शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 ऑक्टोबर 2023 (19:28 IST)

दोन भाऊ रात्री दागिने चोरून पुरून ठेवायचे आणि नंतर आई ते बँकेत ठेवून यायची

gold chor
तामिळनाडूच्या मदुराईमध्ये चोरांच्या एका टोळीने मागील तीन वर्षांपासून धुमाकूळ घातला होता.
 
मदुराई उपनगर पोलिसांकडे यासंदर्भात अनेक तक्रारीही दाखल करण्यात आलेल्या होत्या.
 
मदुराई पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरु केला आणि त्यातच दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांना त्यांनी पकडलं असता त्यांच्याकडे काही शस्त्रं आणि चोरीसाठी लागणारे हातमोजे आढळून आले.
 
त्यानंतर या तरुणांच्या घरी आणि घराजवळील परिसरात पुरून ठेवलेले सोन्याचे दागिनेही पोलिसांनी जप्त केले.
 
पोलिसांनी या प्रकरणात एकूण 180 सोन्याचे दागिने आणि 9 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. एकाच कुटुंबातील तीन भाऊ आणि त्यांच्या आईला यामध्ये अटक झाली आहे.
 
रात्रीच्या वेळी घरफोडी करणाऱ्या या टोळीला पोलिसांनी कसं पकडलं? मदुराईच्या पोलीस अधीक्षकांनी याबाबत नेमकं काय सांगितलं आहे? याचीच ही गोष्ट.
 
पुन्हा एकदा चोरी केली आणि पोलिसांनी पकडलं
मदुराईच्या सिल्लामन, तिरुमंगलम, कारुप्पयुरानी या उपनगरांमध्ये मागच्या तीन वर्षांपासून ही टोळी सक्रिय होती.
 
रात्रीच्या वेळी ते चोऱ्या करायचे. मदुराई उपनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भातल्या अनेक तक्रारीही दाखल झाल्या होत्या.
 
त्यांची दखल घेऊन मदुराईच्या पोलीस अधीक्षकांनी आदेश दिले आणि या चोरांचा शोध घेण्यासाठी एक विशेष पथक बनवलं गेलं. त्यानंतर या विशेष पथकाने चोरांचा शोध सुरु केला.
 
दोन आठवड्यांपूर्वी सिल्लामन परिसरातल्या एका घरातून दागिन्यांची चोरी झाल्याची एक तक्रार पोलिसांना मिळाली होती.
 
त्यानंतर या विशेष पोलीस पथकाने तपासाचा वेग वाढवला आणि त्यातच कालमेडू परिसरात चोरांची एक टोळी फिरत असल्याची माहिती या पथकाला मिळाली.
 
पोलिसांनी कालमेडू परिसरातल्या प्रत्येक वाहनाची सखोल तपासणी सुरु केली. यादरम्यान दोन तरुण दुचाकीवरून जाताना दिसले आणि त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली असता पोलिसांना संशय आला आणि त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे चोरीसाठी लागणारे हातमोजे, मास्क आणि काही शस्त्रं सापडली.
 
पोलिसांनी केलेल्या तपासात चिन्नासामी आणि सोनासामी नावाचे हे दोन भाऊ, मदुराई उपनगरात चोरी करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचं पोलिसांना कळलं.
 
पुढील चौकशीत या दोन भावांनी हेही कबूल केलं की, हे दोघे त्यांचा आणखीन एक भाऊ पोन्नूसामी आणि आई असैबू पोन्नू यांच्यासोबत चोऱ्या करायचे. मागील तीन वर्षांहून अधिक काळ ते सिल्लामन, कारुप्पयुरानी आणि थिरुमंगलम या भागात सक्रिय होते.
 
जमिनीखाली पुरून ठेवायचे चोरीचे दागिने
मदुराई पोलिसांनी या चार जणांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हे चौघे ज्या घरात राहत होते त्या घराच्या आजूबाजूचा परिसर खोदला आणि चोरीचे दागिने त्यांनी अनेक ठिकाणी जमिनीत पुरून ठेवल्याचं उघड झालं.
 
पोलिसांनी ते दागिने आणि पैसे जप्त केले आणि या चारही जणांना मदुराईच्या मध्यवर्ती तुरुंगात पाठवलं.
 
पोलिसांनी बीबीसी तामिळला दिलेल्या माहितीनुसार, हे सगळे दरोडेखोर एकाच कुटुंबातले होते. त्यांची चोरी करण्याची पद्धतही ठरलेली होती.
 
यातले दोन भाऊ चोरी करून दागिने जमिनीत पुरून ठेवायचे आणि ते दागिने तिसऱ्या भावाकडे सुपूर्द करायचे.
 
त्यानंतर त्यांची आई हे दागिने बँकेत ठेवायची. पोलिसांनी केलेल्या तपासात चोरांच्या घरी 30 हुन अधिक दागिन्यांच्या पावत्या सापडल्या आहेत. आता पोलीस बँकेत ठेवलेले दागिने कायदेशीर पद्धतीने परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
 
30 प्रकरणांमध्ये 200 हून अधिक दागिन्यांची चोरी?
मदुराईचे पोलीस अधीक्षक शिव प्रसाद यांनी यासंदर्भात कारुपायुरानी पोलिस ठाण्यात पत्रकारांची भेट घेतली.
 
त्यांनी म्हटलं की, "मागच्या 3 वर्षांपासून हा प्रकार सातत्याने सुरू होता. यावर्षी एकट्या सिल्लामन, करुपायुरानी आणि आसपासच्या परिसरात चोरीची 12 प्रकरणं नोंदवली गेली आहेत.
 
सातत्याने होत असलेल्या या घरफोड्यांचा तपास करण्यासाठी ओमाचिकुलमचे पोलीस उपाधीक्षक कृष्णन यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं.
 
हे पथक मागील 3 वर्षांपासून असे गुन्हे करणाऱ्या लोकांवर नजर ठेवून होतं.
 
त्यानंतर पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, इलामनूर येथे राहणाऱ्या चिन्नासामी आणि सोनासामी यांना वाहनाच्या झडतीदरम्यान पकडण्यात आलं आणि त्यानंतर त्यांच्या आणखीन एका भावाला आणि आईलाही अटक करण्यात आली.
 
पोलिसांनी घेतलेल्या झडतीत चोरांच्या घराभोवती जमिनीखाली पुरून ठेवलेले 180 सोन्याचे दागिने आणि 9 लाखांची रोकड जप्त करण्यात केली गेली.
 
त्यानंतर मदुराई उपनगर परिसरात मागील तीन वर्षात दाखल झालेल्या 24 प्रकरणांचा तपास पोलिसांनी बंद केला आहे.
 
चोरी झालेले सगळे दागिने परत मिळाले का?
आई आणि मुलांच्या या टोळीने मागच्या तीन वर्षात 240 सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. मात्र पोलिसांना आत्तापर्यंत फक्त 180 दागिनेच परत मिळाले आहेत.
 
यासोबतच या टोळीने 16 लाख रुपये लंपास केल्याची माहिती आहे त्यापैकी नऊ लाखांची रोकड पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे चोरी करण्यात आलेला सगळा ऐवज परत मिळवणं कठीण आहे.
 
अटक झालेल्या प्रत्येकाची सखोल चौकशी केली तरच या टोळीने नेमके किती गुन्हे केले आहेत ते स्पष्ट होईल.
 
पोलीस अधीक्षकांनी माध्यमांना सांगितलं की, "या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चारपैकी एकाही व्यक्तीचा यापूर्वीच्या कोणत्याही खटल्याशी संबंध नसल्यामुळे त्यांना अटक करण्यात उशीर झाला."