रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 ऑक्टोबर 2021 (16:01 IST)

आर्यन खानला अटक करणारे NCBचे समीर वानखेडे नेमके कोण आहेत?

- मयांक भागवत
ड्रग्ज रॅकेट प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) अटक केली.
 
त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे एनसीबीची कारवाई वादाचा विषय बनली. आणि या वादाच्या केंद्रस्थानी आहेत NCB मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे.
 
गेल्याकाही दिवसांपासून एनसीबीने बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटविरोधात मोहीम सुरू केलीये. त्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात रहाण्यासाठी वानखेडे बॉलीवूड विरोधात कारवाई करतात, अशी टीका होऊ लागली.
 
समीर वानखेडे आणि वाद काही नवीन नाही. मुंबई एअरपोर्टवर कस्टम विभागात असतानाही त्यांच्यावर बॉलीवूडला टार्गेट करण्याचे आरोप झाले होते.
 
कोण आहेत समीर वानखेडे?
समीर वानखेडे 2008 च्या बॅचचे भारतीय महसूल सेवेतील (IRS) अधिकारी आहेत.
 
महसूल सेवेत येण्याआधी 2006 साली ते पहिल्यांदा केंद्र सरकारच्या सेंट्रल पोलीस ऑर्गनायझेशनमध्ये (Central Police Organization) रूजू झाले.
 
CPO मध्ये गुप्तचर विभाग, सीबीआय (CBI), नॅशनल क्राइम रिकॉर्ड ब्यूरो (NCRB), नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी (NIA) यांसारखे विविध विभाग येतात.
 
मूळचे महाराष्ट्राचे असलेल्या समीर वानखेडे यांचे वडील माजी पोलीस अधिकारी असल्याची माहिती आहे.
 
भारतीय महसूल सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांची नियुक्ती कस्टम विभागात करण्यात आली. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त (Assistant Commissioner Customs) म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं.
 
त्यानंतर, महसूल गुप्तचर संचलनालय (DRI) आणि दहशतवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या नॅशलन इनव्हेस्टिगेटिंग एजेन्सीतही (NIA) त्यांनी काम केलंय.
 
2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो मुंबईचे विभागीय संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला.
 
केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ठ तपासासाठीचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलंय.
 
बॉलीवूड-ड्रग्ज आणि NCB ची कारवाई?
बॉलीवूडविरोधात डॅग्ज रॅकेट प्रकरणी मोहीम उघडल्यामुळे समीर वानखेडे पहिल्यांदा चर्चेत आले 2020 मध्ये.
 
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर, बॉलीवूडचं ड्रग्ज कनेक्शन एनसीबीच्या रडारवर आलं. बॉलीवूड आणि ड्रग्जची चर्चा सुरू असतानाच सुशांतची गर्लफेंड रिया चक्रवर्तीवर ड्रग्ज घेतल्याचे आरोप झाले.
 
एनसीबी मुंबईने रिया चक्रवर्तीला अटक केली. त्यानंतर समीर वानखेडे यांनी आपला मोर्चा बॉलीवूडकडे वळवला.
 
दीपीका पादुकोण, सारा अली खान, रकूलप्रित सिंह आणि श्रद्धा कपूरची एनसीबीने कसून चौकशी केली. तर, प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंहला ड्रग्ज सेवन प्रकरणी अटक करण्यात आली होती.
 
बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपालची एनसीबीने चौकशी केली. तर टीव्ही सिरीयलची अभिनेत्री प्रतिका चौहानवर कारवाई करण्यात आली.
 
गेल्यावर्षभरात मुंबई नाक्रोटिक्स कंट्रोल विभागाने ड्रग्ज प्रकरणात अनेक कारवाया केल्या. यात महाविकास आघाडी सरकारचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या जावयालाही अटक करण्यात आली होती.
 
एएनआयशी बोलताना समीर वानखेडे म्हणतात, "गेल्या वर्षभरात एनसीबीने मुंबईत 94 आणि गोव्यात 12 कारवाया केल्या आहेत. यामध्ये ड्रग्ज रॅकेटच्या 12 गॅंग पकडण्यात आल्या आहेत."
 
बॉलीवूडविरोधात मोर्चा उघडल्यामुळे समीर वानखेडेंवर प्रसिद्धीसाठी बॉलीवूडला टार्गेट करत असल्याचे आरोप झाले.
 
वानखेडे आणि वाद
समीन वानखेडे आणि वाद हे नातं तसं जुनचं आहे.
 
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात कार्यरत असतानाही त्यांच्यावर बॉलीवूडला टार्गेट करण्याचे आरोप झाले होते.
 
