र खरोखर थकलो होतो. होय, यशवंतरावांचा हा उत्साह पाहण्याचे भाग्य केवळ आणि केवळ मलाच मिळाले!
 
65 वर्षांच्या यशवंतरावांचा उत्साह, वागणे 25 वर्षांच्या तरुणाला लाजवेल असे होते. अंधार पडू लागला म्हणून आम्ही परत फिरलो. मोटारीत हास्यवदनानं यशवंतराव शांत बसले होते. सत्ता गेल्यावर आनंद मानणारे यशवंतराव सत्तेसाठी भुकेले होते असे म्हणणे कितपत योग्य होईल?"
पण त्याच यशवंतरावांचे नंतर इंदिरा गांधी परत निवडून आल्यानंतरच्या काळात राजकारणातून बाजूला फेकले गेल्यासारखे दिवसही राम खांडेकर यांनी जवळून पाहिले.
 
त्यानंतर मृत्यूपर्यंतचा यशवंतरावांचा कालावधी क्लेशदायी ठरला असं नोंदवून खांडेकर लिहितात: "दिल्लीच्या संविधानानुसार सत्ता नसलेल्यांच्या नशिबी एकांतवास असतो. अधिकारवाणीनं केव्हाही भेटावयास येणाऱ्यांनी यशवंतरावांकडे पाठ फिरवली. यशवंतराव सकाळी थोडेसे उशीराच उठून वर्तमानपत्रं वाचून वगैरे झाली की साडेदहाच्या सुमारास तीन-चार पुस्तके घेऊन दिवाणखान्यात येऊन वाचत बसत व कोणी येते का याची प्रतीक्षा करत.
एक वाजता जेवण करुन थोडीशी झोप घेत. पाच नंतर पुन्हा दिवाणखाना किंवा वेणुताईंच्या आग्रहाखातर त्यांच्याबरोबर बाजारहाट करण्यास जात. अर्थात, ते गाडीतच बसून राहत. महाराष्ट्रातले खासदारही फारसे डोकावत नसत. महाराष्ट्रातले लोक मात्र अधूनमधून येऊन भेटत होते. अधूनमधून चर्चेसाठी इंदिराजींनी बोलावले तर किंवा यशवंतरावांना वाटले तर ते इंदिराजींकडे जात असत.'
 
'बृहस्पती' नरसिंह राव
यशवंतराव चव्हाणांनंतर काही काळ मोहन धारिया आणि वसंत साठे या महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांसोबत काम करुन राम खांडेकर पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे आले. तेव्हा राव हे केंद्रीय मंत्रिमंडळात होते. त्यावेळेस स्थिर सुरु असणारी नरसिंह रावांची कारकीर्द राजीव गांधींनंतर एकदम वादळी झाली. खांडेकर पंतप्रधानांचेही निजी सचिव म्हणून सोबत राहिले आणि पुढे सत्तेतून पायउतार झाल्यावरही.
 
रावांच्या या काळातल्या कारकीर्दीविषयी त्यांनी लिहिलं आहेच, पण त्यासोबतच राजकारणाव्यतिरिक्त राव यांचं व्यक्तिमत्व खांडेकर जवळून पाहू शकले आणि त्यांनी ते रूपही विस्तारानं लिहिलं आहे. त्यात अनेक अनुभव असे आहेत की आपल्यालाही चक्रावून सोडतात. पण ते खांडेकरांनी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, ते स्वत: साक्षीदार आहेत.
 
नरसिंह राव हे राजकारणापेक्षा भाषा आणि साहित्यामध्ये अधिक रमायचे. त्यांचा अभ्यास आणि व्यासंगही गाढा होता. संगीताचाही अभ्यास दांडगा होता. त्यांच्या विविध भाषांच्या प्रभुत्वाविषयी राम खांडेकर एक अफलातून किस्सा सांगतात: "नरसिंह रावांना 14 भाषा येत होत्या. त्यात दक्षिणेतील सर्व आणि चार परकीय भाषांचा समावेश होता. पंतप्रधान असतांना ते एकदा विदेश दौऱ्यावर होते.
तेथील पंतप्रधानांसोबत त्यांची 'वन टू वन' म्हण्जे फक्त दोघांचीच बोलणी होती. त्यांचा दुभाषी आला होता, पण काही कारणाने तो बैठकस्थळी पोहचू शकला नाही. दुभाष्याची खुर्ची रिकामी पाहून दुसऱ्या देशाचे पंतप्रधान थांबले होते. ते पाहून नरसिंह राव म्हणाले, "एक्सलंसी, प्लिज कॅरी ऑन. आय डोंट नीड इंटरप्रिटर. आय कॅन फॉलो अँण्ड स्पीक युवर लँग्वेज व्हेरी वेल." खरोखर नरसिंह रावांनी कधी इंग्रजीत तर कधी त्यांच्या भाषेत बोलणी केली होती.
 
