गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2020 (21:45 IST)

रामदेव बाबा यांचा औषध शोधल्याचा दावा नियमांचा भंग, आयुष मंत्रालयाकडून नोटीस

-संकेत सबनीस
कोरोनाचे थैमान रोखण्यासाठी रामदेव बाबा यांनी कोरोनिल, श्वासारी ही आयुर्वेदीक औषधं शोधून काढल्याचं मंगळवारी (23 जून) पत्रकार परिषेदत जाहीर केलं. या दोन्ही गोळ्या असून यामुळे कोरोनाचे रुग्ण सात दिवसांत बरे होतील, असा दावा रामदेव बाबा यांनी यावेळी केला.
 
रामदेव बाबा आणि त्यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी एक आठवड्यांपूर्वी आम्ही कोरोनावर औषध शोधून काढलं असल्याचा दावा केला होता. लवकरच या औषधांच्या क्लिनिकल ट्रायलसह आम्ही जनतेपुढे येऊ असं त्यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. त्यांनी मोठी पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली.
 
दरम्यान, रामदेव बाबांनी कोरोनावर औषधं शोधल्याचा हा दावा केल्यानंतर आयुष मंत्रालयानं त्याची गंभीररित्या नोंद घेतली आहे.
 
या औषधांबद्दल आपल्यापर्यंत कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचं आयुष मंत्रालयाने म्हटलं आहे. अशाप्रकारची औषधं शोधल्याचा दावा करण्याची जाहिरात करणं हे ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज (आक्षेपार्ह जाहीरात) 1954 या कायद्याचा भंग आहे. तसंच, कोव्हिड-19 उद्रेकानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नियमांचाही यातून भंग करण्यात आला आहे.
 
औषधांच्या निर्मितीचा दावा करणाऱ्या कंपनीला याबद्दल सूचित करण्यात आल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलंय. तसंच, संबंधित औषधांचं संशोधन कार्य तपासण्याबद्दल कंपनीला नोटीसही बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीकडून या औषधांची संपूर्ण माहिती, त्याबद्दलचं संशोधन, किती रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यात आली त्याची संपूर्ण माहिती, CTRI ने याची काय नोंद केली आणि कोणत्या रुग्णालयात हे उपचार करण्यात आले यासंबंधीची सगळी माहिती आयुष मंत्रायाने मागविली आहे.
 
उत्तराखंडमध्ये या कंपनीची नोंद झाली असल्याने त्यांनी कोव्हिड-19 वर आयुर्वेदीक औषध शोधण्यासाठी त्यांना कोणता परवाना दिला आहे, त्याची प्रतही मंत्रालयाने मागवून घेतली आहे.
 
आयुष मंत्रालयाच्या या भूमिकेवर पतंजलीजी बाजू मांडणारं ट्वीट आचार्य बालकृष्ण यांनी केलं आहे. 'हे सरकार आयुर्वेदाला प्रोत्साहन देणारं आहे. जो काही कम्युनिकेशन गॅप होता, तो दूर झाला आहे. कंट्रोल क्लिनिकल ट्रायलचे जे काही निष्कर्ष आहेत, ते 100 टक्के पूर्ण केले आहेत. त्यासंबंधीची सर्व माहिती आम्ही आयुष मंत्रालयाला दिली आहे,' असं ट्वीट आचार्य बालकृष्ण यांनी केलं आहे.
 
'कोरोनिल आणि श्वासारी ही कोरोनावरची औषधं'
रामदेव बाबा आणि पतंजली उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण या दोघांनी कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा दावा माध्यमांमध्ये केला आहे. या दाव्यांनंतर अनेकांच्या मनात औषध मिळाल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 
माध्यमांसमोर बोलताना रामदेव बाबा म्हणतात, "कोरोनावर आम्ही औषधं शोधून काढली असून ही औषधं 100 टक्के यशस्वी झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आम्ही यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे गिलॉय म्हणजेच गुळवेल, श्वासारी, अश्वगंधा यांचा मुख्य समावेश असलेली औषधं आणणार आहोत. या घटकांसह कोरोनिल आणि श्वासारी या औषधांची निर्मिती पतंजली आयुर्वेदकडून केली आहे. यासाठी आमच्या क्लिनिकल कंट्रोल ट्रायलमध्ये 100 रुग्ण सहभागी झाले होते. या ट्रायलसाठी क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI)कडून आम्ही परवानगी मिळवली होती. या ट्रायलमधले 69 टक्के रुग्ण पहिल्या तीन दिवसांत आणि 100 टक्के रुग्ण सात दिवसांत बरे झाले."
 
