सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 31 मे 2024 (21:33 IST)

पहाटेपासून रांगा, तरीही दोन पाकिटं बियाणं; नको असलेले वाण घ्यायला लावत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

खरीप हंगाम ऐन तोंडावर असताना अकोला जिल्ह्यात बियाणांचा तुडवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना अगदी पहाटेपासून कृषी केंद्रावर रांगेत उभं राहावं लागत आहे. पण तेवढं करूनही शेतकऱ्यांना दोन पाकिटापेक्षा जास्त बियाणे मिळत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा राग समोर येत आहे.
 
शेतकरी सध्या शेतीच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहे, तर काही भागांत मान्सूनपूर्व लागवड होत असल्याने काही बियाण्यांची मागणी वाढली आहे.
 
पण पुरेशी बियाणं मिळत नसल्यामुळं मान्सूनपूर्व लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पेरणीसाठी बियाणे आवश्यक असल्यानं शेतकऱ्यांनी अकोल्यातील विविध कृषी केंद्रावर खरेदीसाठी रांगा लावल्या.
 
विशेषतः कापसाच्या अजित 155 बियाणांसाठी अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र अकोला जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
कृषी केंद्राकडून बियाणांची फक्त दोनच पाकिटं दिली जात आहेत. त्यामुळंही शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.कृषी विभागाचे अधिकारी मात्र विशिष्ट बियाणे संपली असली तरी शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेली इतर बियाणे खरेदी करावी असं म्हणत आहेत.
 
व्यापारी अधिकाऱ्यांचं साटंलोटं-शेतकऱ्यांचा आरोप
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात बियाणांसाठी रांगेत उभ्या असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये गोंधळ आणि हाणामारी झाल्याचं दिसून आलं होतं. या रांगेत उभं राहणाऱ्यांमध्ये महिला शेतकरीही होत्या.
 
पण सकाळपासून दुपारच्या उन्हात रांगेत उभ राहूनही बियाणे मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. अकोला शहरातही कृषी केंद्रावर अशा प्रकारच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळालं.
 
त्यात बुधवारी (29 मे) अकोल्यातील कृषी केंद्रं बंद होती. त्यामुळं सकाळपासून रांगेत उभं राहिलेल्या शेतकऱ्यांच्या हिरमोड झाला. परिणामी त्यांनी चक्का जाम करुन रोष व्यक्त केला.
 
"ऐन हंगामात अजित 155 बियाणांचा तुटवडा निर्माण होणं, शेतकऱ्यांसाठी अडचणीचं ठरत आहे. कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळं आणि व्यापाऱ्यांचं साटंलोटं असल्यामुळं मुद्दाम तुटवडा निर्माण केला जात आहे," असा आरोप शेतकरी प्रमोद पागरुद यांनी केला आहे.
 
ही कृत्रिम टंचाई असल्याचा आरोप पागरुद यांनी केला. व्यापाऱ्यांनी गोदामांत बियाणांचा साठा केला आहे. कृषी विभाग सव्वा लाख पाकिटं आली म्हणतं, तर माल शेतकऱ्यांना देण्यास काय हरकत आहे, असा सवालही त्यांनी केला.
 
इतर कंपन्यांची बियाणे घेण्याची सक्ती
"आम्ही फक्त बियाणांची दोन पाकिटं घेण्यासाठी पहाटेपासून रांगेत उभे आहोत का? सरासरी एकराला एक बॅग बियाणे लागते. पण, ज्यांच्याकडं पाच एकर शेती असेल त्यांनी काय करावं? हा मोठा प्रश्न आहे. भरारी पथकाकडून साठेबाजांवर कारवाई अपेक्षित आहे," असंही पागरुद म्हणाले.
 
बोंड अळीच्या प्रादूर्भावाचा विचार करून शेतकऱ्यांनी 1 जून पूर्वी पेरणी करू नये, असं कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे. पण अकोला जिल्ह्यात खडकाळ आणि काळी माती असणाऱ्या भागात हंगामपूर्व पेरणी केली जाते. अशा जमिनीत कमी पाऊस असला तरी पीक तग धरतं.
 
त्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे मिळायला पाहिजे, असं शेतकरी मनोज तायडे म्हणाले.
 
“शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीचे अजित 655, अजित 155 बियाणे मिळत नाही. पण व्यापाऱ्यांकडून हे मुद्दाम केलं जात आहे. ही परिस्थिती नवीन नाही. गेल्या चार-पाच वर्षात शेतकऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांना अजित 155 पाहिजे असेल तर सोबत दुसऱ्या कंपनीचे वाण घेण्याचीही सक्ती केली जाते” असं तायडे म्हणाले.
 
सोयाबीनचे भाव पडल्याने कापसाकडे ओढा
अकोला जिल्ह्यात विविध कंपन्यांची 1 लाख 52 हजार पाकिटं उपलब्ध असल्याचं कृषी सहसंचालक के. एस. मुळे यांनी सांगितलं.
 
“शेतकऱ्यांचा जोर हा अजित 155 या बियाणांवर आहे. पण या वाणाची बियाणं संपली आहेत. जेवढा साठा उपलब्ध होता तो शेतकऱ्यांना वाटप करण्यात आला आहे, असं त्यांनी सांगितलं.
 
शेतकऱ्यांनी आता उपलब्ध असलेल्या इतर बियाणांची खरेदी करावी. आम्ही 1 जून पुर्वी पेरण्या करू नये,अशा सूचना वारंवार करत आहोत. सिंचनाची व्यवस्था असलेल्यांनी पेरणी करण्यास हरकत नाही. पण, कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केल्यास बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळं पावसाचा अंदाज घेऊन पेरण्या कराव्यात,” असंही मुळे म्हणाले.
 
गेल्या हंगामात सोयाबीनचे भाव पडल्यामुळं यंदा शेतकऱ्यांचा कापसाच्या पेरणीकडे जोर आहे. त्यामुळं कृषी केंद्रावर गर्दी दिसून येत आहे.
 
बियाणे आणि खतांच्या किमती वाढल्या आहेत. पण शेतमालाला भाव मिळत नाही. आधीच नैसर्गिक संकट, अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यात अशा प्रकारच्या कृत्रिम संकटांमुळं शेतकरी आणखी अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत.
 
Published By- Priya Dixit