सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 5 फेब्रुवारी 2024 (16:35 IST)

मुफ्ती सलमान अजहरी कोण आहेत? त्यांना गुजरात पोलिसांनी कशामुळे अटक केली?

कथित चिथावणीखोर वक्तव्यासाठी मुंबईतून इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरातच्या दहशतवादी विरोधी पथकाने अटक केली आहे.
 
गुजरात पोलीस रविवारी मुंबईत पोहोचले आणि त्यांनी तिथून मुफ्ती सलमान अजहरी यांना दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांड वर ताब्यात घेतलं.
 
अजहरी यांना अटक केल्यानंतर मुंबईच्या घाटकोपर पोलीस स्थानकात नेण्यात आले. तिथे गर्दी जमा झाली आणि अजहरी यांना ताब्यात घेतल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.
 
गर्दीला नियंत्रणात करण्यासाठी अजहरी यांनाच आवाहन करावे लागले, त्यांनी लोकांना परत आपल्या घरी जायला सांगितले.
 
मुफ्ती सलमान अजहरी यांचे एक विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. असं म्हटलं जात आहे की हे विधान त्यांना लोकांना चिथवण्यासाठी दिले.
 
हा व्हीडिओ गुजरातमधील जुनागढचा आहे. बुधवारी एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते.
 
पीटीआयने सांगितले की या कार्यक्रमाच्या दोन आयोजकांना देखील अटक करण्यात आली आहे.
 
काय म्हणाले होते अजहरी?
अजहरी बुधवारी गुजराजच्या जुनागडमध्ये बी डिव्हिजन परिसरात एका कार्यक्रमात सहभागी झाले होते.
 
या कार्यक्रमाचा 20 सेकंदांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला असून, त्यावर आक्षेप घेतला जात आहे.
 
पण या कार्यक्रमाचा संपूर्ण व्हीडिओही सोशल मीडियावर उपलब्ध आहे.
 
व्हीडिओमध्ये अजहरी म्हणत आहेत की, "जगभरातून टोमणे मारले जातात की, तम्ही खरे आहात तर मारले का जाता. पॅलेस्टाइनमध्ये तुमच्या एवढ्या हत्या का झाल्या. इराक, येमेन, पॅलेस्टाइन, अफगाण, अरब आणि बर्मा सगळीकडं तुम्ही मारले का जाता. तरुणांनो त्या अत्याचाऱ्यांना असं उत्तर द्या जे आपल्याला मुफ्ती आझम यांनी शिकवलं आहे. आपण रसूल-उल्लाहचे लोक(परवाने) आहोत. आपला जन्म मरण्यासाठीच होतो."
 
"एखाद्या ठिकाणी हत्या होत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, आपण मेल्यानं इस्लाम संपणार नाही. इस्लाम संपायचा असता तर कर्बलामध्येच संपला असता. पण इस्लाम अस्तित्वात असतं, हेच इस्लामचं सत्य आहे. प्रत्येक कर्बलानंतर ते असतं. "ना घबराओ ऐ मुसलमानों, अभी खुदा की शान बाकी है. अभी इस्लाम जिंदा है. अभी कुरान बाकी है."
 
रोज जे लोक आपल्याशी भिडतात, पण अजून कर्बलाचं अखेरचं युद्ध शिल्लक आहे. आज *** चा काळ आहे. उद्या आपला येईल."
 
अजहरींवर गुन्हा दाखल
या कार्यक्रमात अजहरी जे बोलले त्याचा एक भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला.
 
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजहरी आणि स्थानिक आयोजकांनी युसूफ मलिक आणि अजिम हबीब यांच्यावर आयपीसीच्या कलम 153 बी आणि 505 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
 
ही कलमं धार्मिक गटांमध्ये द्वेष निर्माण करणे, आणि चिथावणीखोर वक्तव्ये दिल्याप्रकरणी लावली जातात.
 
आयोजकांनी धर्माबाबत बोलून व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणार असं सांगून परवानगी घेतली हीत. पण त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलं, असं पोलिसांनी सांगितलं.
 
त्यानंतर रविवारी मुंबईत पोलिसांनी अजहरी यांना घाटकोपर पोलिस ठाण्यात आणलं. गुजरात पोलिसांनी अजहरी यांना ताब्यात घेतलं. कायदेशीर कारवाई केल्यानंतर पोलीस ठाण्यात नेलं.
 