एअरपोर्टवर सहाय्यक आयुक्त असताना वानखेडे यांनी परदेशातून येणाऱ्या बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींवर कस्टम ड्युटी चुकवल्याप्रकरणी कारवाई सुरू केली.
 
मिनिषा लांबा, गायक मिका सिंग यांना कर चुकवल्याप्रकरणी समीर वानखेडे यांनी दंड ठोठावला होता. वानखेडेंवर त्यावेळीदेखील बॉलीवूडला टार्गेट करण्याचे आरोप करण्यात आले होते. पण त्यांनी आपली कारवाई सुरूच ठेवली.
 
मिळालेल्या माहितीनुसार 2011 मध्ये क्रिकेट वर्ल्डकपची ट्रॉफी मुंबई एअरपोर्टवर आली होती. ही ट्रॉफी सोन्याची होती. कस्टम ड्युटी भरल्यानंतरच ही ट्रॉफी सोडण्यात आली. समीर वानखेडे त्यावेळी कस्टम विभागात कार्यरत होते.
 
कस्टम विभागात कार्यरत असताना त्यांनी बॉलीवूड सेलेब्रिटींसोबत अनेकांवर कर चुकवल्याप्रकरणी कारवाई केली होती.
 
समीर वानखेडेंचं बॉलीवूड कनेक्शन काय?
समीर वानखेडेंवर नेहमीच बॉलीवूडला टार्गेट केल्याचा आरोप होतो. पण, समीर वानखेडे यांच्या पत्नी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार आहेत.
 
समीर वानखेडे यांनी काही वर्षांपूर्वी अभिनेत्री क्रांती रेडकरशी लग्न केलंय.
 
आर्यन खान प्रकरणी कारवाईनंतर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. त्यानंतर क्रांती रेडकर यांनी एनसीबीचं कौतूक करणारी एक पोस्ट लिहीली आहे.
क्रांती रेडकरची पोस्ट
'समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी एनसीबी फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. मी अशा लोकांना म्हणेन की त्यांनी जरा अभ्यास करावा... घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करणं सोपं आहे. मात्र, तुम्ही हे करत असताना एनसीबीचे लोक आघाडीवर राहून लढा देतायत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा,' अशी पोस्ट लिहीत अभिनेत्री क्रांती रेडकर हिने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या कामाचं कौतुक केलं आहे.
 
पतीच्या कामाबद्दल फारशी चर्चा न करणाऱ्या क्रांतीने आता इन्स्टाग्रामवर समीर यांच्या कामाचं कौतुक करत त्यांच्या टीकाकारांना उत्तर दिलंय.
 
काय म्हटलं आहे या पोस्टमध्ये?
क्रांती या पोस्टमध्ये म्हणते, "तुमच्या सगळ्यांच सहकार्य आणि पाठिंबा मिळाल्याबद्दल मी आभारी आहे. आपण सगळ्यांनीच एनसीबीचं काम आणि त्यांनी टाकलेल्या धाडींचं कौतुक केलंत. मात्र, फक्त बॉलिवूडचा उल्लेख आला की लोक यात रस घेतात. मात्र, माध्यमांनी यापूर्वीही एनसीबीने मोठ्या गँगस्टर्सना पकडल्याबद्दल वार्तांकन केलंय याचीही सगळ्यांनी नोंद घ्यावी.
 
समाजात असे काही लोक आहेत ज्यांनी एनसीबी फक्त बॉलिवूडला टार्गेट करत असल्याचं म्हटलंय. मी अशा लोकांना म्हणेन की त्यांनी जरा अभ्यास करावा. यापूर्वीची आकडेवारी गोळा करावी. घरी आरामात बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करणं सोपं आहे. मात्र, तुम्ही हे करत असताना एनसीबीचे लोक आघाडीवर राहून लढा देतायत. आपल्या देशासाठी लढणाऱ्या लोकांचा सन्मान करायला हवा."
 
यापूर्वी क्रांतीने टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. यावेळी ती म्हणाली होती की, "माझे पती देशासाठी त्यांचं आयुष्य, मुलं आणि कुटुंबीय यांच्याशी तडजोड करतायत. मला त्यांचा अभिमान आहे. तो यापूर्वीही निष्ठेने काम करत होता. मात्र, आता बॉलिवूडशी संबंधित ड्रग्ज प्रकरण समोर आल्याने तो प्रकाशझोतात आलाय."
 
एकीकडे एनसीबीचं कौतुक होतयं, तर काही जण या संस्थेवर टीकाही करत आहेत. पण मुळात ही संस्था आहे काय आहे? या संस्थेचे कार्य, रचना आणि इतर गोष्टी समजून घेऊया.