रामदेव बाबा पुढे सांगतात, "यावर अनेक लोक आमच्यावर प्रश्न उपस्थित करतील आणि आमच्याबद्दल ईर्ष्या व्यक्त करतील. तसंच, लंगोट आणि धोतर नेसणाऱ्यांनी हे कसं काय शक्य केलं हा प्रश्न सगळ्यांना पडेल. मात्र, आम्ही हे प्रत्यक्षात आणलेलं आहे. गिलॉय म्हणजेच गुळवेल, अश्वगंधा, श्वासारी यांचा मुख्य समावेश आमच्या औषधात आहे. यामुळेच हजारो रुग्ण बरे झाले. कोरोनिल आणि श्वासारी औषधांचं किट लवकरच बाजारात येईल."
 
रामदेव बाबांचा पूर्वीचा दावा काय?
रामदेव बाबा यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितल की, "आमच्या मुख्य औषधांमध्ये श्वासारी असून कोरोनाला रोखण्यासाठी तसंच त्यांतली गुंतागुंत सोडवण्यासाठी हे वापरत आहोत. या औषधात गिलॉय (मराठीत गुळवेल) धनवटी, तुलसी धनवटी आणि अश्वगंधा कॅप्सूल यांचा समावेश आहे. गिलॉय धनवटी आणि अश्वगंधामध्ये कोरोनाशी लढण्याची 100 टक्के क्षमता आहे. सर्दी, ताप तसंच इतर ज्या काही अडचणी निर्माण होतात त्यावर आम्ही नियंत्रण मिळवलं आहे. तसंच रूग्ण बरे होण्याचं प्रमाणही जबरदस्त आहे. मृत्यूदरही शून्य आहे".
 
ते पुढे सांगतात की, "आपलं औषध करोना झाल्यानंतर त्याला संपवण्यासाठी आहे. आतापर्यंत आम्ही चार औषधं आणली आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर बरे होण्यासाठी औषध म्हणून याचा वापर केला जाऊ शकतो."
 
आचार्य बालकृष्ण यांचा पूर्वीचा दावा काय?
 
आचार्य बालकृष्ण हे बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी काही दिवसांपूर्वी बोलताना सांगितलं की, "कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्या - झाल्या पतंजलीने वैज्ञानिकांच्या एका टीमसोबत करार केला. तसंच, पतंजलीच्या प्रत्येक विभागात फक्त आणि फक्त कोरोनावर उपचार करणाऱ्या औषधावर काम करण्याचे आदेश देण्यात आले. हे औषध तयार करण्याआधी विषाणूशी लढू शकणाऱ्या आयुर्वैदीक औषधींचा अभ्यास केला गेला. तसं, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच निदान कसं झालं आणि त्यांच्यावर उपचार कसे झाले याचाही अभ्यास केला गेला."
 
बालकृष्ण पुढे सांगतात, "आयुर्वेदात कोरोनावर 100 टक्के उपाय आहे. आम्ही ज्या क्लिनिकल ट्रायल केल्या त्यात आम्हाला यशही मिळालं आहे. आता आम्ही क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करत आहोत. आतापर्यंत तरी याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांत आम्ही यांची सगळी माहिती आणि आमचं संशोधन जगापुढे सादर करू."
 
'आयुर्वेदिक औषध अजून तरी नाही'
भारतात आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी दिल्लीतल्या आयुष मंत्रालयाकडून मिळणारा परवाना आवश्यक असतो. हा परवाना मिळाला असेल तरंच आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करता येते. आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांच्या आद्याक्षरांपासून आयुष हे नाव आलंय.
 
हा परवाना मिळवून एखाद्या संसर्गजन्य रोगावर नव्याने आयुर्वेदीक औषध तयार करायचं असेल तर ते तयार करून ते वापरात आणण्यामागे देखील एक प्रक्रिया आहे. याबद्दल आम्ही अधिक माहिती घेण्यासाठी मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून आयुर्वेदीक डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. राजीव कानिटकर यांच्याशी चर्चा केली.
 