दुभाषी उशीरा पोहोचल्याने त्याला बाहेरच थांबावे लागले. त्याला जेव्हा कळले की नरसिंह रावांना ती भाषा चांगलीच अवगत होती आणि चर्चासुद्धा व्यवस्थित पार पडली, तेव्हा तो म्हणाला,"माझ्या पोटावर पाय आणू नका."
 
नरसिंह रावांना मराठी भाषाही उत्तर येत असे. त्यांचा मतदारसंघही नागपूरजवळचा रामटेक असल्यानं ती भाषा बोलली जायची. खांडेकर आणि रावसुद्धा गरज पडेल तेव्हा मराठी बोलायचे. कुसुमाग्रजांना 1987 साली नरसिंह राव हे 'ज्ञानपीठ पुरस्कार समिती'चे अध्यक्ष असतांना 'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाला हे खांडेकर आवर्जून नमूद करतात.
 
जेव्हा नरसिंह रावांना राम खांडेकरांचे मोजे वापरावे लागले...
नरसिंह राव हे अत्यंत अभ्यासू आणि विद्वान नेते होते. पण त्यांची राहणी केवढी साधी होती हे सांगतांना राम खांडेकर अजून एक धक्का देणाराच किस्सा सांगतात : 'पंतप्रधान असतांना राव एका बैठकीनिमित्त तीन दिवसांच्या इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले होते. एक दिवस सकाळी 10 वाजता राणीसोबत त्यांची भेट ठरली होती.
 
नऊ वाजता ते तयार होऊन बैठकीच्या खोलीत येऊन बसले. नेहमीच्या माझ्या पद्धतीप्रमाणे ते बाहेर आल्यानंतर मी त्यांची बेडरुम-बाथरुम डोळ्याखालून घातली. सर्व निरीक्षण करुन बाहेर आलो, तर माझे वरिष्ठ सहकारी रामू दामोदरनसुद्धा तिथे आले होते. त्यांनी मला एका बाजूला नेऊन हळूच सांगितले की, साहेबांचे मोजे 'सूट'ला जुळत नाहीत.
 
राणीकडे जायचे आहे, म्हणून बदलण्यास सांगा. ते फोरिन सर्व्हिसचे असल्यामुळे पोशाखाबाबत त्यांच्या कटाक्ष असे व इंग्लंडची संस्कृती त्यांना माहीत होती. नरसिंह रावांजवळ जाऊन मी त्यांना 'मोजे सूटला जुळत नाहीत आणि राणीला भेटावयास जायचे आहे तरी ते बदलून याल का?' असे विचारले. त्यावेळी पंतप्रधानांच्या तोंडून निघालेले शब्द ऐकून तर मी पुतळ्यासारखा स्तब्ध झालो, घामही फुटला. काहीच सुचेना.
 
त्यांचे उत्तर होते, "माझ्याकडे दुसरे मोजे नाहीत. हेच आहेत." रामू दामोदरनकडे गेलो. पाच मिनिटे काहीच बोललो नाही. हे पाहून ते म्हणाले, अरे क्या हुआ? पंतप्रधानांचे उद्गार ऐकून त्यांनासुद्धा हसावे की रडावे हेच समजत नव्हते. मी माझ्याजवळचे नवीन मोजे त्यांना दिले. सुदैवाने ते मोजे सूटला जुळत होते." हा किस्सा सांगून खांडेकर लिहितात की त्यापुढे ऑफिसमध्ये आणि सगळ्या दौऱ्यांवर बूट सोडून सगळ्या कपड्यांच्या एक सेट ते रावांसाठी सोबत ठेवत असत.
 
नरसिंह रावांनी आपल्या मुलीला सुनावले
नरसिंह राव पंतप्रधान झाल्यावर एवढे दिवस त्यांच्यापासून लांब राहणारी त्यांची मुलं आणि मुली कसे जवळजवळ करु लागले, दिल्लीला येऊन घरी राहू लागले, त्याचा प्रशासन आणि इतरांना मनस्ताप होऊ लागला हे रावांच्या अत्यंत जवळ असणाऱ्या खांडेकरांनी नोंदवून ठेवलं आहे.
 
पण एकदा रावांच्या एका मुलीनं खांडेकरांवर नसती शंका घेतल्यानंतर राव कसे खांडेकरांच्या मागे उभे राहिले याचाही एक प्रसंग ते लिहितात.
 
नरसिंह रावांच्या आणि खांडेकरांच्याही व्यक्तिमत्वाचा एक पैलू त्यानं समोर येतो. रावांना मिळालेल्या भेटवस्तू निवासस्थानी ज्या कपाटात ठेवल्या जात त्यातल्या वस्तू खांडेकर घेऊन जातात असं एका पीएनं राव यांच्या एका मुलीला सांगितलं.
 