अजहरी यांच्या अटकेच्या विरोधात त्याठिकाणच्या लोकांची गर्दी जमली. अजहरी यांना सोडण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी सांगितल्यानंतरही जेव्हा गर्दी हटली नाही तेव्हा लाठिचार्जही करण्यात आला.
 
त्यानंतर अजहरी यांनी लाऊडस्पिकरवरुन लोकांना शांतता राखण्याची अपील केली.
 
अजहरी म्हणाले की, "उत्साहाच्या भरात कधीच चुकीचं काम करायचं नाही. परिस्थिती कशीही असली तरी मी तुमच्या समोर आहे. मी सांगतोय की मी गुन्हेगार नाही, किंवा मला गुन्ह्यासाठी आणण्यात आलेलं नाही. माझ्याबाबतच्या तक्रारीवर यांना जो तपास करायचा आहे तो ते करत आहेत. आपण यांना सहकार्य करत आहोत. तुम्हीही करायला हवं."
 
अजहरी म्हणाले की, "ट्रॅफिक आणि परिस्थिती ज्या पद्धतीची तयार झाली आहे, त्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा निर्माण होऊ शकतो. जे होईल ते चांगलंच होईल. माझ्या नशिबात अटक लिहिलेली असेल तर मी त्यासाठीही तयार आहे. तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर हात वर करून सांगा. तर ही जागा रिकामी करा. पोलिसांना अडचण होता कामा नये."
 
अजहरी यांच्या या विनंतीनंतर गर्दी कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
 
अजहरींचे वकील काय म्हणाले?
गर्दीमुळं परिस्थिती चिघळलेली होती. त्यामुळं पोलिसांनीही निवेदन दिलं.
 
मुंबईतील डीसीपी हेमराज सिंह राजपूत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, "मुंबईत शांतता आहे. घाटकोपर परिसरातही शांतता आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मुंबईच्या लोकांसाठी पोलीस रस्त्यावर आहेत, हे मी सांगू इच्छितो."
 
घाटकोपर ठाण्याबाहेर अजहरींचे समर्थक वाहीद शेख म्हणाले की, "35-40 पोलीस साध्या वेशात मुफ्ती साहेबांच्या घरी आले. आम्ही जाऊन विचारलं की, कशासाठी आले आहेत. ते म्हणाले, मुफ्तींकडं घेऊन जा. मुफ्ती साहेबांनी त्यांना सहकार्य केलं. सोबत नेलं. नंतर समजलं की गुजरातमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही म्हटलं नोटीस द्या, तर नोटीस दिली नाही."
 
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अजहरी यांचे वकील आरिफ सिद्दीकी यांनी याबाबत माहिती दिली.
 
सिद्दिकी म्हणाले की, "पोलिसांनी त्यांच्या ट्रान्झिट रिमांडसाठी अर्ज केला होता. आम्ही त्याचा विरोध केला आणि त्यांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचंही सांगितलं. कायद्यानुसार त्यांनी आम्हाला नोटीस द्यायला हवी होती, ती दिली नाही. त्यांना दोन दिवसांच्या ट्रान्झिट रिमांडवर पाठवण्यात आलं आहे."
 
मुफ्ती सलमान अजहरींबाबत काही बाबी
मुफ्ती सलमान अजहरी हे इस्लामिक अभ्यासक असल्याचं सांगतात. ते जामिया रियाजुल जन्नाह, अल अमन एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टचे संस्थापक आहेत.
 
फ्री प्रेस जनरलच्या रिपोर्टनुसार अजहरी यांनी कैरोच्या अल अजहर विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे.
 
ते अनेक प्रकारच्या धार्मिक-सामाजिक कार्यक्रमात सहभागी होत असतात.
 
मुफ्ती सलमान अजहरी यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत.
 
सोशल मीडियावर ते जगातील प्रसिद्ध सुन्नी रिसर्च स्कॉलर असल्याचा दावा करतात. सात वर्षांपासून ते युट्यूबवर सक्रिय आहेत.
 
अजहरी खालील मुद्द्यांवर बोललेले आहेत...
आपण 'बूत' (मूर्ती) ची पूजा करू शकतो का?
गरीब नवाज भारतात कसे आले?
इस्लामपेक्षा चांगला दीन (धर्म) आहे का?
मनाला शांती कशी मिळणार?
इस्लामचे खरे हिरो कोण आहेत?
पॅलिस्टीनमध्ये अल्लाहची मदत येईल?