मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 जुलै 2021 (16:15 IST)

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

जान्हवी मुळे
तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक घोडीही भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
 
तिचं नाव आहे दयारा-4 आणि ती भारताचा घोडेस्वार फवाद मिर्झाच्या साथीनं ऑलिंपिकमध्ये खेळणार आहे.
 
दयारा ही तपकिरी रंगाची जर्मन वंशाची घोडी आहे. बे होलस्टायनर प्रजातीच्या या घोडीचा जन्म 2011 साली झाला होता. आजवर ती 23 स्पर्धांमध्ये खेळली आहे आणि त्यात पाचवेळा विजयी ठरली आहे.
 
फवादला स्पॉन्सर करणाऱ्या एम्बसी ग्रुपनं 2019 साली दयाराला विकत घेतलं होतं. त्यासाठी त्यांना 2,75,000 युरो मोजावे लागले होते.
 
एम्बसीनं एकूण चार घोडे स्पॉन्सर केले होते, पण त्यातले दोन म्हणजे दयारा आणि सेन्यूर मेडिकोट ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले. दोन्ही अश्वांची सध्याची कामगिरी पाहता, फवादनं ऑलिंपिकमध्ये दयारासह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
 
तो सांगतो "दयारा सध्या उत्तम फॉर्ममध्ये आहे आणि जागतिक पातळीवर कामगिरी करताना येणारा दबाव ती झेलू शकते."
 
अश्वारोहण किंवा घोडेस्वारी हा इतर खेळांपेक्षा वेगळा क्रीडाप्रकार आहे. कारण इथे खेळाडूंचं म्हणजे घोडेस्वारांचं त्यांच्या घोड्यासोबतचं नातं अतिशय महत्त्वाचं ठरू शकतं.
 
असं नातं तयार करण्यासाठी घोडेस्वार त्या घोड्यासोबत काही वर्ष घालवतात, त्यांच्यासोबत सराव करतात, त्यांचा खराराही करतात.
 
"घोड्यांसोबत तुम्ही मिळून मिसळून राहिलं, की मगच त्यांचा विश्वास कमावता येतो आणि त्यांच्यासोबत असं नातं जोडता येतं. तबेल्यात घोड्यांना खाऊ घालणं असो किंवा त्यांची काळजी घेणं असो, यात घालवलेले तासंतास घोड्यांसोबतचं नातं घट्ट करण्यासाठी मदत करतात," फवाद माहिती देतो.
 
दयारासोबत त्यानंही असंच नातं निर्माण केलं आहे.
 
घोड्यांसाठीही 'क्वारंटाईन'
बंगळुरूमध्ये जन्मलेला आणि तिथेच लहानाचा मोठा झालेला फवाद 29 वर्षांचा आहे. सध्या तो जर्मनीतील एका गावात सराव करतो आहे. तो रोज जवळपास बारा तास घोड्यांसोबतच घालवतो आणि त्यांना प्रशिक्षण देतो.
 
फवाद आणि दयारा लवकरच टोकियोला रवाना होणार आहेत.
 
कोरोना विषाणूची साथ पाहता, इतर खेळाडू आणि अधिकाऱ्यांप्रमाणेच घोड्यांनाही क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. त्यामुळे फवाद आणि दयारा टोकियोला जाण्याआधी आणि टोकियोला पोहोचल्यानंतर सात दिवस विलगीकरणात राहतील.
 
दयाराची काळजी घेण्यासाठी एक खास टीमही फवादसोबत आहे. तिची ग्रूमर (घोड्याची काळजी घेणारी व्यक्ती) योहाना पोहोनेन, पशुवैद्य डॉ. ग्रिगोरियो मेलीज आणि फिजियोथेरपिस्ट व्हेरोनिका सिंझ यांचा या टीममध्ये समावेश आहे.
 
दयारा ऑलिंपिकमध्ये चांगली कामगिरी करेल असा विश्वास फवादला वाटतो.
 