गुळवेल आणि अश्वगंधाने कोरोना बरा होतो?
डॉ. कानिटकर सांगतात, "मुळात आपल्याकडे एखादं आयुर्वेदीक औषध कोणी नव्यानं बनवलं असेल तर ते त्याच्या मेथेडोलॉजीसह एफडीएला म्हणजेच फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनला सादर करावं लागतं. ते या औषधाला मंजुरी देतात. कोरोनावर अशी मंजुरी मिळालेलं असं कोणतंही आयुर्वेदीक औषध अजून तरी पुढे आलेलं नाही. तसंच, गुळवेल आणि अश्वगंधाच्या मिश्रणाने कोरोना बरा होतो हे मान्य करायलाच माझा विरोध आहे. कारण, गुळवेल आणि अश्वगंधा यांनी माणसाची इम्युनिटी वाढू शकते. मात्र, त्याने कोरोना बरा होतो हे सांगायला पुरावे आणि शास्त्रीय अभ्यास सादर करावा लागेल. आयुर्वेदात गुळवेल किंवा गुडूची हे आम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी रुग्णांना देतो. त्याने कोरोना हा विषाणू मरतो हे सांगणं अवघड आहे."
 
'औषध शोधल्याचा दावा सिद्ध करावा लागतो'
डॉ. कानिटकर अधिक माहिती देताना पुढे सांगतात, "त्यांनी जर औषध निर्माण केल्याचा दावा केलाय तर त्यांनी किती रुग्णांवर उपचार केले? त्या रुग्णांमध्ये कोणती लक्षणं होती? प्रायोगिक उपचार करताना प्लासिबोसारख्या प्रयोगपद्धतीचा वापर केला का? यांसारख्या असंख्य तांत्रिक प्रश्नांची उत्तरं त्यांना द्यावी लागतील. तसंच, कोरोनाची लक्षणं निरनिराळी असल्याची बाब आता समोर आली आहे. माझ्या ओळखीचे एक गृहस्थ कोरोनामुळे गेले. त्यांना जुलाब आणि ताप ही लक्षणं होती. त्यामुळे थेट औषध काढल्याच दाव कोण करत असेल तर त्यांनी आधी शास्त्रीय अभ्यास सादर करावा."
 
आयुर्वेदातल्या औषधांच्या निर्मितीबद्दल आणि त्यांच्या केल्या जाणाऱ्या प्रयोगांबद्दल आम्ही मुंबईतल्या डॉ. देवीप्रसाद राव यांच्याकडूनही माहिती घेतली. डॉ. राव गेली 20 वर्ष मुंबईत आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
 
डॉ. राव याबद्दल सांगतात, "आयुर्वेदीक औषध शोधल्याचा दावा कोणीही केला तरी तो प्रथम सिद्ध करावा लागतो. यासाठी शोध लावलेल्या औषधाच्या रुग्णांवर कंट्रोल ट्रायल घ्याव्या लागतात. म्हणजेच, थेट 100 ते 200 रुग्णांवर त्या औषधाचा प्रयोग करून त्याचे निकाल अभ्यासावे लागतात. ज्या रुग्णांवर प्रयोग करण्यात आले आहेत ते पूर्णतः बरे झाल्यास अशा औषधं मान्यता पावतात. अजून तरी असं आयुर्वेदीक औषध आल्याचं मी ऐकलेलं नाही."
 
ते पुढे सांगतात, "अश्वगंधासारख्या औषधांनी एखाद्याची इम्युनिटी नक्की वाढेल. हे 100 टक्के खरं आहे. त्यामुळे इम्युनिटी वाढवणारी औषधं तयार केली आहेत असं जर कोण म्हणत असेल तर ते योग्य आहे. मात्र, हेच कोरोनावरचं आयुर्वेदीक औषध आहे असं कोण म्हणत असेल तर ते चुकीचं आहे."
 
एफडीएकडून मंजुरी मिळाली?
या दोन्ही तज्ज्ञांच्या मतांवरून दोन प्रमुख गोष्टी लक्षात येतात त्या म्हणजे गुळवले, अश्वगंधा ही इम्युनिटी वाढवणारी आयुर्वेदिक औषधं आहेत हे मान्य केलं आहे. मात्र, त्यांच्या मिश्रणातून कोरोना विषाणूला मारक ठरणारं औषध मिळेल याबद्दल ते साशंक आहेत. तसंच, जे कोणतंही औषध आहे त्याचा शास्त्रीय अभ्यास पुराव्यांनिशी सादर केल्याशिवाय त्या औषधाला मान्यता मिळत नाही.
 
रामदेव बाबांनी आज दावा केलेल्या कोरोनिल आणि श्वासारी या औषधांना एफडीए म्हणजेच फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनकडून परवानगी मिळाली आहे की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे. याबद्दल रामदेव बाबांनीही पत्रकार परिषदेत ठोस माहिती दिलेली नाही.