तिनं त्या कपाटाला कुलूप लावून ठेवलं. हे खांडेकरांना समजलं तेव्हा त्यांच्या स्वाभिमानाला ठेच लागली आणि ते तडक राजीनामा देऊन घरी आले. राव यांना हे समजताच त्यांनी खांडेकरांना बोलावलं.
खांडेकर पुढे लिहितात: "मी म्हणालो, माझ्या निष्ठेबद्दल, इमानदारीबद्दल जिथे शंका घेतली जाते, अविश्वासानं पाहिलं जातं, तिथं नोकरी करणं मला शक्य नाही. हा अपमान माझ्या सहनशीलतेच्या पलिकडचा आहे. त्यावर ते म्हणाले,"मी नाही का अनेक आरोप सहन करत आलो?" मी त्यांना सांगितलं,"त्यात आणि यात फरक आहे. मीसुद्धा अनेक आरोप सहन केलेत हे आपण जाणताच. इथे तुमची मुलगी संशय घेते आहे."
 
यानंतर जवळपास दहा-पंधरा मिनिटे त्या मुलीचा नरसिंह रावांनी असा समाचार घेतला की तिला देवच आठवले. डोळ्यातून गंगा-जमुना वाहायला लागल्या, त्या आटेनाच." हा प्रसंग लिहून खांडेकर विचारतात, "आपल्या विश्वासू कर्मचाऱ्याचा मान राखण्यासाठी पोटच्या मुलीचीही पर्वा न करणारे मंत्री आढळतील का?"
 
नरसिंह रावांकडे वकिलांना द्यायलाही शेवटी पैसे नव्हते
यशवंतराव आणि नरसिंह राव या दोघांनाही राम खांडेकरांनी त्यांनी पाहिलेली देवमाणसं असं म्हटलं आहे. या दोन्ही देवमाणसांचा क्लेशदायी शेवटही त्यांनी स्वत: पाहिला.
 
नरसिंह रावांच्या शेवटाविषयीही ते दु:खी मनानं लिहितात: "थोडक्यात सांगयचे झाले तर भारतीय दर्शने, संस्कृती, भाषा, रचनात्मक साहित्य व न्यायशास्त्राचा अभ्यास असणारे, तसेच सतत देशाच्या सर्वांगीण विकासाचा, तळागाळातील जनतेचा, पक्षाचा विचार करणारे, लक्ष्मीचे नाही तर सरस्वतीचे पूजन करणारे नरसिंह राव मनाने खचले होते.
 
त्यांना सर्व क्षेत्रांतील दुर्दशा बघवत नव्हती. आणखी एका गोष्टीचे शल्य त्यांना बोचत होते. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दोन-तीन दिवस अगोदर हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे ते पोर्चमध्ये उन्हात बसलेले असतांना त्यांनी मला बोलावले व विनोदाने म्हणाले, "खाजगी सचिवांनी पैशाची व्यवस्था करण्याची पद्धत दिल्लीत प्रचलित आहे, नाहीतर तुम्ही?" पण नंतर त्यांनी अंत:करणातील यातना बोलून दाखवली, "ज्यावेळी लोक मला पैसे आणून द्यायचे, तेव्हा मी घेतले नाहीत व आज मला सहा वर्षं चाललेल्या केसेससाठी वकीलच काय त्यांच्या सहका-यांना एक पैसाही देता येत नाही.
 
आज काय माझी अवस्था?" खरोखरच वकीलांच्या उपकाराच्या ओझ्याखालीच, त्यांना पैसे न देता आल्यामुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला होता हे संपूर्ण सत्य होते. पंतप्रधानपदी असतांना त्यांनी एक इंच जमीन घेतली नाही की दहा बाय दहाची खोली बांधली नाही. बँक शिल्लकही बेताची. आश्चर्य म्हणजे, ज्या उद्योगपतींना त्यांनी सुगीचे दिवस आणून दिले, जगात मान मिळवून दिला, त्यापैकी एकानेही नरसिंह रावांकडे ढुंकूनही पहिले नाही, ही शोकांतिका होती."
 
राम खांडेकरांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलं आहे की प्रसारमाध्यमांच्या वाट्याला जाणार नाही असं एका प्रकारचं वचन त्यांनी त्यांच्या पत्नीला दिलं होतं, म्हणून त्यांनी हे लेखही पत्नी निवर्तल्यानंतर ब-याच काळान लिहिले आहेत.
 
पण ते वाचतांना जाणवत राहतं की एवढा मोठा काळ पहिल्या रांगेतल्या आसनावरुन इतिहास घडतांना पाहणा-या खांडेकरांची वृत्ती ही केवळ मूक साक्षीदाराची नव्हती तर ती एका चिंतकाचीही होती. ते भावनाप्रधानही होते. हा इतिहास एका वेगळ्या कोनातून ते आपल्याला दाखवतात. त्यांनी केलेल्या या नोंदी कायमचा ऐवज ठरला आहे.