सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (19:29 IST)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराच्या मतदानाची मुदत संपली, 8 मार्चला होणार विजेत्याची घोषणा

इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयरसाठीचं मतदानाची मुदत आता संपली आहे.
 
8 फेब्रुवारीला 5 महिला खेळाडूंची नामांकन जाहीर झाल्यानंतर संपूर्ण भारतभरातून तसंच जगभरातून लोकांनी आपल्या आवडत्या खेळाडूला मत दिलं आहे.
 
या महिला खेळाडूंमध्ये नेमबाज मनू भाकर, अॅथलिट द्युती चंद, बुद्धिबळपटू कोनेरू हंपी, कुस्तीपटू विनेश फोगट आणि सध्याची भारतीय महिला हॉकी टीमची कॅप्टन राणी रामपाल यांचा समावेश आहे.
 
ज्या महिला खेळाडूला सर्वाधिक मतं मिळतील तिची निवड इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर 2020 म्हणून केली जाईल.
 
दिल्लीमध्ये होणाऱ्या एका व्हर्चुअल समारंभात 8 मार्चला विजेतीची घोषणा केली जाईल. याचे निकाल बीबीसीच्या भारतीय भाषांच्या साईटवर तसंच बीबीसी स्पोर्ट्स वेबसाईटवर जाहीर केले जातील.
 
या समारंभात बीबीसी दीर्घकाळ कारकिर्द गाजवलेल्या एका महिला खेळाडूचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करेल, तसंच नवोदित खेळाडूंचाही या समारंभात सत्कार केला जाईल.
 
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, क्रीडा क्षेत्रातले तज्ज्ञ, लेखक आणि बीबीसीच्या संपादकांनी या नावांची निवड केली आहे.
 
गेल्या वर्षी बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची निवड वर्षातली सर्वश्रेष्ठ महिला खेळाडू म्हणून झाली होती तर पीटी उषा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
यंदा नामांकन झालेल्या पाच महिला खेळाडू या आहेत.
 
1. मनू भाकर
वय - 19 वर्षं*, खेळ - नेमबाजी (एअरगन शूटिंग)
 
वयाच्या सोळाव्या वर्षी मनू भाकरने आंतरराष्ट्रीय स्पर्धा फेडरेशन वर्ल्ड कप स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल - महिला या प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. असं करणारी ती सर्वात कमी वयाची भारतीय बनली.
 
मनू भाकरने 2018 च्या युथ ऑलिम्पिक्समध्येही सुवर्णपदक जिंकलं होतं.
त्याच वर्षी तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात 240.9 पॉइंट्स मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. 2019 मध्ये तिने नेमबाजीच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये याच प्रकारात सुवर्णपदक जिंकलं.
 
2. द्युती चंद
 
द्युती चंद महिलांच्या 100 मीटर धावणे या प्रकारत सध्याची राष्ट्रीय चॅम्पियन आहे. 2019 मध्ये झालेल्या वर्ल्ड युनिर्व्हसाईड स्पर्धेत तिने 100 मीटर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं होतं. तिला 2020 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. द्युती चंद फक्त तिसरी अशी भारतीय महिला आहे जी ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी क्वालिफाय झाली. तिने 2016 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.
 
द्युतीने जकार्तामध्ये झालेल्या एशियन गेम्समध्येही रौप्य पदक जिंकलं होतं. 1998 नंतर भारताने जिंकलेलं ते पहिलं पदक होतं.
'फिमेल हायपरांड्रोजनिझम' म्हणजेच शरीरात पुरूषी संप्रेरक जास्त असल्याच्या कारणावरून द्युतीवर बंदी आली होती. पण आंतराष्ट्रीय खेळ कोर्टात आपली बाजू समर्थपणे मांडल्यानंतर 2015 साली तिच्यावरची बंदी उठवण्यात आली.
 
द्युती चंदने जाहीरपणे मान्य केलं की ती समलैंगिक आहे, असं करणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली आहे.
 
3. कोनेरू हंपी
महिला रॅपिड चेस चॅम्पियन
कोनेरू हंपी भारतातल्या सर्वोत्तम महिला बुद्धिबळ खेळाडूंपैकी एक आहे. तिचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. लहानपणीच ती बुद्धिबळात कुशल असल्याचं तिच्या वडिलांच्या लक्षात आलं.
 
2002 मध्ये 15 व्या वर्षी जगातली सर्वात लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम तिच्या नावे लागला. हा विक्रम 2008 मध्ये चीनच्या होऊ यिफानने मोडला. सध्या ती महिला रॅपिड चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन आहे. दोन वर्षांच्या मातृत्व ब्रेकनंतर तिने हा खिताब जिंकला.
 
कोनेरू हंपीला भारतातल्या सर्वोच्य खेळ पुरस्कारांपैकी एक अर्जुन पुरस्कार मिळाला आहे तसंच पद्मश्री पुरस्कारानेही तिला गौरवण्यात आलं आहे.
 
4. विनेश फोगट
वय - 26, खेळ - कुस्ती
विनेशच्या कुटुंबात अनेक आंतरराष्ट्रीय महिला पैलवान आहेत पण विनेश जकार्तामधल्या एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय पैलवान ठरली. तिने राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही दोन सुवर्ण पदकं जिंकली आहेत. एशियन आणि राष्ट्रकुल या दोन्ही स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय कुस्तीपटू ठरली आहे.
 
सप्टेंबर 2019 मध्ये तिने आपली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. जानेवारी 2020 मध्ये विनेशने रोम रँकिंग सिरीजमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. तिने गेल्या वर्षी कोरोना व्हायरसलाही हरवलं.
 
5. राणी रामपाल
वय - 26 वर्षं, खेळ - हॉकी
राणी रामपाल प्रतिष्ठेचा 'वर्ल्ड गेम्स अॅथलिट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळवणारी पहिली हॉकी खेळाडू आहे. 2019 मध्ये अमेरिकेविरुद्ध खेळताना तिने केलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोलमुळे भारतीय महिला हॉकी टीमची टोकियो ऑलिम्पिकमध्ये जागा निश्चित झाली. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या टीमचाही ती भाग होती.
 
2010 मध्ये राणी भारताकडून वर्ल्डकप खेळणारी सर्वात कमी वयाची खेळाडू बनली. तिने 'स्पर्धेतली सर्वात कमी वयाची खेळाडू' हा पुरस्कारही जिंकला.
 
2018 च्या एशियन गेम्समध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं, त्याच वर्षी हॉकी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत संघ पोहचला आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला.
 
राणीचा जन्म हरियाणातल्या एका गरीब घरात झाला. तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.