2020 साली कोव्हिडच्या साथीमुळे दयाराला केवळ पाच स्पर्धांमध्ये उतरता आलं. पण यंदा ती चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तिनं इटलीतील स्पर्धेत पाचवं स्थान मिळवलं होतं. मग पोलंडमधल्या दोन स्पर्धांमध्ये तिसरं आणि दुसरं स्थान मिळवलं होतं.
 
वीस वर्षांची प्रतीक्षा
फवादच्या रुपानं दोन दशकांनंतर पहिल्यांदाच एखादा घोडेस्वार ऑलिंपिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
 
याआधी दिवंगत विंग कमांडर आय. जे. लांबा यांनी 1996 साली अटलांटा ऑलिंपिकमध्ये अश्वारोहणात भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तर 2000 सालच्या सिडनी ऑलिंपिकमध्ये इम्तियाझ अनीस यांना वाईल्ड कार्डवर प्रवेश मिळाला होता.
 
फवाद गेल्या वर्षी ऑलिंपिकसाठी पात्र झाला, पण त्याची ही पहिलीच मोठी क्रीडास्पर्धा नाही. 2018 साली इंडोनेशियाच्या जकार्तामध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत फवादनं वैयक्तिक इव्हेंटिंग आणि टीम इव्हेंटिंग अशा दोन गटांत रौप्यपदकं मिळवली होती.
 
या कामगिरीमुळेच 2019 साली त्याला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं.
 
टोकियो ऑलिम्पिकमध्ये फवाद वैयक्तिक इव्हेंटिंग प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करल. गेल्या वर्षी दक्षिण आणि पूर्व आशिया-ओशिनिया गटाच्या जागतिक क्रमवारीत त्यानं अव्वल स्थान गाठत ऑलिंपिकचं तिकिट मिळवलं होतं.
 
फवादचे वडील एक पशुवैद्य असून लहानपणापासूनच त्याला घोडेस्वारीत रस होता.
 
दयारामुळे भारतात अश्वारोहणाला चालना मिळेल?
भारताच्या इतिहास आणि संस्कृतीत घोड्यांना महत्त्वाचं स्थान आहे. शिवाजी महाराजांचे मोती आणि कृष्णा असोत, महाराणा प्रताप यांचा चेतक किंवा झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंचा बादल. भारतातील कहाण्यांमध्ये घोड्यांनाही महत्त्वाचं स्थान आहे.
 
दखनी प्रजातीच्या घोड्यांचं - भीमथडीच्या तट्टांचं सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठा साम्राज्याच्या विस्तारातही मोलाचं योगदान असल्याचं मानलं जातं.
 
आजही सारंगखेड्याला घोड्यांच्या बाजारात करोडोंची उलाढाल होते.
 
पण असं असूनही एक खेळ म्हणून अश्वारोहणाचा भारतात फारसा प्रसार झालेला नाही.
 
यामागचं महत्त्वाचं कारण, म्हणजे हा खेळ अतिशय महाग आहे आणि त्यात बरीच गुंतवणूक करावी लागते, असं एम्बसी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जितू विरवानी सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "यात घोडे विकत घेण्यापासून ते अनेक अडथळे आहेत. एशियन गेम्सला टीम पाठवतानाही आम्हाला बराच संघर्ष करावा लागला. पण आता परिस्थिती बदलेल अशी आशा आहे."
 
भारतात अश्वारोहणात याआधी कोणी खेळाडू प्रसिद्ध नाहीत आणि अनेक तज्ज्ञांच्या मते फवाद आणि दयारा ही गोष्ट बदलू शकतात. दयारामुळे लोकांचा खेळात रस वाढेल, असं फवादलाही वाटतं.
 
तो सांगतो, "आम्ही आधीच इतिहास रचण्याच्या मार्गावर आहोत आणि दयारा या प्रवासात मदतच करेल. ती एक अतिशय चांगली, अतिशय सुंदर घोडी आहे. मला आशा आहे की तिच्यामुळे लोकांचं या खेळाकडे लक्ष वेधलं जाईल आणि युवा पिढीलाही अश्वारोहणासाठी प्रेरणा मिळेल."