मंगळवार, 7 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

ग्रेटा थुनबर्ग वि. डोनाल्ड ट्रंप: टाईम पर्सन ऑफ द इयर 2019 पुरस्कारानंतर असा झाला वाद

The controversy came after the Time Person of the Year 2019 award
"How Dare You? तुमची हिंमत कशी होते?"
 
संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलावरील परिषदेत जागतिक नेत्यांवर रागाच्या भरात अशी टीका करणारी ग्रेटा थुनबर्ग सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे.
 
हवामान बदलासाठी जागतिक आंदोलन करणारी स्वीडनची ही 16 वर्षांची कार्यकर्ती ठरलीये 'टाईम पर्सन ऑफ द इयर 2019'. दोन दिवसांपूर्वीच ग्रेटाला हा मान जाहीर करण्यात आला.
 
मात्र त्यानंतर जागतिक नेत्यांकडून प्रतिक्रिया येणार नाही तर नवलच.
 
ग्रेटाला या मानाची घोषणा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एक ट्वीट केलं, "किती हास्यास्पद आहे हे! ग्रेटाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ती मित्रांसोबत जाऊन एखादा जुना सिनेमा का पाहत नाही! जरा थंड घे! चिल ग्रेटा, चिल!"
 
यानंतर डोनाल्ड ट्रंप यांचे हेच शब्द ग्रेटाने आपल्या ट्विटर बायोमध्ये वापरले. "रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करणारी किशोरवयीन मुलगी, सध्या मजा करतेय आणि एका मित्रासोबत छान जुना सिनेमा पाहतेय."
 
'ट्विटर बायो' म्हणजे ट्विटर अकाऊंटवर स्वतःबद्दलची माहिती.
 
ट्रंप विरुद्ध ग्रेटा - दुसऱ्यांदा
पण ग्रेटाने यापूर्वीही असं केलं होतं. याआधी तिने स्वतःला ट्विटरवर 'Pirralha' म्हणवलं होतं. या पोर्तुगीज शब्दाचा अर्थ आहे वाया गेलेलं वा बिघडलेलं मूल.
ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी ग्रेटाला 'पिर्राल्हा' म्हटलं होतं. आणि त्याचं उत्तर देण्यासाठी ग्रेटाने असं केलं होतं.
 
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ऑक्टोबरमध्ये ग्रेटाला, 'दयाळू पण अपुरी माहिती असलेली लहान मुलगी' (a kind but poorly informed teenager) म्हटलं होतं. तेव्हाही हेच शब्द आपल्या ट्विटर बायोमध्ये वापरले होते.
 
तिने संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये केलेल्या भाषणाचा व्हिडिओ ट्वीट करत ट्रंप यांनी उपहासाने लिहिलं होतं, "एक अतिशय आनंदी मुलगी जी उज्ज्वल आणि चांगल्या भविष्याची वाट पाहतेय."
 
त्यानंतर काही काळासाठी ग्रेटाने हेच शब्द आपल्या ट्विटरवरच्या माहितीत लिहिले होते.
सगळ्यात कमी वयाची 'पर्सन ऑफ द इयर'
टाईम मासिकाचा 'पर्सन ऑफ द इयर' पुरस्कार मिळणारी ग्रेटा आजवरची सगळ्यांत कमी वयाची व्यक्ती ठरली आहे.
 
ग्लोबल वॉर्मिंगच्या मुद्द्यावर बोलताना ग्रेटाने जगभरातल्या नेत्यांचं आणि लोकांचं लक्ष वेधून घेतलंय.
 
माद्रिद शहरात सुरू असणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या 25व्या हवामान बदल परिषदेतही ती सहभागी झाली होती. या परिषदेत बोलताना ग्रेटाने जगभरातल्या नेत्यांनी 'मोठमोठ्या गोष्टी बोलणं बंद करून प्रत्यक्ष कारवाई करून दाखवावी,' असं म्हटलं होतं.
 
ग्रेटाला कोणता आजार आहे?
ग्रेटा थुनबर्गला 'अॅस्पर्जर्स सिंड्रोम' आहे. हा ऑटिझमचा (आत्ममग्नता) एक प्रकार असून, यामुळे लोकांच्या बोलण्याच्या वा इतरांशी संवाद साधण्यावर परिणाम होतो.
 
हा आजार असलेली व्यक्ती अनेकदा सामान्य पद्धतीने बोलू शकत नाही.